सुखाची संकल्पना!

सुखाची संकल्पना!

 

“सुखी व्हा म्हणजे तुम्ही आरोग्य संपन्न व्हाल” अशा एका वेबिनार मध्ये आमची चर्चा चालू असताना अनेक मित्रांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले कारण हे उलटे आहे असे त्यांचे मत होते. “जो माणूस जीवनात यशस्वी असतो, आरोग्यसंपन्न असतो तोच सुखी असतो” असे त्यांचे मत प्रवाह होते. काही अंशी ठीक मानून चाललो आणि पुढील चर्चा करताना त्यांना मानवी मूल्यांचा दुसरा पैलू उलगडून दाखवला. सुख आधी की आरोग्यसंपन्नता आधी? मग काही मानसशास्त्रज्ञांनी केलेले संशोधन पहिले.

१. बहुसंख्य गुन्हेगार हे दु:खी घरातूनच आलेले असतात.

२. गुन्हेगारीची प्रवृत्ती म्हणजे सुद्धा रोगी मनाचे एक स्वरूपच !

३. अनेक मनोरुग्णांच्या आजारामागे दु:खद परिस्थितीच कारणीभूत असते, जिचे आघात त्याचे मन पेलू शकत नाही.

काहींनी स्वत:बाबत अशा काही अवास्तव अपेक्षा बाळगल्या की, आपली वास्तवाला सामोरं जाण्याची बुद्धीच नष्ट करून टाकलेली असते. खऱ्या जगाशी असलेला आपला संबंध पार तोडलेला असतो. “आपण भारताचे पंतप्रधान आहोत, खूप श्रीमंत आहोत” असं काहीतरी समजून ते सारे एका खोट्या जगात जगण्या-राहण्याचा प्रयत्न करीत असतात. काहींच्या अपेक्षा तशा फार मोठ्या नसतात. उदा. योग्य वयात लग्न होणं किंवा सुस्वभावी जीवनसाथी मिळून सुखाचा संसार, मुलबाळ होणं एवढ्याच एखादीच्या माफक अपेक्षा.

मग कुठेतरी याचा सोक्षमोक्ष व्हायला हवा.

१. माणसाच्या भावना व त्याचे शारीरिक आजार यांची सांगड घालतात.

२. राग, चीड, संताप, दु:ख, आनंद, प्रीती इत्यादी प्रत्येक भावनेनुसार विशिष्ट अशा रासायनिक प्रक्रिया शरीरात घडत असतात. म्हणूनच आपल्या शरीराला काही विघातक भावनांपासून वाचविणं अत्यावश्यक आहे.

३. भावना भ्रष्ट झाल्या की मानसिक आजार तर जडतातच; पण मनोजन्य शारीरिक आजारही जडणं शक्य आहे.

४. बहुतेक मोटार अपघाताचं मुख्य कारण ‘भावना-संक्रमण’ हेच आहे. राग, चिंता, भांडण, तणावातून गाडी चालवत असताना सर्वात जास्त अपघात झाले आहेत.

आपली भूमिका एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत नेणं हे असं धोकादायक असतं, म्हणूनच सुखी राहणं गरजेचे. कसे करायचे हे आपल्या सर्वांना परिचयाचे आहे.

१. स्वत:चा, इतरांचा आणि परिस्थितीचा त्यातील दोष-वाईटपणा यासकट स्वीकार करणे.

२. हे दोष, अडचणी, दु:ख, वाईटपणा झेलणारे तुम्ही एकटेच नसता; पण आयुष्य मात्र तुमचं एकट्याचं, एकदाच मिळालेलं असतं.

३. कोणताही वाईट प्रसंग, परिस्थिती आपल्यातील दोष किंवा इतरांचे अन्यायकारक वागणं हे एवढं मोठं नसतं की माणूस म्हणून ‘सुखानं’ जगण्याचा हक्कच ते काढून घेईल.

४. या सगळ्यापेक्षा मनुष्यत्वाचं मूल्य, त्याच्या जीवनाचं मूल्य नक्कीच अधिक!

म्हणूनच ‘सुखी’ राहा, म्हणजे या सर्वांपासून आपला बचाव होईल. कारण, ज्या वेळी एखादा माणूस सुखद विचारात दंग असतो तेव्हा;

१. त्याच्या डोळ्यांना अधिक चांगलं दिसत असतं.

२. त्याच्या जिभेला छान रुची असते.

३. त्याच्या नाकाला सुवासाची छान पारख असते.

४. स्मृतीसुद्धा ताजीतवानी असते.

५. विचारांचा व निर्णय शक्तीचा अहसास होतो.

६. ज्या वेळी माणूस आनंदात असतो तेव्हा त्याचं हृदय, जठर इ. सर्व इंद्रियं अगदी उत्तम काम करीत असतात.

तुम्ही म्हणाल, ‘सुखी राहायला कुणाला आवडणार नाही? पण नेहमीच कसं सुखी राहावयास मिळणार?’ बरोबर आहे, सभोवताच्या वातावरणात अशाच गोष्टी ऐकायला येतात.

१. संप, बंद, राजकीय पोळ्या भाजण्याचा दर आठवड्याचा कार्यक्रम.

२. अनावश्यक सोशल मीडियाचा वापर आणि त्यातून जन्म घेतलेली अशांतीची लेकरं.

३. वर्तमानत्राद्वारे आलेल्या नकारार्थी बातम्यांनी मन विषण्ण होते.

४. निकाल कमी लागतो म्हणून पालक, विद्यार्थी, शाळा चालक सगळ्यांना वाईट वाटते.

५. जीवघेणी स्पर्धा.

६. सासरी मुलीकडून सासुचा तर सासुकडून सुनेचा आणि शेवटी कौटुंबिक वाद.

७. बांदाची रेटारेट. नुसती घुसमट.

एक ना अनेक घडणाऱ्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याने सुखाची प्राप्ती कशी होणार? जगण्यासाठी जणू चिंता, काळज्या या आवश्यक बाबी झाल्या आहेत.

पण मानसिक तणाव हे काही नवीन नाहीत किंवा अगदी आजचेच नाहीत. जगाचा इतिहास सुरुवातीपासूनच अशा उलाढालींनी आणि उलथापालथीने भरला आहे. या अशा घडामोडी अगदी पूर्वापार काळापासूनच जगात चालत आलेल्या आहेत.

म्हणून जीवनाबद्दल काही तथ्य पाहायला हवीत.

१. माणसाच्या जीवनात चिंता करण्यायोग्य अशी कोणतीच घटना कधीच घडत नाही.

२. पक्षी हवेत उडतात. तुमच्या डोक्यावरूनही ते पक्षी भराऱ्या मारीत असतात. त्या पक्ष्यांना काही तुम्ही अटकाव करू शकत नाही; पण तुम्ही एवढी मात्र काळजी घ्यावयास हवी की ते पक्षी तुमच्या डोक्यावर घरटं बांधणार नाहीत.

३. ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे’ असे म्हणणारे ग. दि. माडगूळकर पुढं म्हणतात- ‘जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे.’ हे वस्त्र जरतारी आहे; दु:खाच्या पार्श्वभूमीवरच सुखाचे सौंदर्य वाढते ना? दु:ख कुणाच्या आयुष्यात नाही?

असंख्य तथ्ये रोज सुविचार प्रेरणादायी म्हणून एकमेकांना फॉरवर्ड करणारी आपण माणसे लगेच दुसऱ्याच क्षणी दुःखी होतो.

अवकाशात, अज्ञातात झेपावणारा मानव मन:शांतीच्या शोधात फिरत आहे. सारे काही मिळवूनही वैफल्यग्रस्त झाला आहे. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आणि ‘हसण्याची, सुखी राहण्याची’ सवय आपण स्वत:ला किती लावून घेतली आहे, यावरच आपले सुख अवलंबून आहे. नाही का? पण भारतीयांना काही हे तत्त्वज्ञान नवीन नाही.

‘सौख्यासाठी जग तळमळते ।

दु:ख कुणाला कधी न टळते,

जो हसला तो अमृत प्याला ।

हसण्यासाठी जन्म आपुला.’

अडचणी-आपत्ती, ताण-तणावांबरोबरच आपल्याला आयुष्य काढलं पाहिजे – सगळ्यांनाच ! आहे त्या परिस्थितीत जर मन:शांती मिळविता येत नसेल तर मग आपले आयुष्य निकामी आहे, असंच समजावयास हवं.

©श्रीकांत कुलांगे
(Psychologist)
9890420209
(मी सध्या परदेशात असल्याकारणाने फोन वर संपर्क होऊ शकत नाही. WhatsApp वरून संपर्क साधावा.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *