तो आणि ती

मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की, ‘जर जोडीदारापैकी एकाला लग्न मोडण्याची जबरदस्त इच्छा असेल आणि त्याचवेळी दुसऱ्याला ते टिकवून ठेवण्याची आस असेल आणि ते दोघेही या गोष्टीचा गंभीरपणे विचार करत असतील, तर काय घडेल?’ अशा घटनांमध्ये मानसिक रस्सीखेच सुरू असते. असं घर स्वत: विरुद्धच दुभंगतं. हळूहळू ते तुटून विखुरतं. असं असलं तरी, त्यांच्या मानसिक दृष्टीकोनामुळे ही स्थिती कितीही काळ लांबवली जाते.

अशा मानसिक समस्या सोडवण्यासाठी व्यक्ती आणि परिस्थितीच्या पुढं जाऊन विचार केला पाहिजे. विचार मोठा व्हायला हवा. परिपूर्ण उपाय शोधण्यासाठी तुमच्यामध्ये दडलेल्या अपरिमित बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवणं आणि तुमच्या खऱ्या इच्छेनुसार तुमच्या विचारांना दिशा द्यायला सुरुवात करणं चांगलं. जेव्हा गोंधळ, गैरसमजातून मतभेद वाढीला लागतात तेव्हा अंतर्मनाच्या नियमाचं योग्य पालन करून तुम्ही पुन्हा शांतता आणि सुसंवाद प्रस्थापित करू शकता. त्याहीपुढे जाऊन तुमच्या अंतर्मनाचा योग्य उपयोग करून तुम्ही चुकीचं, वाईट लग्न संपवूही शकता.

तुम्ही सोडून जात असलेल्या तुमच्या जोडीदारामध्येच तुमचं मन गुंतलेलं असताना खोटा अभिमान, राग यापायी स्वत:ला न्यायालयापर्यंत नेऊ नका. तुमच्यामधल्या प्रेम, सदिच्छा आणि मायेला ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्याच्याकडे घेऊन जाऊ द्यात.
तुमच्या जर काही वैवाहिक समस्या असतील तर तुम्हांला काय हवं आहे हे स्वत:ला विचारा. इतर कोणत्याही समस्येप्रमाणेच तुम्ही तुमच्या वैवाहिक समस्या सोडवू शकता. तुम्हांला काय हवं आहे हे आधी स्पष्ट करा. मन ज्यामध्ये गुंतलेलं असतं तीच गोष्ट ते निर्माण करतं याची जाणीव महत्वाची.
नवरा बायकोनं गिधाडासारखं वागणं बंदच केलं पाहिजे. सतत आपल्या जोडीदाराच्या चुका वा त्रूटी शोधणं बंद करायला हवं. प्रत्येकानं दुसऱ्याकडे लक्ष द्यावं, त्याच्या चांगल्या गुणांचं आणि सकारात्मकतेचं कौतुक करावं.

तुमच्या वैवाहिक समस्या वा अडचणी यांची चर्चा नातेवाईक वा शेजाऱ्यांबरोबर करणं ही सर्वात मोठी चूक आहे.
तुमच्यामध्ये आत वसलेल्या हुशारीतून तुम्हांला अंतर्ज्ञान होत असतं, मार्गदर्शन मिळत असतं. कदाचित त्यातून तुम्ही स्वत:चं लग्न वाचवूही शकता. म्हणून विचार आणि भावना या पातळीवर तुमच्या जोडीदाराला उचलून धरत आणि ज्यामुळे तुम्ही एकत्र आलात त्या त्याच्या चांगल्या गुणांचं कौतुक करत तुम्ही तुमचा विवाह हा एक सुंदर अनुभव आणि कायमस्वरुपी आनंददायी बनवू शकता.

घटस्फोट टाळण्यासाठीचा सर्वोत्तम काळ म्हणजे लग्नाआधीचा काळ. तुमच्यामध्ये आत दडलेल्या सगळ्या शक्तींबद्दल अनभिज्ञ असणं हे तुमच्या सगळ्या वैवाहिक समस्यांचं कारण असतं. योग्य पती वा पत्नी यांना स्वत:कडे आकर्षित कसं करायचं हे शिका. उदाहरणार्थ, तुम्ही जर लग्नासाठी नवरा शोधत असलेली स्त्री असाल तर तुमचं लग्न का होऊ शकत नाही याची कारणं स्वत:ला सांगत बसू नका. त्याऐवजी, तुम्ही लग्न आनंदी कसं करू शकाल हे स्वत:ला सांगत रहा. तुमच्या शब्दकोषातून अशक्य हा शब्दच काढून टाका. आपण करू शकतो यावर विश्वास ठेवणारी व्यक्तीच तिला हवं ते करू शकते! यावर विश्वास ठेवणाराच स्वत:ला हवं ते करू शकतो.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *