भीती आणि कृती

मला कित्येकदा हसायला येतं की आपण प्रत्येक वेळेस कशाची ना कशाची तरी वाट बघत असतो. त्यामध्ये, हे आपल्याला यश कधी मिळेल किंवा हे आयुष्य कधी संपेल. वास्तविक दोन्ही गोष्टी आपल्याला माहीत नसतात. बऱ्याच क्लाएंट बरोबर बोलताना हे जाणवलं की प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींकरता वाट पाहायची सवय आहे परंतु त्यासाठी कृती करणं जमत नाही.

त्यामुळे यश आपल्यापासून दूर पळतं आणि हवं ते ध्येय साध्य करण्यास बाधा येते, भीती वाटते. म्हणून मी बऱ्याचदा त्यांना सांगतो की खालील गोष्टींसाठी वाट पाहणे सोडून देण्याची हीच योग्य वेळ आहे!

१. परिपूर्णता, प्रेरणा.
२. परवानगी, खात्री.
३. कोणीतरी परिस्थिती बदलेल योग्य व्यक्ती भेटेल
४. लहान मुलांचं दूर जाणं
५. शुभमुहुर्त
६. नवीन प्रशासन
७. कोणीतरी तुम्हाला शोधून काढेल
८. अगदी सविस्तर सूचना
९. तुमचा आत्मविश्वास वाढण्याची
१०. तुमच्या वेदना थांबण्याची

अगोदर आपण कृती करायला सुरुवात केली पाहिजे. कारण यशस्वी होण्याचे तीन मार्ग आहेत.
१. योग्य वेळी योग्य ठिकाणी असणे,
२. आपण तिथे आहोत हे माहीत असणे,
३. कृती करणे.

बहुतेक लोक कृती करण्याचे टाळतात कारण त्यांना अपयशी होण्याची भीती वाटते. यशस्वी लोकं सुध्दा अपयशी होते, आजही उदाहरणे आहेत. तरीही ते यशस्वी होतात कारण, ते साधे फंडे वापरतात.

१. अगोदर सुरुवात करा, चुका करा, योग्य त्या सूचना स्वीकारा, आवश्यक त्या दुरुस्त्या करा आणि पुढे चला.
२. चुका आणि शिका या तत्त्वानुसार शिकणे होय.
३. उद्दिष्टपूर्तीच्या मार्गावर तुम्हाला येणारा प्रत्येक अनुभव तुम्हाला नवीन काहीतरी शिकवत असतो व त्या अनुभवाचा तुम्हाला पुढे उपयोग होत असतो.
४. ज्ञान, कौशल्ये व आत्मविश्वास यामुळे त्यांना अडथळ्यांवर मात करणे शक्य होते.
५. चुका म्हणजे नवीन काहीतरी शिकण्याची संधी आहे असे मानणे.

आपण या आयुष्याच्या वाटेवर फक्त एकदाच येतो. आपल्यासमोर फक्त दोनच पर्याय असतात. एकतर भीत–भीत जगायचे व फार हाल हाल करून न घेता मरेपर्यंत दिवस ढकलायचे किंवा मग आपली स्वप्ने व उद्दिष्टे साकार करायची व एक समृद्ध, परिपूर्ण जीवन जगायचे. मग वाट बघण्यापेक्षा बिनधास्त कृती करायला आपण का घाबरतो?

१. अपयशाची भीती. समाज काय म्हणेल.
२. आर्थिक दृष्ट्या माघार.
३. कृती करण्याची क्षमता नसणे.
४. योग्य गुरु नसणे.
५. वेळेचा उपयोग योग्य न करणे.
६. चांगलं आणि वाईट याच्या मधील फरक न कळणे. अपुरी निर्णयशक्ती.
७. सिच्युएशनल अवेरनेस ची कमी.
८. आत्मविश्वास निरंतर न टिकणे.
९. मानसिक आणि भावनिक अस्थिरता.

भीती ही नैसर्गिक गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करता, नवा व्यवसाय करता किंवा एखादी जोखीम पत्करता तेव्हा भीती वाटणे साहजिकच आहे. दुर्दैवाने बहुतांशी लोकांना केवळ भीतीमुळे त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करता येत नाहीत. यशस्वी लोकांनाही भीती वाटत असतेच पण त्यामुळे खचून न जाता किंवा हातातील काम अर्धवट न सोडता ते त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करतात. भीती ही मान्य करण्याची, अनुभवण्याची व जिंकण्याची गोष्ट आहे हे त्यांना समजलेले असते.

जुन्या म्हणीप्रमाणे, ‘‘आधी हाताला चटके, मग मिळते भाकर.’’ चला तर मग, भीती वाटते हे मान्य करा. परंतु भीतीला तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामापासून परावृत्त करू देऊ नका. कारण तुमच्या मनात भीती निर्माण करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वत:च आहात.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *