निरोगी भांडण

निरोगी भांडण

 

नवरा बायकोचे भांडण तंटा नवीन नाही. त्यात जुने आणि नवे, दोन्ही जोडीदाराचा समावेश आहे. लग्नाच्या २० वर्षानंतर सुध्दा भांडण होते म्हणून एका गृहिणीला समुपदेशन काल करावे लागले. तिला हसत सांगितले की नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणांनुसार, विवाहित जोडप्यांपैकी 44% जोडप्यांचा असा विश्वास आहे की आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा भांडण केल्यास त्यांना निरोगी आणि उत्पादक संबंध दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. आणि हे सायंटिफिक अभ्यास करून तथ्ये बाहेर आलीत. अर्थात विनोदाचा भाग सोडला तर काही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.

खरं तर, अनेकदा, नेहमी शांततेत युक्तिवाद (काहीजण याला भांडणं म्हणतात) करणारे जोडपे नेहमी एकत्र राहतात कारण, सर्व लहान गैरसमज असूनही, त्यांना माहित आहे की त्यांचे प्रेम खरे आणि प्रामाणिक आहे.

भांडणं म्हणजे हाणामारी, धमकी देणे, धक्काबुक्की करणे नव्हे. काही कारणास्तव होणारे मतप्रवाह वेगवेगळे असतात. यातून मनातले विचार पटकन बोलून जाणे आणि तेच कारण पकडुन त्यावर उहापोह करणं हे कित्येकदा जोडप्यांमध्ये दिसून येतं.

आम्ही ब्राइट साइड पाहिली की आपल्या नात्यांसाठी वेळोवेळी होणारी भांडणं का चांगली असू शकतात.

१. भांडणे हे परिपक्व नात्याचे लक्षण आहे. अर्थात नेहमीच घडत असेल तर चांगले नाही. तरीही, डोकेबाज जोडपी वैयक्तिक हल्ल्यांचा किंवा ओरडण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्याऐवजी ते नेहमीच तडजोडीवर पोहोचण्याचा आणि निरोगी युक्तिवादाच्या मदतीने त्यांचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतात.

२. भांडणे म्हणजे आपण दुसऱ्याची काळजी करने. जसे आपण आई वडिलांशी, भावंडांशी भांडतो, ते काळजीपोटी, किंवा प्रेमाखातर, तसेच जोडप्यांना एकमेकांबद्दल जिव्हाळा असतोच आणि काळजी सुध्दा.

३. भांडणं आपले संवाद सुलभ करते. जे काही मनात आहे नाही ते बोलून टाकले जाते.

४. लढाई हे निरोगी नात्याचे लक्षण आहे. हे तेंव्हाच शक्य असते जेंव्हा भांडणं सभ्य भाषेत होतात. संवेदना जागृत होते. समझोता होतो.

५. भांडणे तुमची मने साफ करून जळमटे दूर करतात. मनात असलेल्या असंतोषाला वाट करून देणे महत्वाचे असते.

६. भांडण म्हणजे तुम्हाला एकत्र राहण्याची, ठेवण्याची संधी असते. भांडणाऐवजी जे लोक त्याबाबत बोलणे टाळतात, अबोला धरतात त्याबद्दल प्रश्न तयार होतो. त्यापेक्षा बोलून मन मोकळे झाले तर स्पष्टता येते व पुढे एकत्र राहण्यासाठी मार्ग मोकळा होतो.

७. भांडणे तुमची आवड दाखवतात. त्यातून त्यांची आवड असणाऱ्या गोष्टींबाबत उहापोह करतात, आवड जपली नाही तर आपले मत नोंदवत असतात.

८. भांडणातून कंटाळवाणे आयुष्यात नावीन्य येते असे काही जोडपी म्हणतात. भांडणाचे योग्य किंवा अयोग्य कारण शोधून भांडणारी मंडळी थोडी क्रिएटिव्ह असतात असं काही संशोधन सांगते.

हे लक्षात ठेवणे नेहमीच महत्वाचे आहे की “चांगल” आणि “वाईट” भांडणं यात फरक आहे आणि केवळ चांगलाच भांडणं आपल्या नात्यासाठी फायदेशीर ठरू शकते. काही झाले तरी भांडणं सकारात्मक बोलून संपवले पाहिजे.

या सर्व कृतीतून योग्य असे फळ मिळाले तरच अशा भांडणाचा फायदा होतो. काही नियम मात्र यामध्ये पाळणे आवश्यक असतात.

१. एकमेकांचा आदर ठेवणे.

२. माफी मागणे. माफ करणे.

३. मुद्द्यापासून न भरकटणे.

४. इतरांना यामध्ये न गुंतवणे किंवा मदत न घेणे.

५. सकारात्मक प्रतिसाद देणे व मनासारखे नाही घडले तर त्रागा न करता रागावर संयम बाळगावा.

जोडपी म्हटले खटपट आलीच, एकमेकांना आधार देऊन, बोलकं करून, मन मोकळे करायला अनेक मार्ग असतात व त्यातून मार्ग काढण्याची मानसिकता ठेवली तर आनंदी संसार सुरू राहण्यास नक्कीच मदत होईल. आणि भांडण करायचेच झाले तर ते निरोगी ठेवा त्यातून आनंद नक्कीच मिळेल.

 

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचारतज्ज्ञ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *