राग आणि भावनिक बुद्धिमत्ता

आपल्या आयुष्यात भावनांना केवढं महत्त्व असतं. आयुष्य घडवण्याचं आणि बिघडवण्याचं काम अनेक वेळा या भावनांमार्फतच होत असतं. बिघडवण्यात रागाला पहिला नंबर द्यावा लागेल. लहानसहान गोष्टींवरून रागावणारी अन् त्यामुळे परस्परांशी महिने किंवा वर्षानुवर्षं अबोला धरणारी माणसं किंवा कुटुंबं बघितली की वाटतं, हे रुसवेफुगवे खरंच योग्य कारणांसाठी असतात का? छोटी मोठी कारणं हे दोन कुटुंबांत दुरावा निर्माण करण्यास पुरेसं ठरतं. ’तर न विचारता कुंपणाबाहेर आलेले चार फुलं तोडण्यामुळे दुसरी दोन कुटुंबं राग धरून बसलीत.

रागाच्या क्षणांची वजाबाकी करून सुखाच्या क्षणांची बेरीज वाढवता येते, हे ज्याला उमजतं त्याच्या घरी आनंदाची बाग फुलते असं म्हणतात. राग या एकाच नकारात्मक आणि विघातक भावनेवर जरी बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता आलं तरी आयुष्यात सुखाचे क्षण वाढवणं शक्य असतं.

आजारपणामुळे होणारी चिडचिड वेगळी, पण काही माणसं चिडचिड करण्याचा आजार असल्याप्रमाणे जन्मभर समोरच्यावर, स्वत:च्या किंवा समोरच्याच्या वयाचा किंवा कशाचाही विचार न करता नुसती डाफरत असतात. अशी व्यक्ती चार दिवस कुठे बाहेर गेली की तिच्या घरात आनंदोत्सव साजरा होताना दिसतो.

चांगल्या, सुखद भावनांचं म्हणजे प्रेम, आनंद, आशा, विश्वास, सुरक्षितता, विनोद अशा भावनांचं संवर्धन होण्यासाठी आणि हानिकारक भावनांचं प्रमाण कमी होण्यासाठी आणि पर्यायाने भावनिक आरोग्यप्राप्तीसाठी सकारात्मक, विवेकपूर्ण आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच स्वत:च्या भावनांची जाणीव (Self-awareness) असणं, त्या योग्य प्रकारे व्यक्त करता येणं, इतरांच्या भावना समजून घेता येणं (परानुभूती) हे भावनांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वाचं असतं.

भावनिक बुद्धिमत्तेच्या बळावर सुखद-दुःखद भावनांचा समतोल साधता येतो. हितकारक असलेल्या व नसलेल्या भावछटांची छाननी करता येणं, तसंच नकारात्मक भावनांचं परिवर्तन सकारात्मक भावनांमध्ये करण्याचं कौशल्य प्राप्त होणं हे व्यक्तीतील भावनिक बुद्धिमत्तेचा विकास कितपत झाला आहे यावर अवलंबून असतं. हा विकास होणं किंवा न होणं बऱ्याच अंशी बालपणी पालकांकडून, शिक्षकांकडून आणि इतरांकडून मिळालेल्या वागणुकीवर, अनुभवांवर आधारित असतं. प्रत्येकात जन्मजात अशी संवेदनशीलता, स्मरण, प्रक्रियापद्धती आणि अध्ययनशीलता असते. भावनिक बुद्धिमत्तेचा विकास या चार घटकांवर अवलंबून असतो. लहानपणीचे सुखद अनुभव भावनिक बुद्धिमत्तेचा विकास होण्यास मदत करतात. मात्र नंतरचे दु:खद, वाईट अनुभव या विकासाची गती थांबऊ शकतात. याउलट सुरुवातीला कमी प्रमाणात विकसित झालेली भावनिक बुद्धिमत्ता आयुष्यातील पुढील टप्प्यांवरील सुखद, हितकारक, समृद्ध अनुभवांनी बहरून येऊ शकते.

तुमची भावनिक बुद्धिमत्ता कधी चेक केली आहे का? आपल्यालाही आपल्या भावनिक बुद्धिमत्तेबद्दल कुतूहल असतं, नसेल तर असायला हवं. बघुया खालील प्रश्नांची उत्तरं तुमची काय येतात ते.

१. तुमच्या मनात भीतीची, अपराधीपणाची, मत्सराची भावना असते का?

२. तुम्हाला राग, संताप आणि चिडचिड होणं अशा गोष्टींना वरचेवर तोंड द्यावं लागतं का?

३. दैनंदिन जीवनात तुम्हाला ताण जाणवत असतो का?

४. उदास, निराश वाटणं, रडावंसं वाटणं किंवा चटकन् रडू येणं असं वारंवार घडतं का?

५. भूतकाळातील त्रासयदाक, दु:खदायक गोष्टी मनात सतत घोळत राहतात का?

६. सतत इतरांमधले दोष काढण्याची तुम्हाला सवय आहे का?

७. लहानसहान गोष्टींबद्दलही तुम्ही खूप चिंता करता का?

८. दुसऱ्याने केलेल्या टीकेमुळे तुम्ही रागावता का?

९. कुटुंबीयांशी किंवा इतरांशी प्रेमाने वागणं तुम्हाला जमतं का?

१०. तुम्ही उत्साही अन् हसतखेळत आयुष्य जगणारे आहात का?

११. परिस्थितीप्रमाणे बदलण्याची तुमची तयारी असते का? तेवढे लवचिक तुम्ही आहात का?

१२. तुमचा मुलगा/मुलगी एखादी गोष्ट तुम्हाला सांगत असताना तुम्ही ती लक्षपूर्वक, शांतपणे ऐकून घेऊ शकता का?

१३. तुम्ही समजूतदार आणि सहनशील आहात असं इतर जण म्हणतात का?

१४. तुम्ही आपली चूक पटकन कबूल करता का?

१५. सहकाऱ्यांबरोबरची किंवा बॉसबरोबर झालेली गरमागरमी किंवा वादावादी तुम्ही लवकर विसरू शकता का?

अशाच पद्धतीने आपण अनेक प्रश्न स्वत:ला विचारून स्वत:चा अंदाज घेऊ शकतो. वरील पंधरापैकी काही प्रश्नांची उत्तरं ‘हो’ असतील, तर काहींची ‘नाही.’ पहिल्या आठ प्रश्नांची ‘हो’उत्तरं तुमच्या वर्तणुकीत सुधारणा करण्याची म्हणजेच तुमच्या भावनांना दिल्या जाणाऱ्या प्रतिसादात आणि प्रतिक्रियेत सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता दाखवितात. नऊ ते पंधरा ‘हो’उत्तरं तुमच्यातील भावनिक हुशारी चांगली असल्याचं सांगतात. इथे ‘नाही’उत्तरांची दखल घेऊन योग्य तो बदल स्वत:मध्ये आवर्जून केल्यास आपलं जगणं अधिक चांगलं होऊ शकतं. तसं झाल्यास पेला अर्धा भरला आहे इकडे लक्ष जाईल आणि कुढत जगण्यापेक्षा आनंदाने जगावंसं वाटेल.

आयुष्यातील चढउतारांना, संकटांना, वादळांना यशस्वीपणे सामोरं जाताना त्रासदायक किंवा दु:खदायक भावनांना कशा प्रकारे काबूत ठेवत या व्यक्ती पुढील वाटचाल करतात, हे जाणून घेणं उपयोगी. कारण हीच भावनिक आरोग्याची गुरुकिल्ली असते. अप्रिय भावनांची तीव्रता, प्रमाण आणि कालावधी कशाही परिास्थितीत आवाक्याबाहेर जाणार नाही एवढं पथ्य आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रत्येकाने आवर्जून पाळणं आवश्यक आहे. मग नक्की विचार करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *