अंतर्मन आणि विचार

अचानक अशा व्यक्तीशी काल बोलणे झाले जो मला कधीच त्याच्या आयुष्याबद्दल चांगला बोलला नाही. त्याच विषयावर त्याच्याशी बोलायचे ठरवून चांगले झापले कारण अशा व्यक्ती आपल्या सभोतालच्या वातावरणात बदल करत असतात. 

मनुष्य अंतःकरणातून जसा विचार करतो, तसाच तो असतो. काही लोक कायमस्वरूपी चिंताग्रस्त असतात; काही चांगलं वा सुंदर त्यांच्या डोक्यातच येत नाही. काहीतरी वाईट वा विध्वंसक होणार आहे हे जणू त्यांना नेहमी माहीत असतं. काहीतरी चांगलं का घडावं किंवा घडेल याचं एकही कारण त्यांच्याकडे नसतं. तथापि काहीतरी भयानक आणि वाईट का घडेल याची कित्येक कारणं ते देऊ शकतील. असं का होतं? कारण सरळ आहे –

१. नकारात्मकता ही या लोकांची सवय असते;

२. त्यांचे बहुसंख्य विचार नकारात्मक, गोंधळलेले, विनाशकारी आणि रोगट स्वरूपाचे असतात.

३. नकारात्मक विचारांची सवय जसजशी अंगवळणी पडत जाते, तसतसे ते त्यांच्या अंतर्मनाला नकारात्मक बनवत राहतात.

४. त्यांच्या कल्पनेवर त्यांच्या प्रमुख मनोवस्थेचा आणि भावनांचा पगडा असतो;

५. आयुष्यात सुरुवातीला आलेल्या वाईट समस्येचा मनावर झालेला परिणाम.

म्हणून ते केवळ वाईटच चिंतू शकतात, अगदी त्यांच्या प्रिय व्यक्तींविषयीसुद्धा. उदा, त्यांचा मुलगा होस्टेलमध्ये असेल; तर ते कल्पना करतील की, त्याला सर्दी होईल, तो दारुडा बनेल, तो चारित्र्यहीन बनेल; अशा व्यक्तींना समुपदेशनाची प्रचंड आवश्यकता असते. त्यांची विचारसरणी बदलणे शक्य आहे.

१. विधायक आणि सद्भावपूर्ण विचार करणे.

२. विचार करणं म्हणजेच स्वतःशी बोलणं. तुमचे विचार तुमचे शब्द बनतात.

३. शब्द मधाळ असू द्या, कानांना गोड लागतील आणि हृदयाला सुखकारी ठरतील असे.

४. आजचा वर्तमानकाळ पुढे चालून आपलं भविष्य बनणार आहे; तुमच्या अदृश्य शब्दांचं वा विचारांचं दृश्य रूप म्हणजेच तुमचा भविष्यकाळ.

५. मनातून तुम्हांला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे; कारण आतलंच प्रतिबिंब बाहेर उमटतं.

६. नेहमी असं जाणीवपूर्वक म्हणण्याचं ठरवून घ्या – या क्षणापासून पुढे; माझ्या मनात मी केवळ अशाच कल्पनांना आणि विचारांना थारा देईन; 3 इडियट मधील ऑल इज वेल डायलॉग आठवा.

७. आपण काय ऐकतो, कुणाशी बोलतो, आणि काय ध्यानात ठेवतो याला फार महत्व आहे म्हणून आपला मित्र परिवार जर अयोग्य असेल तर बदलला पाहिजे.

८. समुपदेशन आणि योगाभ्यास सकारात्मक परिणाम करतो. अध्यात्म नक्कीच महत्वाचं.

निसर्ग ज्या नियमांनी नव्या गोष्टी घडवतो, त्याच नियमांनी आपणही नव्या गोष्टी रचतो. आपले अनुभव, स्थिती, परिस्थिती, वातावरण आणि तसंच आपलं शारीरिक आरोग्य, आर्थिक स्थिती आणि सामाजिक जीवन वगैरे सारं आपल्या मानसिक प्रतिमांतून आणि आपल्या सारखंच घडत असतं.

खरं तर अज्ञान हेच एकमेव पाप आहे. वेदना ही शिक्षा नव्हे; तर आपल्या आंतरिक सामर्थ्याच्या दुरुपयोगाचं ते फळ आहे. माणसाच्या आयुष्यात समस्या, चिंता आणि अडचणी केवळ याचमुळे असतात की, तो नेहमी भयग्रस्त असतो आणि चुकांना बळी पडत असतो.

दिवसभरात केव्हाही तुम्हांला भयानं किंवा चिंतेनं ग्रासलं, तर तुम्ही तुमच्या मनातल्या सुंदर चित्राकडे पाहू शकता – तसं करून अंतर्मनाच्या तळघरात तुम्ही एक विशिष्ट मानसशास्त्रीय नियम राबवत असता.  बाह्यमन हे वैयक्तिक आणि काटेकोर असतं. केवळ एखाद्या गोष्टीचा छडा लावण्यासाठी ते निवड करतं, पसंत करतं, तुलना करतं, विश्लेषण करतं, चिरफाड करतं. आनुमानिक आणि तार्किक विचार करण्याची त्याची क्षमता असते. अंतर्मन हे बाह्यमनाच्या प्रभावाखाली असतं. मनुष्याचं बाह्यमन हे मोटर आहे आणि अंतर्मन त्याचं इंजिन. तुम्ही फक्त मोटर चालू करा. इंजिन सारं काम करून घेईल. बाह्यमन हे अंतर्मनाला जागृत करणारं यंत्र आहे.

विचार करून पाहा आपण कुठे आहोत..

©श्रीकांत कुलांगे

9890420209(whatsapp)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *