मनोजन्य आजार

मागील ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की माणसाला आजार हवा असतो म्हणून येतो. अनेकांनी या वाक्याचा अर्थ विचारला. कारण हे आपल्या अनुभवाच्या विरुद्ध आहे. साहजिकच, माणसाला जर आजार हवासा वाटला असता तर तो त्यातून मुक्त होण्यासाठी एवढी जीवाची धडपड कशाला करील?

परंतु या ठिकाणी ‘हवा’ हा शब्द वापरला, हवा असतो म्हणजे आवडणारा असतो असं नव्हे.  पण बऱ्याचदा मनोशारीरिक आजारांमध्ये असे अनुभव येतात.  प्रत्येकाचे व्यक्तीमत्व वेगळे असते. जेंव्हा आपल्या व्यक्तिमत्वाला अचानक धोका निर्माण होतो, आणि तीच्यामधून आपली सुटका करून घेण्यात अपयशी ठरलो तर आजार हाच एक मार्ग उपयुक्त ठरण्यासारखा असतो. मग माणूस आजारी पडतो. उदा. द्यायचे झाले तर अनेक विद्यार्थ्यांचे देता येईल जे परीक्षेच्या आधी नेमके आजारी पडतात. आजार हवा असतो म्हणून येतो हे जे मी म्हटलं ते या अर्थानं, आवडणारा असतो या अर्थानं नव्हे. अनेक कारणे आहेत असे घडण्यासाठी.

१. ठराविक गोष्टीसाठी प्रेम व्यक्त करणं व इतर गोष्टींकडे दुर्लक्ष.
२. बालपणापासून मनावर उमटलेले ठसे.
३. लक्ष वेधून घेण्याचे साधन म्हणून पाहणे.
४. वडीलधारी मंडळींचा समजूतदारपणा नसणं.
५. स्वानुभवातून अथवा इतरांच्या अनुकरणातून चुकीच्या पद्धती शिकणे.
६. अपयशाची स्वतःवरची जबाबदारी झटकून टाकायला आणि आपला आब कायम ठेवला ही वृत्ती उपयोगी ठरते असे अनुभव असणे.
७. दुर्लक्षित व्यक्ती. प्रेमाचा ओलावा नसणं. वैफल्ग्रस्त, नैराश्य.
८. आपला कामचुकारपणा किंवा कंटाळा झाकण्यासाठी.
९. मनासारखं व्हावं म्हणून भावनिक ब्लॅकमेल करणं. स्त्री, पुरुष, व मुलं यांना लागू.
१०. अंतर्गत संघर्ष. मनातली खदखद.

आपला विषय आहे मनोजन्य आजारांचा, विशिष्ट घाटाच्या व्यक्तिमत्त्वातून निर्माण झालेल्या वर्तन विकृतींचा नव्हे. वर्तन विकृती हे एक प्रकारचं मनोजन्य आजारपणाच आहे. पण या विकृतीत प्रत्यक्ष शारीरिक आजारपण नसतं. काही मानसिक आजारी माणसं आपल्या मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी या हत्याराचा वारंवार उपयोग करतात. त्याचे त्यांना दुय्यम फायदे मिळतात जसे की, नोकरीत, घरात कामात सवलत मिळणे, पाहिजे ती गोष्ट करून मिळते. परंतु ती त्यांची नकळत सवय पडते. बऱ्याचदा मनोजन्य आजार जर वेळेत नीट हाताळले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाते. कारण;

१. मानसिक आजारपणाचं मूळ उद्दिष्ट कमी-अधिक प्रमाणात साध्य होत असताना, त्या आजारपणाचे काही अनुवंशिक किंवा दुय्यम लाभ पदरी पडत असल्याचा रुग्णाला अनुभव येतो.
२. मूळ उद्दिष्ट पूर्ण सिद्ध झालं किंवा न झालं तरी हे दुय्यम लाभ पुष्कळदा इतके महत्त्वाचे ठरतात की त्यासाठीच ते आजारपण पुढेही चालू राहतं.
३. अशी लोकं, आजार खरा, कष्ट खरे पण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्वाला जो धोका निर्माण होतो, तो सहन करण्यापेक्षा आजाराचे हाल अधिक श्रेयस्कर वाटतात.
४. या मानसिक आजाराच्या प्रक्रियेत conscious मनाला थांगपत्ताही नसतो. ही सारी प्रक्रिया unconscious मनात घडत असते. त्यांचाच पगडा आपल्या मनावर जास्त असतो.

आपल्या वागण्यावर, बोलण्या चालण्यावर, विचारांवर भावनांवर आणि अनेक व्याधींवर unconscious  मनाचा फार मोठा प्रभाव पडत असतो. याबाबत मानसशास्त्रीय संशोधनात खूप मनोविश्र्लेशन करण्यात आले. यामधून बाहेर पडण्यासाठी ठराविक प्रबोधन होणे गरजेचे असते. सर्वसामान्यांना समजणे आवश्यक आहे.

१. व्यक्तीचा स्वभाव कित्येकदा लगेच समजत नाही. हळूहळू तो काही कारणानं समोर येतो. स्वभाव बदलाचा बारकाईने विचार करा.
२. लहानपणी मुलांवर संस्कार करताना त्यांना चांगलं, वाईट समजून सांगा. आपले हुकूम सोडायची सवय योग्य नव्हे.
३. नवीन सून घरात आल्यास तिच्या मनाला अनुकूल वातावरण निर्मिती होऊद्या. तिला वेळ द्या, प्रसंगी सावधानतेने, कानउघाडणी होणेही गरजेचे असते. अर्थात हे सर्वानाच लागू पडते.
४. अपेक्षाभंग कसा सहन करायचा हे मुलं मोठ्यांना पाहून शिकतात. सहनशक्ती ची ओळख लवकर करून घेणं आवश्यक.
५. आपल्या बोलण्यात प्रेमाचा ओलावा असूद्या.
६. आपले हावभाव योग्य आहेत का त्रासिक ते जरा आरशात पहा
७. दुजाभाव नको. आवडते, नावडते नात्यात नकोच.
८. आपली मनाची तयारी करावीच लागते. व्यक्तिमत्व कणखर असायलाच हवं. त्यासाठी व्यक्तिमत्व विकास लहानपणापासून करा.
९. साम दाम दंड भेद यासाठी मनाने तयार होणे काळाची गरज आहे.
१०. सर्वात महत्त्वाचं, मानसिक आजाराने त्रस्त होऊ नका. ती आजारी पडायची पहिली पायरी असते.

मानसोपचार, ध्यान धारणा, प्रार्थना, चांगल्या लोकांचा सहवास, संकटाला सामोरे जायला बळ, सभोवतालच्या वातावरणातील बदल, शिक्षण, नोकरी, दैनंदिन कार्य, व्यायाम, आणि सामाजिक कार्यात हातभार, येवढं केलं तरी मानसिक आजारातून मुक्ती मिळते. आयुष्यात प्रत्येक क्षण चांगलाच असेल असे नाही म्हणून दुःखही पचवायला देव शिकवतो. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, आजार हवा असतो म्हणून येतो.

©श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *