फक्त आज

‘तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असा कोणता धडा शिकला?’ हा प्रश्न मी एक समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तीला विचारला. थेरपीचा एक भाग म्हणून त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा होती. त्याचे उत्तरही माफक होते परंतु त्यात म्हणावी अशी गहराई नव्हती. 

मी आज आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे, हा आतापर्यंत मी शिकलेला सर्वात महत्त्वाचा धडा माझ्यासाठी होता. प्रत्येक जण काहींना काही धडा रोज शिकत असतोच. पण तो आपल्या ध्यानात येत नाही किंवा आपल्याला माहीत होत नाही.

मग त्याच्याशी बोलताना त्याला आनंदी कसं राहायचं याबाबत चर्चा केली जे त्याच्या उत्तराशी समर्पक होते.

“आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग असा आहे की आपण आनंदी नसलो तरीही आपण आनंदात बसावे, तसेच अशा प्रकारे वागावे आणि बोलावे की आपण जणू काही खरोखरच आनंदी आहोत.” आपले नशीब घडविणारी किंवा बिघडवणारी एक शक्ती म्हणजे आपला मानसिक दृष्टिकोन होय. ह्या दृष्टिकोनावर अवलंबून राहून काही ठराविक गोष्टी त्याला रोज करायला सांगितल्या ज्या त्याला आनंदी ठेवण्यास कारणीभूत ठरतील. बघा, तुम्हालाही जमल्या तर नक्कीच कळवा.

१. फक्त आजच्यासाठी मी आनंदी राहणार आहे. बहुतेक लोक तितकेच सुखी होतात, जितका ते सुखी राहण्याचा संकल्प करीत असतात. सुख आतून येते. बाह्य घटनांशी त्याचा काहीही संबंध असत नाही.

२. हे जग जसे आहे त्याप्रमाणे मी मला बदलण्याचा मी आजचा दिवस प्रयत्न करणार आहे. त्याऐवजी मी जगाला आपल्या इच्छेनुसार बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. माझे कुटुंब, माझा व्यवसाय, माझे नशीब जसे असेल त्याप्रमाणे मी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न करील.

३. फक्त आजच्यासाठी मी माझ्या शरीराची काळजी घेईन. मी व्यायाम करीन. शरीराचे पोषण करीन. त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. म्हणजे माझ्या आज्ञेचे पालन करणार्‍या आदर्श यंत्रासारखे ते काम करू शकेल.

४. फक्त आजच्यासाठी मी माझा मेंदू सशक्त करण्याचा प्रयत्न करील. मी काही उपयुक्त गोष्टी शिकेन. मी आळशी होणार नाही. मी असे काही तरी वाचीन ज्यासाठी विचार, प्रयत्न आणि एकाग्रतेची आवश्यकता असेल.

५. फक्त आजच्यासाठी मी माझ्या आत्म्याचा तीन प्रकारे व्यायाम करून घेईल. मी कोणाचे तरी भले करील. तेही अशा प्रकारे करेल की त्याला माझे नाव कळता कामा नये.

६. फक्त आजच्यासाठी मी आनंदी राहीन. मी जितका जास्त चांगला दिसू शकेन. तितका दिसेन. जितके चांगले कपडे घालता येतील तितके घालेन. फक्त आजच्यासाठी खालच्या स्वरात बोलेन आणि शालीनतेने वागेन. ज्यांचे कौतुक करता येईल त्यांचे कौतुक करील. कोणाचीही निंदा करणार नाही. कोणाच्या चुका काढणार नाही. कोणावर स्वार होण्याचा प्रयत्न करणार नाही की कोणाला सुधारण्याचा प्रयत्न करणार नाही.

७. आजच्या दिवशी मी फक्त आजच्या दिवसासाठी जगण्याचा प्रयत्न करीन आणि सर्व आयुष्यातील समस्यांशी सामना करण्याचा प्रयत्न करणार नाही.

८. फक्त आजच्यासाठी मी एक योजना आखीन. प्रत्येक तासाला मी काय करणार आहे ते मी लिहून काढीन. कदाचित मी त्याचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही, पण माझ्याकडे एक योजना तर तयार असेल. घाई गडबड आणि अनिर्णय हे माझे दोन राक्षस यामुळे दूर पळून जातील.

९. फक्त आजच मी माझ्यासाठी अर्धा तास वेगळा काढील आणि त्या वेळेत शांतपणे बसून विश्रांती घेईन. त्या अर्ध्या तासात मी अनेक वेळा देवाबद्दल विचार करीन कारण त्यामुळे माझ्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होईल.

१०. फक्त आजच्यासाठी मी अजिबात घाबरणार, भिणार नाही. मी आनंदी राहील. प्रत्येक सुंदर गोष्टीचा अस्वाद घेईन. मी ज्यांच्यावर प्रेम करतो तेही माझ्यावर प्रेम करतील यावर मी विश्वास ठेवीन.

आपण आनंदी आणि रचनात्मक चिंतनाचा दैनिक कार्यक्रम करून आपल्या सुखासाठी संघर्ष करायला हवा.

तुम्हाला सुख आणि शांततेचा दृष्टिकोन विकसित करायचा असेल तर त्यासाठी असलेला हाच पहिला नियम आहे – आनंदाचा विचार करा. आनंदाचे नाटक करा. मग तुम्हाला आनंदाचा अनुभव येईल. या विचारात सातत्य हवं. चांगला अनुभव आलाच, तर इतरांनाही सांगा.

 

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ज्ञ

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *