जप आणि भूमिका

जप का आणि कसा करावा, त्याचा फायदा वा तोटा यासंबंधी एक सुंदर ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच पार पडली. आपले मन आणि त्याचा गुंता सोडवायला अनेकदा समुपदेशक उपलब्ध असतात परंतु आध्यात्मिक मनाशिवाय मनाला शांत करणं काहींना कठीण जाते.

काही प्राचीन तत्त्वज्ञान व त्यातील पद्धती वापरल्यास मनुष्याचा सर्वांगिण विकास करण्यास मदत होते. त्यातले अगदी छोटेछोटे उपायही सबळ असतात आणि मोठा परिणाम करून जातात. उदाहरणार्थ जप.

आता जप केल्याने कसला काय फरक पडणार म्हणून अनेकजण त्याच्या जवळ फिरकत नाहीत. पण याच वेळी ‘करून तर पाहू या’ असा विचारही करता येईल का हा प्रश्न पडायला हरकत नाही. फक्त मनाला शांतता म्हणून हवा असल्यास जप कुठे ही करता येतो. जप केला की चटकन मन एकाग्र व्हायला मदत होते. काही वेळा जप केल्याने आपला आत्मविश्वास वाढला असेही अनुभवास येते. जप हा भक्ती मार्गातला साधनेचा सर्वात सोपा प्रकार आहे. फक्त इष्टदेवतेचे स्मरण, असा जप सहज शक्य असतो. प्रत्येक धार्मिक ग्रंथामध्ये जपाचे महात्म्य वाचावयास मिळते. काही ठराविक मूळ मुद्दे:

१. जप करण्याआधी त्याची पद्धती व्यवस्थित माहिती करुन घेणे आवश्यक असते.

२. जपाचे अनेक प्रकार आहेत.

३. कुठलीही माहिती वाचल्या नंतर लगेच जप करण्याची घाई करू नये.

४. ज्या प्रकार चा जप गुरू ने दिला असेल तोच करावा. यासाठी योग्य गुरू फार महत्त्वाचा असतो.

५. मन एकाग्र करून जप केला पाहिजे.

६. जप ही एक प्रकारची सिद्धी आहे आणि ती साधनेतून मिळवावी लागते हे ध्यानात ठेवावे.

७. स्वतःची स्वच्छता त्याचबरोबर मनाची सात्विकता, योग्य आहार महत्त्वाचा.

जपाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी तीन प्रमुख प्रकार अनेकजण वापरतात.

१. वाचिक जप – म्हणजे वाचेने केलेला जप. मोठयाने उच्चार करून मंत्रांचे पठण. प्रत्येक शब्द त्यातील वर्ण सुयोग्य प्रकारे अनेकवार उच्चारले जातात. अत्यंत साधी आणि सोपी क्रिया असते. परंतु मनाची एकाग्रता यात अपेक्षित आहे. वाचिक जप केल्याने मेंदु मध्ये काही घटना घडू लागतात. मन एकाग्र करणे आणि भाषिक केंद्राची मदत म्हणून वाचिक जप कार्य करतो.

२. उपांशु जप – वाचिक जपामध्ये मन एकाग्र होण्याची प्राथमिक सवय की त्या पलिकडे पोहचण्याची उपांशु जपाची साधना सुरू होते. हा जप करतांना जिभेची हालचाल होते परंतु स्वर मात्र निव्वळ आपल्याला ऐकु येतील इतके कमी असतात. मनाचा ताबा अधिक प्रबळ झालेला असतो. अर्थात बाह्य जगात कितीही कोलाहल असला तरी मन स्थिर व एकाग्र असल्याने त्याचा आपल्या साधनेवर परिणाम होत नाही. उपांशु जप करत असताना मेंदुच्या सर्व भागांवर परिणाम होतो. कारण सर्व भाग आपल्याला एकाग्रतेसाठी मदत करतात. परंतु त्यातीलही मेंदुतील पुढील भागावर म्हणजे फ्रंटल लोबवर जास्त परिणाम होते असे आढळते. हा विभाग स्वतः वरील नियंत्रण राखण्याचे कार्य करतो. या शिवाय मनाची एकाग्रता ठेवण्यासही मदत करतो. रोज केलेल्या उपांशु जपाने या भागात कायमचे बदल घडतात. हे बदल एकाग्रता आणि स्व-नियमन यासाठी उपयोगी पडतात. या शिवाय काही प्रमाणात सेरेबेलम या स्मरणशक्तीचे नियंत्रण करणार्‍या भागावरही या जपाचा परिणाम होतो. तसेच मेंदुचा मध्य भाग, हा संदेशांची देवाणघेवाण नियंत्रित करतो. हा भाग उपांशु जपात कार्यरत होतो. उपांशु जपामध्ये हा विभाग एकाग्रतेचे संदेश फ्रंटल लोबला देतो आणि मग फ्रंटल लोबला तसे कार्य करण्याची सवय लागते.

३. मानस जप – हा जप करताना आपल्याला मिळालेल्या गुरूमंत्रावर संपूर्ण एकाग्रता अपेक्षित आहे. त्यातील प्रत्यके अक्षराचा विचार करायचा आहे. वाचिक जपात इतर आवाज आपल्याला येऊ नयेत म्हणून आपण मोठ्याने जप करून स्वतः ला या भौतिक जगापासून वेगळे करतो. उपांशु जप करताना बाहेरील आवाजापेक्षा मनातील प्रभावी एकाग्रता वाढलेली असते. पण मानस जपात निव्वळ विचारांच्या आधारे आपण स्वतःला स्थितप्रज्ञतेकडे नेतो. या एकाग्रतेचा उपयोग आपल्या मेंदुला अनेक प्रकारे होतो. मानस जपाने आपण आपल्या विचार पद्धतीला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी वापरू शकतो.

जप करताना अनेक नियमांचे पालन करावे लागते परंतु ते योग्य गुरूकडून शिकून घ्यावे लागतात. समुपदेशक अनेकदा तुमची विवेक बुद्धी, व्यक्तिमत्व, संयम, धारणा, आणि निर्णय शक्ती वाढविण्यासाठी ध्यान धारणा करायला सांगतात. जगात कुणी वाईट नाही पण कोण काय सांगतं आणि कशासाठी, याचा सारासार विचार आपणच करायला हवा. जप साधना जरूर करा जो गुरूंनी तुम्हाला दिलेला आहे. आपणही उठसुठ कुणालाही जप देऊ नये. योग्य माहिती घ्या, तयारी करा, आणि मगच व्यवस्थित जप करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *