टाळुया घटस्फोट!

पती पत्नी मधील संभाषण अती महत्वाचे असतात. प्रेम, सुख या शब्दांचा लग्नाच्या संदर्भातील अर्थ फार थोडय़ा मंडळींना कळलेला असतो. अनेकांना कथा-कादंबऱ्यांत वाचलेला किंवा नाटक-सिनेमात पाहिलेला काल्पनिक, रोमँटिक अर्थ अभिप्रेत असतो. पण वास्तव अगदी वेगळे आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो.

जॉन गोटमन या मानसशास्त्रज्ञाने एका प्रयोगात क्षुल्लक ते गंभीर कारणांवरून पति-पत्नीत होणाऱ्या संभाषणांचे भावनिक पातळीवर विश्लेषण करून त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या भवितव्याबद्दल अचूक अंदाज वर्तवले. त्यासाठी त्याने २० वर्षांच्या कालावधीत २०० जोडप्यांचा अभ्यास केला. या जोडप्यांमध्ये जसे नवविवाहित होते, तसेच लग्न होऊन काही दशके झालेले वृद्धही होते. दुसऱ्या एका अभ्यासात त्याने केवळ संभाषणांच्या आधारे भावनिक बंधांचा विचार करून कोणती जोडपी आगामी तीन वर्षांत घटस्फोट घेतील, तेही अचूकपणे सांगितले.

१. लग्न धोक्यात असल्याचा पहिला इशारा एकमेकांवर केलेल्या जहरी टीकेतून मिळतो.

२. पति-पत्नीत अधूनमधून व्यक्त होणाऱ्या तिरस्काराने लग्न काही लगेच मोडत नाही. मात्र वाढलेले कोलेस्टरॉल किंवा धूम्रपान जसे हृदयविकाराच्या संदर्भात रिस्क फॅक्टर्स ठरतात, तशीच वाढलेली तिरस्काराची भावना घटस्फोटाच्या बाबतीत रिस्क फॅक्टर ठरते. तिची तीव्रता आणि कालावधी जितका अधिक तितका घटस्फोटाचा धोकाही जास्त.

३. विसंवादी सूर. संवाद हा विसंवादाकडे वळण्याला आपले विचारच कारणीभूत असतात. लग्न संबंधात विष कालवणारी वाक्यं व्यक्तीच्या अहं मधून आलेली असतात. त्यात परस्परांविषयीची मते, पूर्वग्रह, जुने हिशेब वगैरेंचाही समावेश असतो. स्वत:वरील अन्यायाच्या विचाराने जोर पकडला की मन अहितकारक भावनांच्या तावडीत केव्हा सापडते, ते कळतही नाही. मग विभक्त होण्याचा प्रयत्न केला जातो.

४. निराशावादी जोडीदार. निराशावादी जोडीदार हा चुकीच्या भावनांच्या (जसे राग, मत्सर, द्वेष) आहारी जाण्याची दाट शक्यता असते. यालाच इमोशनल हायजॅकिंग असे म्हणतात. अशांचा राग उफाळून येण्यासाठी एखादी क्षुल्लक बाबही पुरेशी असते.

५. सततच्या कुरबुरी, तक्रारी, रागावणे, दुखवणे आणि त्यामुळे निर्माण होणारी मानसिक अस्वस्थता यांनी व्यापून जाण्याच्या महाघातक विचारांचा महापूर काडीमोड होण्यास कारणीभूत.

वरील प्रमाणे चर्चा केलेल्या पति-पत्नीतील भांडणांचे मूळ केवळ दोघांच्या नकारात्मक विचारातच नव्हे, तर त्यांच्यातील भावनिक कौशल्याच्या अभावातसुद्धा आढळते. भावनिक हुशारी आत्मसात केल्यास क्षुल्लक भांडणाचे पर्यवसन घटस्फोटात होण्याची शक्यताच नसते. यासाठी स्वत:च्या भावनांची जाण असणे, दुसऱ्याच्या भावना समजून घेणे, परिणामांचा विचार करून प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि आवेगांना आवर घालणे, हे महत्त्वाचे ठरते.

लग्न टिकवायचे असेल तर काय करायचे, कोणी कसे वागायचे, कोणती पथ्ये पाळायची हे जाणून घ्यायला हवे. स्त्रियांची मानसिकता ही पुरुषांच्या मानसिकतेपेक्षा भिन्न असते. त्यामुळे दोघांचेही भावनिक पडसाद वेगवेगळे असू शकतात व म्हणून दोघांनाही वेगळ्या प्रकारचे ‘फाइन टय़ूनिंग’ आवश्यक असते, हे लक्षात घेतले पाहिजे.

पुरुषांनी लक्षात ठेवायच्या गोष्टी;

१. जेव्हा पत्नी एखादी तक्रार किंवा वादाचा मुद्दा मांडते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका.

२. जेव्हा पत्नी आपला राग, असंतोष, तक्रार, मतभेद व्यक्त करते, तेव्हा तो तुमच्यावरील व्यक्तिगत हल्ला नसतो.

३. बायकोचा मुद्दा सविस्तरपणे ऐकून घ्या.

४. बायको चिडलेली असताना तिचा मुद्दा कितीही क्षुल्लक वाटत असला, तरी तो पूर्णपणे ऐकून घेतल्यास तिलाही आनंद होतो.

स्त्रियांनी लक्षात ठेवायच्या गोष्टी;

१. वरील सर्व सूचना बायकांनाही लागू पडतात. टीका करताना व्यक्तीवर हल्ला नसावा, तर कृतीबद्दल नापसंती असावी. घृणा, तिरस्कार यांना थारा न देता एखादी गोष्ट त्रासदायक वाटली, असे सरळ वक्तव्य करावे.

२. आपला मुद्दा मोठय़ा आवाजात, कटू शब्दांत, थयथयाट करून, आक्रमकपणे किंवा तीव्र भावना व्यक्त करून मांडल्यास तो ऐकला तर जात नाहीच, पण त्यामुळे अबोला, दुरावा मात्र वाढतो.

ज्यांना आपले लग्न टिकावे असे खरोखर वाटते त्यांच्यासाठी काही युक्तीच्या गोष्टी नक्कीच सांगता येतील. उपाय साधेच आहेत. करून बघा.

१. चर्चा विशिष्ट मुद्दय़ावरच असावी, म्हणजे वादंग वाढून भडका उडणार नाही.

२. संसार म्हणजे फक्त पैसा, खाणेपिणे, मुलेबाळे, घरदार इ. मुद्दय़ांवर चर्चा-वादविवाद नव्हे, तर दोघांनी मिळून स्वत:ची भावनिक हुशारी वाढवणे, न भांडता समस्यांमधून मार्ग काढणे आणि परस्परांच्या विकासाला हातभार लावणे, हेदेखील होय.

३. स्वत:ला आणि जोडीदाराला शांत करता येणे, इतरांच्या भावना समजून घेणे आणि समोरच्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे एवढे भावनिक कौशल्य आत्मसात करणं.

४. संसार समृद्धीसाठी जोडीदारात वाजवी मतभेद असणे आणि ते सामोपचाराने मिटवता येणे आवश्यक असते. मात्र भांडताना कुठे थांबायचे, हे कळणे महत्त्वाचे असते.

५. आपल्या आवेगांना आवर घातला तर आपली प्रतिक्रिया कशी आणि किती प्रमाणात असावी याचा अंदाज येतो आणि वेळीच थांबतो.

६. वादग्रस्त विषयावर चर्चा सुरू असताना आपली अस्वस्थता किंवा राग वाढतोय, असे लक्षात आल्याबरोबर चर्चा थांबवावी, अन्यथा भावनिक गुंता वाढू शकतो.

७. आपण एकटे असताना स्वगतात बोलत असतो. वारंवार मनाशी घोळवले जाणारे नकारात्मक स्वगत हानिकारक असते.

८. स्वसमर्थन न करता आपले गाऱ्हाणे, म्हणणे नेमकेपणाने मांडल्यास तो समोरच्यावर व्यक्तिगत हल्ला होत नाही.

९. प्रेम आणि आदर या दोन गोष्टी विवाहातील वैरभावनेची धार बोथट करतात.

१०. जोडीदाराची एखादी गोष्ट मनापासून रुचली तर शब्दातून तसे व्यक्त करणे योग्य असते. अशा सकारात्मक कृतींमुळे भावनिक भांडवलात वाढ होते.

घर दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं, एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं. असाच संसार होतो हे नवीन पिढीला जुन्या पिढीतील कुटुंबीयांनी कृतीतून दाखवायला हवे. आजची तरुण मुले मुली लग्न का करावं याच विचारात आहेत. त्यांना आपण सबळ सकारात्मक पुरावा लग्न व्यवस्था मजबूत करून द्यायला हवा. नाहीतर नातवंडं पाहायचे अनेकांचे स्वप्न, स्वप्नच राहतील.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *