मनोजन्य आजार आणि व्यक्तिमत्व

आपले कितीतरी आजार मनोजन्य (सायकॉलॉजिकल) असतात. खरं दुखणं असतं मनाचं आणि ते प्रकट होतं शारीरिक आजाराच्या स्वरुपात. शरीरावर मनाचे परिणाम होतात हे आपल्याला माहित आहे. अत्यंतिक भावनाक्षोभाने लोक प्रत्यक्षत: आंधळे, मुके आणि लुळे-पांगळे होतात अशी कितीतरी उदाहरणं वैद्यकीय इतिहासात नमूद आहेत.

आपलं मन आणि शरीर यांचा अतूट संबंध आहे. आपल्या शरीरात जे जे काही घडतं त्याचा मनावर परिणाम होतो आणि आपल्या मनात जे जे घडतं त्याचा शरीरावर परिणाम होतो.
चांगल्या भावनांचा चांगला परिणाम होणार आणि वाईट भावनांचा वाईट परिणाम घडणार हे उघड आहे.

प्रसन्नता, धर्य अशा भावना आपण ठेवल्या तर आपले स्वास्थ्य आणि आरोग्य यांना त्या उपकारक ठरतील. उलट क्रोध किंवा भय अशांसारख्या भावनांनी आपले स्वास्थ्य आणि आरोग्य बिघडून जाईल ह्या सामान्य अनुभवांच्या गोष्टी आहेत. तरीही यामध्ये काही तथ्ये पाहूया.

१. क्रोध किंवा भय या भावना निसर्गदत्त आहेत आणि माणसाला त्या आत्मरक्षणासाठी उपयोगी पडाव्यात अशी निसर्गाची योजना असते.
२. प्रतिकार किंवा पलायन या दोन गोष्टी आपल्या जवळ असतात परंतु निर्णय तुमच्या विचारशक्तीवर अवलंबून आहे.
३. आपल्या भावनांना आपण कसं मॅनेज करतो ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं.
४. असुरक्षितपणाची भावना ही सर्वांनाच असते.
५. प्रत्येक समस्येला उत्तर असते. हे संकट आपण प्रतिकार किंवा पलायन यापैकी कुठलाही पर्याय वापरून स्वतःचा बचाव करतो.
६. मनातील भावनांचा संघर्ष कोणत्याही रीतीने मिटवता आला नाही तर वर्तनविषयक विकृतीत किंवा आजारपणात त्याचं रूपांतर होतं.

माणसाचे अनेक आजार त्याच्या मनात चालू असलेल्या भावनिक संघर्षातून निर्माण झालेले असतात हे मत वैद्यकीय क्षेत्रात आता अधिकाधिक ग्राह्य मानले जाऊ लागले आहे. त्यामुळे आता आपले आजार थांबवण्यासाठी किंवा त्यांना पूर्णपणे बरे करण्यासाठी मानसशास्त्रीय भाग हा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. त्यासाठी व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करणं गरजेचं झालं आहे. आजार तर औषधांनी ठीक होतात परंतु काही कालावधीत ते दुसऱ्या आजाराने त्रस्त होत असतील तर मात्र इतर पर्याय पहावे लागतात.

१. व्यक्तिमत्वातील बिघाड शोधून ते व्यक्तिमत्त्व निकोप बनवण्यावर अधिक भर दिला गेला पाहिजे.
२. मनोजण्य आजारपणाचे मूळ कारण शोधणे आवश्यक.
३. या व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकास लहानपणापासून कसा झालंय याचा इतिहास महत्वाचा असतो.
४. झालेल्या चुकातून वाईट वाटून न घेता त्यावर आत्मविश्वासपूर्ण काम करून पुढे चालण्यात शहाणपण.
५. मानहानी आणि मनाला लागून घेणे यावर थोडाफार विचार करणं आवश्यक. अनावश्यक त्या बाबींना बाजूला सारणे गरजेचे.
६. मानसिक आरोग्य तपासणी वेळोवेळी करून घेणे हे हिताचं. बऱ्याच आजारांचं मूळ इथेच सापडू शकते.
७. प्रसंगी मानसोपचार तज्ज्ञाशी बोलणे हे आपल्या अनेक भावनांना व्यवस्थितरित्या मॅनेज करण्यासाठी उपयुक्त आहे.
८. घरातील वातावरणनिर्मिती सुंदर हवी. तथापि सर्व सदस्य सुंदर मनाची असतात असं नसतं. तरीही त्यांचा समावेश करून घेऊन, इगो न दुखावता, कार्य करण्याची सवय कराच.
९. चांगला आहार, नित्य व्यायाम, जप व प्रार्थना, चांगल्या लोकांच्या संगती, सोशल मीडियाचा चांगला वापर, आपले आरोग्य चांगले ठेऊ शकतो.

आपल्या विशिष्ट व्यक्तिमत्वाला अनुसरून माणूस आपलं वर्तन ठेवतो. माणसाच्या प्रत्येक विचारावर आणि कृतीवर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटलेला असतो. बघणं, बोलणं, बसणं, चालणं इत्यादि साध्या कृतीतही माणसाचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत झालेलं असतं. आजारपण हीदेखील एक कृती आहे. जाणून बुजून केलेली नसली आणि नकळत झालेली असली तरी देखील आजारपण ही माणसाच्या हातून घडलेली एक कृतीच असते. या कृतीतही माणसाचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होतं.

सायकॉलॉजिकल आजारांविषयी सर्वसामान्य लोकांच्या ज्या विपर्यस्त कल्पना असतात त्या तुमच्या निदर्शनास आणून देणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून हा आजचा ब्लॉग. हे आजार जरी मनानं आणलेला असला तरी कोणत्या मनाने आणला हे आपण ध्यानात घेत नाही म्हणून गल्लत होते. शेवटी एकच वाक्य सांगेन “आजार हा आपल्याला हवा असतो म्हणून येतो!!”

©श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ
9890420209

1 thought on “मनोजन्य आजार आणि व्यक्तिमत्व”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *