अयोग्य निंदा आणि मार्ग

आजकल निंदा करणं रोजचं झालं आहे. कुणीही उठावं आणि कुणाचीही निंदा करावी. लोकशाहीमध्ये त्यातल्या त्यात राजकारणातून अनेकदा अशा निंदा ऐकून, किती हा मूर्खपणा म्हणून आपण जळफळाट करत असतो. अर्थात त्याचा आपल्याशी कसलाही संबंध नसताना मानसिक यातना मात्र भोगाव्या लागतात. एका थोर पुरुषाने म्हटले आहे, “नीच दर्जाचे लोक हे थोर व्यक्तींच्या चुका आणि मूर्खपणाचा खूपच जास्त आनंद घेत असतात.” अर्थात तूर्त तरी अशाच एका केस संबंधी हा विषय आहे. माझी निंदा अयोग्य आणि विनाकारण केली जाते. त्याला मी कसं हाताळावे आणि विचलित होऊ नये म्हणून काय करावं असा एकाने सल्ला विचारला.

अयोग्य निंदेमुळे तुम्ही जर विचलित झाला असाल तर यापासून बचाव करण्याचा फंडा आहे:

१. अयोग्य निंदा म्हणजे लपून केलेले कौतुक असते हे लक्षात ठेवा. योग्यता नसलेल्या माणसाची निंदा कोणीही करीत नाही.

२. आपण बरोबर आणि योग्य आहोत, यावर तुमचा विश्वास आहे तोपर्यंत लोक काय म्हणतील याची अजिबात चिंता करण्याची गरज काय?

३. आपली अयोग्य निंदा करण्यापासून आपण इतर लोकांना थांबवू शकत नाही हेही तितकेच सत्य.

४. आपण शांतता, अविचलित संतुलन आणि विनोद बुद्धी यांचा वापर करायला शिकणं गरजेचे आहे.

५. कटु निंदेला उत्तर देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मूर्खपणा आहे हे सत्य. म्हणून फक्त हसायला शिका.

६. आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर मग तुमची छत्री उघडा म्हणजे निंदेचा पाऊस तुम्हाला वाहवत नेणार नाही.

७. आपले नव्याण्णव टक्के निष्कर्ष चूक असतात आणि आपल्याबद्दल आपल्या वैर्‍याचे विचार जास्त योग्य असतात, हा विचार आपण कधी बदलणार?

८. लहान व्यक्ती जराशी निंदा झाली की भडकून उठतो तर शहाणी किंवा समजूतदार व्यक्ती आपली निंदा करणार्‍या व्यक्तीकडून काही शिकण्याचा प्रयत्न करीत असते. आपणच ठरवायचं, आपण कोण.

९. आपल्याबद्दल कोणी वाईट साईट बोलले असल्याचे आपल्याला कळल्यावर आपण स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक मूर्ख असेच करीत असतो.

 

आपण आपल्या मनाने जे योग्य वाटते ते करायचे. कारण तशीही तुमची निंदा होणारच आहे. काही केले तरी आणि काही नाही केले तरीही आपली निंदा होते असे आपल्याला आतापर्यंतच्या अनुभवातून दिसून आलेले आहेच.

आपण सर्व प्रकारच्या निंदेकडे दुर्लक्ष करावे, असे माझे अजिबात म्हणणे नाही. मी फक्त अयोग्य निंदेकडे दुर्लक्ष करण्याविषयी बोलत आहे. काही निंदा वंदनीय असू शकतात जर त्या योग्य भाषेत, हेतूने, प्रेरित करण्यासाठी, गंभीर आणि ज्ञानावर आधारित असतील तर त्यांचे स्वागतही केले पाहिजे.

आपल्या वैर्‍यांनी आपली किंवा आपल्या कामाची निंदा करण्यासाठी वाट पाहत थांबण्याऐवजी आपण त्यांना आधीच आपल्या कामातून पराभूत करायला हवे. आपण स्वत:च आपला कठोर निंदक व्हायला हवे. आपण आपल्यातील सर्व प्रकारच्या कमकुवतपणाचा शोध घ्यायला हवा आणि त्यांच्यावर मात करून त्यामध्ये सुधारणा करायला हवी. त्यामुळे आपल्या विरोधात बोलण्यासाठी आपल्या वैर्‍याला एका शब्दाचीही संधी मिळणार नाही.

 

 

 

 

 

 

3 thoughts on “अयोग्य निंदा आणि मार्ग”

  1. खूप छान लेख ….मांडलेले मुद्दे अत्यंत योग्य आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *