बदला आणि मानसिकता

किशोर प्रचंड संतापात माझ्याशी काल बोलत होता. त्याची कुणीतरी जाणुनबुजून छेड काढतेय, त्याला उसकवण्याचा प्रयत्न करतंय हे जाणवत होतं. त्याची पूर्ण माहिती ऐकून घेऊन त्याला फक्त एकच प्रश्न विचारला की यामध्ये सर्वात दुःखी कोण आहे, तू की तो. आता मात्र तो दोन मिनिटे शांत होऊन बोलला की “मी”. त्याला उत्तर माहिती होतं परंतु राग व्यवस्थापनाची त्याला (anger management) माहिती नव्हती. 

त्याला सांगितलं की आपल्या वैर्‍यासाठी आपल्या द्वेषाची भट्टी इतकी तीव्र करू नका की तुम्ही स्वत:ही त्यामध्ये जळून जाल.

आपण आपल्या वैर्‍याचा द्वेष करीत असतो तेव्हा;

१. आपण त्याला आपल्यावर स्वार होण्यासाठी शक्ती प्रदान करीत असतो.

२. आपल्या झोपेवर, भूकेवर, ब्लड प्रेशरवर, आरोग्यावर, सुखावर स्वार होण्याची शक्ती त्याला देतो.

३. त्यांच्यामुळे आपण किती चिंतीत आहोत, किती दु:खी आहोत, किती परेशान आहोत हे जर आपल्या वैर्‍याला कळले तर तो आनंदाने नाचायला लागेल.

४. आपल्या द्वेषामुळे त्याचे तर काही नुकसान होत नाही, उलट आपलेच दिवस रात्र नरक होतात.

५. कौटुंबिक, मानसिक बरोबर भावनिक नात्यांची वीण अजून क्षीण होते.

६. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वाचे मुख्य लक्षण द्वेष हेच असते. हा द्वेष दीर्घकाळासाठी राहतो तेंव्हा रक्तदाब वाढून नंतर अशा व्यक्तीला हृदयविकारही जडतो.

७. अनेक प्रश्न निर्माण होत जातात कारण आपली विचार करण्याची क्षमता कमी होते.

८. वेळेचे व्यवस्थापन करायला आणि आर्थिक निर्णय घ्यायला उशीर होतो.

९. तिरस्कारामुळे जेवणाचा आनंद घेण्याची आपली क्षमताच नष्ट होते. चेहरा निस्तेज होतो, काही करण्याची शक्ती रहात नाही.

स्वार्थी लोक तुमचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करीत असतील तर तुमच्या यादीतून त्यांचे नाव वगळा, पण त्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही बदला घेण्याचा प्रयत्न करता तेव्हा समोरच्या व्यक्तीचे जितके नुकसान करता त्यापेक्षा अधिक तुम्ही स्वत:चे नुकसान करून घेता हे जगजाहीर आहे. काहीजण जाहीररीत्या दुशमनी घेतात तर मनात कुढत जगतात. दोन्ही ठिकाणी त्रास आहेच.

आपल्या वैर्‍याला हे कळले की त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेल्या तिरस्कारामुळे आपले रक्त जळत आहे, आपण थकत आहोत, आपण नर्व्हस होत आहोत, आपले सौंद़र्य नष्ट होत आहे. आपल्याला हृदय विकार जडत आहे …. इतकेच नाही तर आपले आयुष्यही कमी होत आहे तर तो आनंदाने का वेडा होणार नाही? मग आपण काय करावं हे अनेक प्रवचनात आपण ऐकलेच आहे. किंबहुना काही गोष्टी पाळत आलो आहोत.

१. अजिबात न रागावणे. त्यासाठी वेगवेगळ्या राग व्यवस्थापन कोर्सेस आहेत.

२. या पृथ्वीवर कोणतीही कॉस्मेटिक सर्जरी त्यांचा चेहरा इतका सुंदर करू शकत नाही जितका प्रेम, कोमलता आणि क्षमा यामुळे भरलेले हृदय करू शकते.

३. आपण आपल्या वैर्‍यावर प्रेम करू शकत नसलो तरी कमीत कमी आपण स्वत:वर तरी प्रेम करावे.

४. गोड प्रत्युत्तराने राग शांत होतो.

५. शक्य असेल तर कोणाबद्दलच शत्रुत्त्व पाळू नये.

६. आपल्यापेक्षा खूप मोठ्या असलेल्या एखाद्या कामाला लागणे. तेव्हा आपण अपमान आणि वैराची पर्वा करीत नाही.

७. समुपदेशन, अध्यात्म, योगाभ्यास, व्यायाम आपल्या मनाला शांत ठेवण्यास मदत करतात.

आपल्या वैर्‍यावर प्रेम करण्याइतके मोठे आपण संत किंवा थोर व्यक्ती नसलो तरीही किमान आपले आरोग्य आणि सुखासाठी आपण त्यांना क्षमा करून विसरून तर जाऊ शकतो. हीच सर्वात स्मार्ट पद्धत आहे.

आपण कोणावर चिडणार नाही, आपण कोणावर नाराज होणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, कोणाला जखमी करणार नाही, कोणाचा तिरस्कार करणार नाही, हे प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायला हवे. मानसिक आजार कमी करायचा असेल तर प्रयत्न करायला काय हरकत आहे? हो की नाही?

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *