कल्पनाशक्ती आणि आपण

आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या बळावर आपली स्वप्न पूर्ण करतात तर कित्येकजण त्या स्वप्नांच्या जवळपास सुध्दा भटकत नाहीत. मला यश मिळण्यात अडचणी पाहून स्वप्नीलला वैताग आलेला होता. मनात अनेक वाईट गोष्टी आजकल येतात म्हणून चिंता वाढलेली होती. त्याच्याशी गप्पा मारताना ठराविक गोष्टी त्याला सांगणे क्रमप्राप्त होते. 

‘मी अपयशी झालोय’ अशी कल्पना माणूस करू शकतो, तशीच ‘मी यशस्वी झालोय’ अशीही कल्पना करू शकतो. अपयशी बनण्याची कल्पना करणं जितकं सहजसोपं आहे, तितकंच सोपं आहे यशस्वी झाल्याची कल्पना करणं; पण होऽ यशस्वी झाल्याची कल्पना करणं नक्कीच रंगतदार आहे बरं!” प्रत्येक मनुष्याचं मन कोणतं‑ना‑कोणतं स्वप्न पाहतच असतं. त्याच्या मनात दृष्टान्त, प्रतिमा आणि आदर्श असतात. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला रोखून ठेवतात.

१. आपलेच अन्य नकारात्मक विचार, आपल्या दुर्भावना, शंकाकुशंका यांमुळे आपली कितीतरी स्वप्नं अर्धवट ठेवतात.

२. आपल्या मनातील संकुचित विचार, नकारात्मक भावना, चुकीच्या धारणा ही जणू तुमची भावंडं बनून तुम्हांला आव्हान देतात; तुमच्या स्वप्नांना कमी लेखतात; आणि तुम्हांला म्हणतात की, तू हे करूच शकणार नाहीस, हे अशक्य आहे.

३. परस्परविरोधी विचारांचा संघर्ष जणू आपल्या मनात पेटतो. एकानं दुसऱ्याचा पाय खेचावा, तसा एक नकारात्मक विचार आपल्या स्वप्नांना खाली खेचू लागतो.

४. आपल्या मनात आपल्या स्वकीयांशीच लढा सुरू होतो.

५. मानसिक कुचंबणा आपल्याला मागे खेचते.

६. आर्थिक टंचाई आपल्याला दुबळी करते पण त्याही पेक्षा जास्त परिणाम आपल्या वागण्या बोलण्यात दिसतो.

लिस्ट वाढत जाईल पण नेमके प्रश्नांचे मुळ कुठे असेल तर ते आहे आपल्या कल्पनाशक्ती मध्ये. कित्येकांना याची कल्पनाच नसते की ही इतकी का गरजेची गोष्ट आहे. अर्थात भरपूर काही उपाय आपण यावर करू शकतो.

१. मनातल्या या विरोधावर मात करण्याचा उपाय हा की, केवळ आपल्याला काय दिसतं वा ऐकू येतं यावरून, म्हणजेच वस्तूंच्या निवळ दर्शनावरून आपलं मन हटवायचं. हेही दिवस निघून जातील असं बजावणे.

२. ध्येयावर जिवापाड प्रेम करणं.

३. कल्पनाशक्तीचा रचनात्मक वापर करणं.

४. अभावाऐवजी समृद्धीची, कलहाऐवजी शांततेची आणि आजारांऐवजी आरोग्याची कल्पना करू शकता.

५. कल्पनाशक्ती ही आपली अंगभूत क्षमता आहे. ती इतर कोणत्याही शक्तीच्या किंवा जाणिवेच्या अगोदर येते.

६. आपल्या मनाच्या संमतीशिवाय बाहेरचं काहीच आपल्याला छळू शकत नाही अथवा दुखवू शकत नाही.

७. कल्पनाशक्तीतूनच आपली मनोवृत्ती घडते.

अनेक लोकांचा जीवनविषयक दृष्टिकोण काळवंडलेला, नैराश्यपूर्ण असतो. ते कडवट, निराशाग्रस्त आणि भांडखोर असतात. याचं कारण त्यांची नकारात्मक मनोवृत्ती – ती त्यांची प्रत्येक प्रतिक्रिया नकारात्मक बनवते.

जो आपल्या अंतर्मनाला जाणतो, तोच अलौकिक बुद्धिमंत असतो. तो आपल्या समस्यांचं उत्तर या वैश्विक साठ्यातून शोधून काढतो; म्हणून त्याला अंगमेहनत करायची गरज पडत नाही. अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीची कल्पनाशक्ती अत्युच्च पातळीपर्यंत विकसित झालेली असते.

समस्या दाखवून जीवन आपल्याकडून उत्तर मागत असतं. त्यांवर मात करण्यातच सर्वाधिक आनंद आणि समाधान आहे. स्वप्नील सारखी असंख्य युवा पिढी निर्माण होते आहे. कुठेतरी या सेनेला वाहत ठेवणे आवश्यक आहे. कल्पनाशक्ती हे काम नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकते.

©श्रीकांत कुलांगे
मानसोपचारतज्ज्ञ
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *