स्वतःची ओळख

काल समुद्रावरील खाऱ्या वाऱ्याचा अनुभव घेत, कॉफी पिताना मित्रपरिवाराने सहज एक हटके विषय काढला की आपली स्वतःची ओळख कशी करायची? 

आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक व्यक्तींना समजून घेतो, समजावतो. पण एक व्यक्ती अशी आहे जिच्याशी मैत्री करण्याचं आणि आपल्या सामंजस्याच्या कक्षेत बसवण्याचं राहूनच जातं. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वत:, आपला स्वभाव, आपल्या आवडीनिवडी, गुणदोष, उद्दिष्टं, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, भावनिक, सामाजिक बुद्ध्यांक, विशेष बुद्धिमत्ता कधी समजून घेणार आपण? अर्थात बऱ्याच जणांना ही उत्सुकता असतेही. पण स्वत:ला कसं समजून घ्यायचं हे मात्र अजिबात समजत नाही.

मी त्यांना साध्या पद्धतीने समजाऊन सांगितले की ते शक्य होतं मानसशास्त्रीय चाचण्या द्वारे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आता मानसशास्त्राचा शिरकाव झाला आहे. मानसशास्त्रातील संशोधन वेगानं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं होतो आहे. त्यातून काय प्राप्त होते?

१. जीवनात विहार करताना कोणत्या विचारांनी विकास साधायचा आणि तरीही झालेच विकार तर त्यावर मात कशी करायची, या बाबतीत ही मदत मिळू शकते.

२. अभ्यासक्रमाची निवड, व्यवसायाचा निर्णय,

३. व्यक्तिगत समस्यांचे निराकरण,

४. वैवाहिक जीवनातील गुंतागुंती,

५. समायोजनातील अपयश आणि

६. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे संशोधन अशा विविध बाबतीत मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग करून घेता येतो.

७. बुद्धिमापन, अभिरुची शोधणं, अभिक्षमतांचा वेध घेणं.

८. स्वभाव-वैशिष्ट्ये जाणून घेणं.

९. विकृतीचं मूळ तपासणं.

अशा विविध आणि महत्त्वाच्या स्तरांवर मानसशास्त्रीय चाचण्या वापरल्या जातात. जागतिक आरोग्य संघटनेनं एकविसावं शतक हे मानसिक अस्वास्थ्याचं शतक म्हणून जाहीर केलं आहे. एकंदरीत रोज जगताना मानसशास्त्राची आणि मानसोपचारतज्ज्ञाची मदत अपरिहार्य, अनिवार्य झालेली आहे.

मानसशास्त्रीय चाचण्यांचे व्यावहारिक उपयोग महत्वाचे आहेत.

१. शैक्षणिक क्षेत्र: बुद्धिमापन, अभ्यासक्रमाची निवड, विद्यार्थ्यांच्या विविध समस्या.

२. व्यावसायिक क्षेत्र: विशिष्ट कामासाठी किंवा पदासाठी उमेदवाराची निवड करताना त्यासाठी आवश्यक ती महत्त्वाचे असणारे गुणधर्म त्या उमेदवार व्यक्तीत आहेत किंवा नाहीत तसेच असल्यास किती प्रमाणात आहेत, हे निश्चित करण्यासाठी मानसशास्त्रीय चाचण्या उपयुक्त ठरतात.

३. वैयक्तिक क्षेत्र: दिवसेंदिवस भेडसावणाऱ्या समास्या यांचे मूळ कसे तयार झाले यावर समज.

४. वैवाहिक क्षेत्र: विवाहपूर्व आणि विवाहपश्चात येणाऱ्या अडचणी व तत्सम प्रश्न यासाठी ठराविक चाचण्या मुळा पर्यंत शोध घेतात.

५. मनोविकृती: विकृती कोणती, किती प्रमाणात आहे तसेच त्यामागील कारणे समजावून घेण्यासाठी या चाचण्यांचा वापर केला जातो.

६. संशोधन क्षेत्र: अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी जी माहिती मिळवावी लागते त्यासाठी महत्त्वाचं साधन म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्या.

शारीरिक तपासण्या आपल्याला निदानाप्रत येण्यासाठी मदत करतात त्याचप्रमाणे मानसशास्त्रीय चाचण्या विविध बाबतीत आपल्याला निष्कर्षाप्रत येण्यासाठी उपयुक्त ठरतात, वाटाड्याचं काम करतात. यांचा उपयोग करून घेऊन सारासारविचार करून, परिस्थितीशी ताळमेळ लक्षात घेऊन, योग्य आणि अनुरूप असा निर्णय घेता येतो. आयुष्य सोपं होऊन जातं.

म्हणून मित्रांनो, स्वतःला आयुष्यात खरोखर एकदा ओळखाच! कारण स्वभावाला इथेच औषध मिळू शकेल. मानसोपचारतज्ज्ञ फक्त वेड्या लोकांसाठीच असतात असे नाही. सर्वसामान्य लोक सुध्दा यांना भेटू शकतात.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचारतज्ज्ञ

9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *