जबाबदारी की गुंतवणूक

जबाबदारी की गुंतवणूक

 

मागील काही दिवस भरपूर काम आणि नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने अनेकांचे कॉल आले नाहीत आणि कुठलीही ऑनलाईन ऍक्टिव्हिटी नव्हती. आणि अचानक आज एक फोन कॉल आला आणि पुन्हा एक विषय ब्लॉग करिता देऊन गेला.

विषय होता एका आईचा. आई आणि तिच्या मुली मध्ये थोडा विसंवाद निर्माण होतो आणि त्यातून तिची घालमेल की मुलं म्हणजे जबाबदारी की गुंतवणूक. मी हसून म्हटले दोन्ही. आता कसं म्हणजे तिला सांगणं आलं की आजकाल बरेच पालक याच हेतूने मुलांकडे बघतात आणि त्यात विशेष वाटण्यासारखे काही नाही. रूढी परंपरा असलेल्या भारताला या गोष्टी बाळकडूत आपल्याकडे ट्रान्स्फर होतात.
पालकांवर मुलांची जबाबदारी या नात्याने याचा काही थोडाफार परिणाम नक्कीच होतो.

१. मनावर एक प्रकारचं ओझ येतं.
२. जागतिकीकरणामुळं प्रचंड स्पर्धात्मक बनलेल्या वातावरणात मुलांना विकसित करण्याचाच ताण येतो.
३. आपण कुठं कमी पडत नाही ना, अशी असुरक्षिततेची भावना येते.
४. मुलांचा चांगला व्यक्तिमत्त्व विकास करण्याच्या प्रयत्नांनी पालकत्व खारट बनतं.
५. मुलांना सर्वगुणसंपन्न सिद्ध करण्याचा नादानं पालक झपाटलेले असतात. यात अपेक्षेप्रमाणं यश मिळालं नाही की मग वैफल्य!
६. काहींनी आपण सुरू केलेल्या व्यवसायाला वारीस हवा असतो.
७. तर काहींना आपल्या अस्तित्वासाठी मुलांना काहीतरी बनवून दाखवायची होड लागलेली असते.

मुलं ही ‘गुंतवणूक’ अशा मानसिकतेतून मुलांना वाढविलं जातं तेव्हा अर्थातच मुलांकडून अपेक्षा वाढतात. मुलांवर काय परिणाम होतो?

१. या अपेक्षांचं ओझं मुलांच्या खांद्यावर दिलं जातं.
२. यशस्वी होऊन दाखवण्याचा आणि स्पर्धेमध्ये टिकण्याचा एवढा ताण मुलांवर असतो की ती स्वत:मध्येच गुरफटलेली गुंतलेली असतात. त्यातून निराशा आणि असहायता.
३. आईवडील, कुटुंबीय यांच्या भावनांपेक्षा महत्त्वाकांक्षेपायी धावणं महत्त्वाचं वाटतं.
४. मुलांच्या स्वप्नांच्या दुनियेत विघ्न येतात.
५. कळत नकळत व्यसनाधीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
६. निराशा कायमची मनावर परिणाम करून जाते.

मग नेमकं काय करायचं? पहिली गोष्ट म्हणजे मुलं ही जबाबदारी की गुंतवणूक हे ठरवण्याच्या भानगडीतच आपण पडायचं नाही. आपण निसर्गाचा अंश आहोत तेव्हा निसर्गाचे नियम पाळायचे.

मुलांना जन्माला घालणं, वाढवणं, त्यांना विकसित झालेलं पाहणं हा जीवननाट्याचा एक अंक समजायचा आणि हा ‘खेळ’ हौशीहौशीनं खेळायचा. तो खेळताना खेळाचा आनंद लुटायचा आणि त्यात खेळणं महत्त्वाचं, हार-जीत नव्हे.
आपलं म्हातारपण योग्य पद्धतीने जावे म्हणून आपण काही गोष्टी कराव्यात.

१. स्वावलंबी आणि स्वतंत्र वानप्रस्थाश्रमाची पूर्वतयारी मध्यमवयात धडधाकट आणि आपण कमावते असतानाच केलेली बरी.
२. मुलांसाठी वेळ, श्रम, पैसा देतो तसा आपल्या म्हातारपणासाठीही द्यावा-ठेवावा. म्हणजे ‘पोटचा’ नाहीच उपयोगी पडला तरी ‘गाठचा’ उपयोगी पडेल.
३. म्हातारपणी चांगलं जगण्यासाठी मुलांवर अवलंबून नसणारे आईवडील मग फक्त ‘दातृत्व’ उपभोगतात.

आपली मुलं ही जबाबदारी की गुंतवणूक हा प्रश्न मग गौण ठरतो. अशा आई-वडिलांकडे मग प्रेम देण्याघेण्यासाठी मुलंही आपणहून येण्याची शक्यता सर्वाधिक. म्हणूनच त्या माऊलीला सांगितले की बाई ग, चिडू नकोस, समजून घे आणि समजून सांग. उगीच जीवाची उलघाल करून घेणं व्यावहारिक नाही. आता वेळ, काळ, शिक्षण, निसर्ग हळूहळू बदलतो आहे. आपल्याला सुध्दा बदलायला हवं.

© श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *