नेहाची आई सांगत होती, ‘मी प्रत्येक वेळेला नेहाचे पेपर तपासले. हिनं पेपरमध्ये फारसं काही लिहिलेलंच नसतं. लिहिलं तरी प्रश्नाला धरून नसतं. प्रश्नक्रमांकही घातलेला नसतो. तिच्या टीचर्स खूप रागावतात, बोलतात. असं हताशपणे सांगत नेहाला माझ्याशी बोलायला सांगितलं. ती बिचारी कुठून सुरुवात करायची या गोंधळात.
हळूहळू तिला बोलकं करून तिच्या मनात शिरलो आणि घर घर की कहानी बाहेर आली. नेहा सारखे असंख्य पाल्य आपल्या व्यथा कुणालाच सांगत नसतात. काय विचार करतात अशी मुले?
१. आमची बहीण भावाशी तुलना केली जाते.
२. खूप बोलणे बसतात.
३. मला बोलावेसे वाटत नाही.
४. मला समजून घेणारे कुणीच नाहीत.
५. आई बाबा नुसतेच खेकसत असतात, भांडतात.
६. आजी आजोबा अजूनही त्यांच्याच विश्वात आहेत. त्यांच्या पिढीचे आदर्श आज सगळेच लागू होतात असे नाही.
७. एकत्र कुटुंबाची पद्धत आम्हालासुधा हवी असते, परंतु त्यात नकारात्मकता नसावी.
८. प्रत्येक गोष्टीला शंकेच्या स्वरूपात का पाहतात?
९. आम्ही चुकतो हे समजते, पण समजून सांगायची पद्धत नेहमीच उग्र का असते?
१०. आम्हालाही कंटाळा येतो.
११. तेच तेच करायचे , नाविन्याची झालर नाही, जीव नुसता गुदमरून जातो.
१२. त्यात आमच्याकडून असलेल्या अपेक्षा.
नेहाची लिस्ट संपता संपेना. मी मात्र विचारत पडलो की खरंच कोण जिम्मेदार आहे अशा विचारांना. ती शांत झाल्यावर तिला गंमत म्हणून विचारले चल आपण तुझी बुद्धिमत्ता कुंडली तयार करू, चालेल? तिला पडलेला प्रश्न लगेच ध्यानात आला की कोण अशी कुंडली काढू शकते. अर्थात त्याला aptitude test म्हणतो. काय असते त्यात? देवानं आपल्याला जे निसर्गत:च देऊन पाठवलंय ते शोधून काढायचं आणि त्यानुसार आपला शिक्षणक्रम व व्यवसाय निवडायचा!
१. सर्वसामान्य आकलन क्षमता (Cognitive intelligence)
२. तर्कविचार क्षमता (Reasoning capacity)
३. अभाषिक स्मृती क्षमता (Nonverbal intelligence)
४. अवकाशबोधन क्षमता (Numerical intelligence)
५. भाषिक क्षमता (Verbal intelligence)
६. अंकज्ञान (Numerical intelligence)
७. अंक स्मृती (Numerical intelligence)
८. सामाजिक क्षमता (Social intelligence)
९. कलात्मकता (Artistic ability)
१०. स्वामित्व (power ability)
११. श्रद्धा (Religious)
१२. व्यावहारिक क्षमता (Practical ability)
अशा अनेक प्रकारांबाबत ही चाचणी घेतली जाते आणि आपली कुंडली तयार. याचबरोबर, आर्किटेचरल अॅबिलिटीज, लीडरशीप क्वालिटीज सोशल इंटेलिजन्स अशा अनेक गोष्टी यातून कळतात.
नेहाच्या आईला समजून सांगितले की मुलाचे पाय पाळण्यात दिसण्याची ही आधुनिक मानसशास्त्रीय पद्धत. तुमचा मुलगा किंवा मुलगी कोणत्या क्षेत्रात मोठेपणी चमकू शकतात, हे यामुळं जाणून घेता येतं.
नेहाचा ‘अॅप्टिट्यूड टेस्ट’चा रिपोर्ट आला. समुपदेशन करताना तिच्या आई-वडिलांशी बोलल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, तिच्या या गुणांकडे चक्क दुर्लक्ष केलं गेलं होतं, एवढच नव्हे तर ‘नुसतेच कॉम्प्युटर वर खेळ खेळून काय करणार? आधी अभ्यास कर!’ असं सतत सांगिल्यामुळं खेळातून प्रोग्रामिंग शिकणाऱ्या नेहाच्या वाट्याला कौतुकाऐवजी हेटाळणी आली होती. जे जमतं-आवडतं ते करायला न मिळाल्यामुळं आणि कोणत्याच बाबतीत कौतुक, प्रशंसा न झाल्यामुळं नेहा आत्मविश्वास हरवून बसली होती. तिचा आत्मगौरव तर खूपच दुखावला गेला होता आणि परिणामत: नेहा काहीच करत नव्हती… अभ्याससुद्धा!
काही गोष्टी आपल्या सर्वांसाठी.
१. सकारात्मकच बोललं पाहिजे.
२. मुलांची इतरांशी तुलना बंद.
३. त्यांच्या ॲक्टिवितीज निरखून पहा.
४. समजून सांगण्याची निरोगी पद्धत शोधा.
५. आपल्या कामाच्या व्यापात त्यांचं बालपण विसरू नका.
६. नेहमी कमर्शिअल नजरेतून न बघता त्यांच्या आवडी निवडी खरंच त्यांना पुढे मदत करतील का यावर चर्चा करा.
७. सर्वात महत्त्वाचं, मुलांसमोर भांडू नका, एकमेकांना ओरडू नका.
या गोष्टी आपण खरंच सिरीयसली घ्यायला हव्यात कारण त्या मुलांकडून आपल्याला त्यांच्या डोळ्यातून दिसतात. फक्त निरखून एकदा त्यांच्या डोळ्यात पहायला हवे. कृपा करून वेळ काढा आणि नक्की बघाच काय दिसते ते…
©श्रीकांत कुलांगे
9890420209