थकवा आणि मानसिकता

काल “थकवा आणि मानसिकता” याविषयावर समुपदेशनाचे ऑनलाईन चर्चासत्र झाले. त्यामध्ये बरेच जन विविध प्रश्न विचारून शंका समाधान करून घेत होते. त्यापैकी नेहमीप्रमाणे हाच प्रश्न होता की आपण थकतो म्हणजे नेमकं काय?
आपल्या बहुतेक थकव्याचा उगम मेंदूमध्ये होतो. खरं तर फक्त आणि फक्त शारीरिक कारणांमुळे निर्माण होणारा थकवा तसा दुर्मिळ असतो. फक्त मानसिक श्रमामुळे तुम्ही थकू शकत नाहीत.
जिथपर्यंत मेंदूच्या कामाचा संबंध आहे, तिथपर्यंत तो न थकता कितीही तास काम करू शकतो. एक रिसर्च सांगतो की, आठ किंवा बारा तास मेंदूने काम केले तरीही पहिल्या तासात तो जितक्या वेगाने काम करीत होता, तितक्याच वेगाने तो बारा तासाच्या शेवटीही काम करीत असतो.

आपला मेंदू कधीही थकत नसेल तर मग आपण का थकतो? मनोविश्लेषकांचे असे म्हणणे आहे की ;

१. आपला जास्तीत जास्त थकवा आपल्या भावनिक आणि मानसिक दृष्टिकोनामुळे निर्माण होतो.
२. आपल्या बहुतेक थकव्यांचा उगम आपल्या मेंदूमध्ये चालणाऱ्या विचारांमुळे होत असतो.
३. बैठे काम करणार्‍या शंभर टक्के निरोगी लोकांचा थकवा हा त्यांच्या मानसिक आणि भावनात्मक घटकांमुळे होतो. कंटाळा, तिरस्कार, कौतुकाचा अभाव, निरर्थकतेची जाणीव, घाई, तणाव, चिंता हेच भावनात्मक घटक बैठे काम करणार्‍या व्यक्तीला थकवितात.
४. चिंता, तणाव आणि भावनात्मक उलथा पालथ ही थकवा येण्याची तीन मुख्ये कारणे आहेत. खरं तर दोष यांचा असताना थकव्यासाठी मात्र शारीरिक किंवा मानसिक श्रमाला जबाबदार धरले जाते.

खूपवेळा आपल्याला समजत नाही की हा त्रास कशामुळे होतो. तर याला वरील तथ्य कारणीभूत असतात.

या मानसिक थकव्यावर उत्तर काय आहे?

१. तुम्ही काम करीत असता तेव्हा विश्रांती घ्यायला शिका. त्यासाठी काही नियम आहेत.
२. तणाव एक सवय आहे. विश्राम करणे एक सवय आहे. वाईट सवयी सोडून दिल्या जाऊ शकतात आणि चांगल्या सवयी लावल्या जाऊ शकतात.
३. स्वत:ला नेहमी जुन्या आणि सुरकुत्या पडलेल्या मोज्यासारखे समजा.त्यामुळे आपण स्वत:ला किती सैल सोडायचे आहे, याची कल्पना येते. तेव्हाच तुम्ही विश्रांतीच्या अवस्थेत येऊ शकता.
४. विश्रांतीची अवस्था म्हणजे सर्व तणाव आणि प्रयत्नांचा अभाव असतो. विश्रांती आणि विश्राम याचाच विचार करा.
५. आपले डोळे आणि चेहर्‍यावरील मांसपेशी सैल सोडण्याचा विचार करण्यापासून सुरुवात करा. थोडक्यात योगाभ्यास पण वेगळ्या स्वरूपाचा.
६. दर रोज पाच-सहा वेळा स्वत:ची तपासणी करा आणि स्वत:लाच विचारा, हे काम खरोखरच तितके अवघड आहे की आपण त्याला तितके अवघड केले आहे?
७. दिवसाच्या शेवटी पुन्हा तपासणी करा, स्वत:ला विचारा की मी किती थकलो आहे? मी जास्त थकलेला असेल तर त्याचा अर्थ तुम्ही खूप मानसिक काम केले आहे असा होत नाही तर तुम्ही ते योग्य प्रकारे केले नाही, असा होतो.

एखाद्या दिवसाच्या शेवटी आपल्याला खूप थकवा जाणवतो किंवा चिडचिडेपणा येतो तेव्हा त्यावरून आपण नर्व्हस थकल्याचे आपल्याला जाणवते. त्या दिवशी आपल्या कामाची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीही समाधानकारक नसल्याचे आपल्याला जाणवते.

भारतातील प्रत्येक व्यवसायिकाने हा धडा आत्मसात केला तर ब्लड प्रेशरने मरणार्‍याची संख्या एका रात्रीतून कमी होऊ शकते. तसेच आपण स्वतःला यशस्वी लोकांच्या पंक्तीत नेऊन ठेऊ शकतो. जे थकवा आणि चिंता यामुळे मानसिकरित्या पूर्णपणे कोलमडून पडले आहेत त्यांनी विश्रांतीला शरण गेलेच पाहिजे.

 

9 thoughts on “थकवा आणि मानसिकता”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *