भित्या पोटी..

आपल्या प्रगतीमधील एक मोठा अडसर म्हणजे आपले अपयशाची, असफलतेची भीती. हे काम आपल्याला जमेल की नाही? हा स्वत:ला आणि समुपदेशकाला विचारला जाणारा हमखास प्रश्न. यशाची जर खात्री नसेल तर कामाला हात लावून उगाच आपल्याला त्रास कशाला करून घ्यायचा हा विचार. नीट, JEE ची इतकी तयारी करूनही हवे तसे मार्क मिळण्याची खात्री नाही तर यावेळी ‘ड्रॉप’ घेतलेलाच बरा नाही का?  ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असे जर व्यक्ती स्वत:ला सांगत असेल तर आयुष्यात आलेल्या प्रगतीच्या संधीचा लाभ ती करून घेऊ शकणार नाही.

खरच का आव्हानात्मक कामे, परीक्षा, स्पर्धा इतक्या अवघड असतात? तसं असेल तर काहींना त्यात उत्तीर्ण होणे, प्रावीण्य मिळविणे कसे जमते? चांगली कामे, परीक्षा, स्पर्धा यांना सामोरे जाणे, प्रावीण्य मिळविणे कसे साध्य होते? व्यक्तीला अशा कसोटीच्या प्रसंगांना तोंड देणं कठीण जातं याचं मुख्य कारण म्हणजे तिची अपयशाची भीती आणि त्याच्या परिणामांचा ती उभा करीत असलेला बागुलबुवा होय. अपयशाची भीती इतर कोणीही तिच्या मनात निर्माण केलेली नसते, तर तिने स्वत:च आपल्या मनात ती भरवलेली असते. त्याकरिता कोणती गोष्ट जबाबदार असेल तर ती म्हणजे आपला घटनांकडे आणि स्वत:कडे पाहण्याचा तसा दृष्टिकोन. सहजपणे बुद्धीला पटतील अशा बाबींकडे आपले दुर्लक्ष होते. जसे यशाने आपण सुखावत असलो तरी अपयश हे मानवीजीवनाचे अविभाज्य अंग आहे. कधीही अपयश न आलेली व्यक्ती या जगात सापडणार नाही, उलट बऱ्याच व्यक्ती अपयशाच्या शिडीवरूनच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. काम करून पाहिले तर जमण्याची शक्यता 1 ते 100 टक्के, अन्यथा शून्य.

कामाची, परीक्षेची कसून तयारी करणं तेवढं आपल्या हातात आहे; पण यश मिळेल किंवा नाही हे आपल्या नियंत्रणाबाहेरील काही घटकांवर अवलंबून असतं. प्रश्नपत्रिका सोपी असते की कठीण, आपण तयार केलेले प्रश्न विचारले जातात का, प्रश्नोत्तरे तपासणार्‍यांची मानसिकता, पूर्वग्रह अशा कितीतरी बाह्य घटकांचा आपण यशस्वी होऊ की नाही किंवा कितपत यशस्वी होऊ यावर परिणाम होत असतो. स्वत:चे परीक्षेशी संबंधित अनुभव प्रत्येकाने आठवून पाहावेत. कितीही तयारी केली असली तरी कसं होईल, काय होईल ही धाकधूक परीक्षेच्या हॉलमध्ये शिरेपर्यंत चालू राहते. ग्रासणाऱ्या चिंतेचा परिणाम परीक्षेतील कामगिरीवर झाल्याशिवाय राहत नाही. चांगलं पाठ झालेलं, घरी अनेकदा म्हणून पाहिलेलं किंवा लिहून काढलेलं ऐनवेळी आठवत नाही. नेमकं पेपर लिहिताना स्मृती दगा देते आणि त्याचं कारण तयारीचा अभाव हे नसून परीक्षेच टेंशन, पास होऊ की नाही ही चिंता आणि अपयशाचं भय हेच मुख्यत्वेकरून असतं. या तीनही कारणांच्या मुळाशी ‘माझी परीक्षेतली कामगिरी चांगलीच झाली पाहिजे, घरच्यांनी आणि शिक्षकांनी नापसंती दाखवू नये, अपयश मला सहन होणार नाही’ अशा अविवेकी धारणा आणि विचार नक्कीच सापडतील. डोक्यावर चिंता आणि ताण घेऊन समस्या सुटत नाहीत किंवा ज्यांची भीती वाटते त्या गोष्टी टाळता येत नाहीत, उलट त्या अधिक जवळ येतात. स्वयंचलित वाहने वापरणार्‍यांनी तर हे विशेषकरून लक्षात ठेवण्यायोग्य आहे. चिंता, भीती, टेन्शन घेऊन जर तुम्ही रस्त्यावर वाहन चालवत असाल तर अपघाताची शक्यता वाढणार. याउलट, स्वत:चे वाहन सुस्थितीत ठेवणे, वेग मर्यादेबाहेर जाऊ न देणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या हालचालींकडे लक्ष ठेवणे इत्यादींबाबत सावधगिरी बाळगून वाहन चालवले, तर अपघाताची शक्यता कमी करता येईल. इतकं करूनही दुसऱ्या चालकाच्या चुकीमुळे किंवा त्याच्या वाहनातील अनपेक्षित बिघाडामुळे जर त्याचे वाहन आपल्या अंगावर आदळले तर दुखापत, कदाचित मृत्यू असे अपरिहार्य परिणाम भोगण्याशिवाय आपल्या हातात काहीच नसते. जवळपास अशीच मानसिकता डॉक्टरी उपायांना साथ न देणाऱ्या रुग्णांमध्ये सापडेल. त्यांना प्रत्येक उपचाराच्या यशाची आणि 100% ठीक होऊ  याची खात्री हवी असते. डॉक्टरांनी सुचविलेल्या वैद्यकीय तपासण्या करून घेण्यात त्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते; कारण उद्या त्या चाचण्यांमधून काहीतरी भयंकर निघालं तर काय घ्या? ही धास्ती. खरंच काही गंभीर असेल तर ते आजच कळणं बरं नाही का? लगेच योग्य उपचारांना सुरुवात करता येईल. ती व्याधी प्राथमिक अवस्थेत असेल तर कदाचित त्यापासून पूर्णपणे मुक्त होता येईल. याउलट आपल्या भीतीपोटी, सत्य जाणून घेण्यात विलंब करीत गेलो, तर संभवनीय व्याधी उग्र रूप धारण करू शकते व तसे झाल्यास ती उत्तम उपचारांनाही दाद देणार नाही.

अनाठायी भीती आणि नकारात्मक विचारसरणी यामुळे व्यक्ती स्वत:चेच अहित करून घेणार. धास्ती वाटणाऱ्या गोष्टींना आमंत्रण देण्यापेक्षा सारासार विवेकबुद्धी वापरून त्यातल्यात्यात सकारात्मक राहणं आवश्यक आहे.  .

 

 

1 thought on “भित्या पोटी..”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *