मला कुणालाही काही विचारायला लाज का वाटते याबाबत एका व्यक्तीने त्याच्या स्वभावात काही बदल करावा लागेल का म्हणून माझ्याशी चर्चा केली.
त्याच्याशी बोलून पूर्ण माहिती घेतल्यानंतर काही गोष्टी नक्कीच समजल्या आणि त्यातून त्याने काय करावं याचं समुपदेशन केलं. लोक विचारायला का घाबरतात? त्याला काही करणे आहेत.
१. विचारल्यामुळे आपण गरजू, बावळट ठरू अशी भीती त्यांना वाटते.
२. नकाराची भीती वाटते. ‘नाही’ हा शब्द ऐकण्याची भीती त्यांना वाटते.
३. कुणाला विचारल्यानंतर त्यांना आपले सिक्रेट समजेल म्हणून विचारत नाहीत.
४. आपले अज्ञान उघडे होईल ही भीती.
५. उत्तर सरळ मिळेल का याची शास्वती नाही.
६. चुकीची माहिती तपासून पहावी लागेल का हा प्रश्न.
७. मानसिक न्यूनगंड.
८. आत्मविश्वासाचा अभाव.
९. कुणाला विचारावं हा प्रश्न.
दु:खाची गोष्ट ही की प्रत्यक्षात अगोदरच ते स्वत:ला नाकारित असतात. दुसऱ्या कोणी नकार देण्यापूर्वीच ते स्वत:ला नाकारतात. आपल्याला नकार मिळणार असे गृहित धरण्याची गरज काय? जे काही आपल्याला हवे आहे किंवा जे गरजेचे आहे ते विचारण्याचा धोका पत्करा. ते ‘नाही’ म्हणाले तरीही आपली स्थिती काही पूर्वीपेक्षा वाईट होणार नाही. पण जर ते ‘होय’ म्हणाले तर मात्र आपली स्थिती लक्षणीयरित्या सुधारू शकते. केवळ विचारण्याची तयारी ठेवल्यामुळे आपल्याला पगारवाढ मिळू शकते, देणगी मिळू शकते, सूट मिळू शकते, मोफत नमुना मिळू शकतो, एखाद्याची किंवा एखादीची भेट मिळू शकते, अधिक चांगल्याप्रकारे व्यवहार होऊ शकतो, चांगले काम मिळू शकते, अधिक सोयीची तारीख मिळू शकते, वाढीव मुदत मिळू शकते, सुट्टी मिळू शकते किंवा आपल्याला घरकामात मदत मिळू शकते. हो की नाही?
आपल्याला पाहिजे असलेल्या किंवा आवश्यक असलेल्या गोष्टी कशा विचाराव्यात याचे एक शास्त्र आहे.
१. मागितलेली गोष्ट आपल्याला मिळेलच या विश्वासाने मागायची. सकारात्मक अपेक्षा ठेवून मागा.
२. आपल्याला मिळेल असे गृहित धरा.
३. जी व्यक्ती देऊ शकेल अशा व्यक्तीला मागा. योग्य व्यक्तीची निवड करा.
४. आपली मागणी स्पष्ट व मुद्देसूद असू द्या.
५. पुन्हा पुन्हा विचारा. चिकाटी हे यशस्वी जीवनाचे अतिशय महत्त्वाचे तत्त्व आहे.
एक इंटरेस्टिंग अभ्यास मार्केटिंग मध्ये केला गेला आणि काही महत्त्वपूर्ण तथ्य मिळाली.
१. ४४% विक्रेते पहिल्या फोन कॉल नंतर प्रयत्न सोडून देतात.
२. २४% विक्रेते दुसऱ्या कॉलनंतर प्रयत्न थांबवितात.
३. १४% विक्रेते तिसऱ्या कॉलनंतर प्रयत्न सोडून देतात.
४. १२% विक्रेते चौथ्या प्रयत्नानंतर त्यांचा माल विकण्याचा विचार सोडून देतात.
याचा अर्थ असा होतो की ९४% विक्रेते चौथ्या फोननंतर विक्रीचा प्रयत्न सोडून देतात. परंतु एकूण विक्रीपैकी ६०% विक्री ही चौथ्या फोननंतरच होते. याचा अर्थ असा होतो की ९४% विक्रेते ६०% संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी घेत नाहीत.
फक्त क्षमता असून चालणार नाही, चिकाटी पाहिजे. यशस्वी होण्यासाठी तुम्ही सतत विचारले पाहिजे, विचारले पाहिजे आणि विचारत राहिले पाहिजे. हाच फंडा जीवनात कुठे कामाला येतो.
तुम्ही विचारले पाहिजे. विचारणे हे माझ्या मते यशस्वी व सुखी होण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त परंतु सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेले रहस्य आहे. पर्सी रॉस (स्वकर्तृत्वाने अब्जाधीश बनलेला उद्योजक)
©श्रीकांत कुलांगे
9890420209