जीवन आणि नियोजन

वेळेचं नियोजन किंवा टाइम मॅनेजमेंट हे एक अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. अनेक मोठ्या लोकांना हे तंत्र जमलेलं असतं. Time management is the life management – वेळेचं नियोजन म्हणजे जीवनाचं नियोजन, असं म्हटलं जातं. एखादं काम कमी वेळेत किंवा घाईनं उरकणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट नव्हे. हा तर त्याचा एक छोटासा भाग म्हणावयाचा. आपलं आयुष्य म्हणजे क्षणांची मालिका. ‘वेळ’ त्याचं नियोजन. तेव्हा जीवनाकडून काय मिळवायचं आणि कसं मिळवायचं, हे ज्याला कळतं, त्याला टाइम मॅनेजमेंट जमली म्हणायचं. अर्थात, आयुष्याचं नियोजन चांगल्या रीतीनं करण्यात तो यशस्वी झाला, असं म्हणावं लागेल. या शास्त्राचे अभ्यासक हे शास्त्र शिकणाऱ्यांना एक मानसिक व्यायाम करायला सांगतात :

पुढील एक महिन्यात. –

एक वर्षात –

तीन वर्षांत –

पाच वर्षांत

तुम्हांला काय काय मिळवावंसं वाटतं, हे वेगवेगळं लिहा. बरेच जण काहीना काही लिहितात. ‘वचने किं दरिद्रता?’ या न्यायानं खूप काही लिहितात; पण जीवनाकडून खरंच काय हवं, अत्यंत निकडीचं काय, हे समजण्यासाठी पुढचा व्यायाम असा की, जर तुला सहा महिन्यांनी मृत्यू येणार असेल, तर या सहा महिन्यांत तू काय काय करशील, हे लिहून काढायचं.

हा मानसिक व्यायाम अगदी प्रामाणिकपणे करणाऱ्याला विचारांती आपला आतला स्वर सापडतो, समजतो, उमजतो. हे सत्य शोधण्यासाठी कोणा साधुमहाराजांची काय गरज आहे? शहाणे असतील, तर ते हा प्रश्न नेहमीच स्वत:ला विचारतील. तणावमुक्त होतील, तृप्त होतील. कारण एवढ्याशा आयुष्यातून जर काही मिळवायचं असेल, तर वेळ फुकट घालवून चालणार नाही. प्रत्येक क्षणी जगायला हवं अगदी खरं खरं. आतला स्वर ओळखून.

मृत्यू हे शाश्वत सत्य लक्षात ठेवूनच प्रत्येकानं जगलं पाहिजे.

काहीजणं उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यभर ताण तणाव सहन करतात;

तर काहीजणं हेवा, मत्सर, सूड, इतरांना हिणवणं, अविवेक यात संपूर्ण आयुष्य उधळतात.

मृत्यू कधीही येऊ शकतो. तो आला, तर त्याला तृप्तीनं सामोरं जाण्याचं धैर्य कितीजणांत असतं?  ज्याला मृत्यूची आठवण असते ना, तो आयुष्य फुकट घालवत नाही, की व्यर्थ अट्टहासही करत नाही. त्यामुळं त्याच्या मनावर ताणही असत नाहीत. मृत्यूपेक्षा अधिक धोका कोणता? कोणताही नाही. तोच स्वीकारला की, ताण-तणाव शून्य. असा माणूसच खरा जगतो, कणाकणानं जगतो. शेवटच्या क्षणापर्यंत जगतो. पाहा. उतायचं नाही, मातायचं नाही, या गोष्टीचा घेतला वसा टाकायचा नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *