मेंटल हेल्थ डे

मानसिक आरोग्याला शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने हाताळले जावे म्हणून जगभर प्रयत्न केले जात आहेत. दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी “जागतिक मानसिक आरोग्य दिवस” साजरा केला जातो. मानसिक आरोग्य समस्या आपल्या जीवनात, कुटुंबांमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि समुदायांमध्ये अस्तित्वात आहेत, ज्यामुळे प्रत्येकावर परिणाम होतो. व्यक्ती आणि समाज म्हणून – मानसिक आजार टाळण्यासाठी आपण शक्य तितके केले पाहिजे. लोकांच्या मानसिक आरोग्यास धोका निर्माण करणारे घटक कमी करणे, त्याचे संरक्षण करून अशा व्यक्तींना मूळ प्रवाहात आणणे आवश्यक आहे म्हणून जगातील सर्वांनी याबाबत एकत्रित लढा द्यायचा निर्णय घेतला आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिन ही सर्वसाधारणपणे मानसिक आरोग्याविषयी बोलण्याची सर्वांना संधी आहे. तसेच आपण मानसिक आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, आपण संघर्ष करत असल्यास त्याबद्दल बोलणे आणि मदत मिळवणे किती महत्त्वाचे आहे याबाबत इतरांशी संवाद साधण्यास प्रवृत्त केले जाते.

वास्तविक मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत बरीच माहिती आज उपलब्ध आहे. फक्त एकच समस्या आहे की आपण मानसिक रोगी आहोत याला आपण मान्यता देत नाहीत. साधी असणारी रोजची गोष्ट करताना चिडचिड होते, बारीक बारीक गोष्टीतून भांडणं होतात, साधं सोपं बोलणं अवघड वाटतं इत्यादी बाबी होत असतील तर नक्कीच आपलं कुठेतरी चुकतंय हे समजून घ्या. मानसिक आरोग्य धोक्यात आहे हे अनेकांच्या ध्यानी येत नाही. जेंव्हा लक्षात येते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. आज सर्वात जास्त धोका आहे तो मानसिक आरोग्य बिघडण्याचा. गंमत अशी की धोका माहिती असूनही आपण उपचार घ्यायला मागेपुढे बघतो.

त्यातल्या त्यात सध्याचा धुमाकूळ घालणारा मानसिक रोग म्हणजे नैराश्य. नैराश्य येण्याची कारणे अनेकदा व्यक्तीच्या संगोपनात असतात. घरात हल्ली चौकोनी कुटुंबे दिसतात, त्यातही पालकांचे लक्ष एकावर अधिक असेल तर त्यातून दुसऱ्याच्या मनात कमीपणाची भावना घर करते. त्यामुळे पालकांनी संगोपनात मुला-मुलीत भेदभाव ठेवणे थांबविले पाहिजे, ही काळाची गरज आहे. लहानपणी होणारी मारहाण, शिवीगाळ आणि सततची टोचून बोलणी आत्मविश्वास कमी करतात. त्यातून प्रवास नैराश्याकडेच होतो. लहान वयात लैंगिक अत्याचार झालेली मुले-मुली नंतर आयुष्यात सावरत नाहीत. त्यांचीही वाट नैराश्याकडे जाणारी असते. आजकालच्या युगात नाविन्याची कास धरू न शकणारी कामगारांची पिढी आता माझं कसं होणार म्हणून नैराश्यात येते.

मोठ्या व्यक्तीना सतत विपरीत परिस्थितीत काम करावे लागणे, आर्थिक संकटात सापडणे, आपण इतरांबरोबर स्पर्धेत टिकू शकत नाही याची सतत खंत वाटणे, इतर सहकारी व वरिष्ठांकडून मिळणारी सातत्यपूर्ण अपमानजनक वागणूक त्यासोबतच आपण इतरांच्या लेखी शून्य आहोत, जगण्याच्या लायकीचे नाही असे विचार सतत करणारी व्यक्ती नैराश्यात जाते आणि वेळीच नैराश्यावर उपाय न झाल्यास आत्महत्या करते असे दिसून आले आहे. सतत एकाकी राहणे, जेवन न करणे किंवा खूप जेवण करणे, त्रागा करणे, सतत चिडचिड करणे, विचारमग्न व अबोल राहणे, चिंताग्रस्त राहणे, ही नैराश्याची काही लक्षणे आहेत.

नैराश्य हे मनाचा विचार आणि त्याच्याशी निगडीत असले तरी त्यात बदल शक्य आहे. यासाठी काऊन्सिलींग अर्थात समुपदेशन हा मार्ग आहे. प्रथम सायकॉलॉजीस्टला भेटून आपल्या समस्या सांगा. ते विचारतील त्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं द्या. ते काही वेळा तुम्हाला प्रश्नावली देऊन समस्येचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतील. थोडा धीर धरा, कारण असलेली समस्या चुटकीसरशी सुटणारी असती तर आपल्याला मानसिक रोग झालाच नसता. एकदा का मूळ कारण समजलं की मग त्यावर काही थेरपी देऊन, समुपदेशन करून आपल्याला ठीक करतात. त्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा भेटावे लागते. जर तुमची समस्या प्राथमिक स्वरूपात असेल तर ती लवकर आटोक्यात येते. परंतु जर समस्या जटिल व जुनी असेल तर मात्र सायकिआट्रिक कडे जाऊन गोळ्या घेणं आवश्यक असतं.

कोव्हिड पश्चात प्रश्न वाढलेले आहेत. जागरूक व्हा, सल्ला घ्या, घरगुती प्रयत्न करून वेळ घालवु नका. राग, अहंकार, दुजेभाव, हेवादावा, अप्पलपोटेपणा, हेकेखोर स्वभाव, माज हे सर्व तुम्हाला येरवाळीच स्मशानभूमीकडे घेऊन जात आहेत हे लक्षात असूद्या!

“Make mental health for all a global priority”

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *