गेल्या आठवड्यापासून बऱ्याच व्यक्तींबरोबर विविध विषयावर चर्चा झाली. COVID १९ चा फायदा एकच की वेळ खूप मिळाला विचार करायला. एक नेहमीचाच प्रश्न की निगेटिव्ह विचारसरणी वाईट की चांगली. सौम्य नकारात्मकता काही प्रमाणात आवश्यक असे वाटते.
नकारात्मक भावनापासून पूर्णत: मुक्त असं जीवन रूक्ष-नीरस वाटायला लागतं. मनुष्याला कार्यशील, कार्यरत ठेवण्याचं महत्त्वाचं काम सौम्य स्वरूपातील नकारात्मक भावना करीत असतात हे लक्षात घ्यायला हवं. आपल्याकडून स्वत:च्या भल्याच्या गोष्टी केल्या जातात- त्या जीवनात अपरिहार्यपणे येणारे ताणतणाव कमी करण्याच्या मानवी सहजप्रवृत्तीमुळे. म्हणून आम्ही एक लिस्ट केली.
१. लोकांनी माझ्यावर प्रेम केलंच पाहिजे. नाहीतर मी दु:खी कष्टी होईन.
२. वाईट वागणाऱ्या लोकांना पूर्णत: निषिद्ध मानलेच पाहिजे.
३. चुका करणं महाभयंकर.
४. भीतिप्रद परिस्थितीविषयी मला भयंकर चिंता वाटायलाच हवी.
५. स्वत:ला शिस्त लावणं महाकठीण, जवळजवळ अशक्यच आहे.
६. मला इतरांवर निर्भर राहायलाच हवं.
७. विपरीत घडत राहणं खरोखरी महाभयंकर आहे.
८. बालपण मला सदैव प्रभावित करीत राहणार.
९. माझ्या भावना नियंत्रित करणं अशक्य कोटीतील गोष्ट होय.
१०. इतरांचं मला न आवडणारं वागणं मी सहन करू शकत नाही.
११. प्रत्येक समस्येचं परिपूर्ण, निर्दोष उत्तर असतंच.
१२. इतरांच्या तुलनेत मी नेहमीच सरस आणि श्रेष्ठ असलंच पाहिजे.
१३. मी जो विचार करतो तो मी बदलू शकत नाही.
१४. ज्याला मदतीची गरज आहे त्याला मी मदत करायलाच हवी.
१५. निरोगी लोक कधीच अस्वस्थ होत नाहीत. ङ्क जगात एकच खरंखुरं प्रेम आहे.
१६. मी कधीच आणि कुणालाही दुखावता कामा नये.
१७. माझ्या समस्यांचा काहीतरी जादुई इलाज असणारच.
१८. माझा कोणताही कमकुवतपणा इतरांना दिसायला नको.
१९. माझ्या समस्या सोडविण्याची जबाबदारी इतरांची आहे.
२०. बलिष्ठ लोक कधीच इतरांची मदत मागत नाहीत.
२१. माझा ‘मूड’ असेल तेव्हाच मी काही करू शकतो.
२२. शक्य म्हणजेच संभाव्य.
२३. मी निकृष्ट दर्जाचा आहे.
२४. मी नेहमी प्रकाशझोतात असायलाच हवं.
२५. माझ्या इच्छेनुसारच लोकांनी वागलं आणि असलं पाहिजे.
२६. नाद सोडणे, शरण जाणे हेच सर्वश्रेष्ठ धोरण होय.
२७. काहीही करायचं ठरविण्यापूर्वी मला त्याच्या परिणामांची खात्री हवी.
२८. निर्णय घेण्यापूर्वी तो अचूक असल्याची खात्री असायला हवी.
२९. बदल अनैसर्गिक आहे.
३०. लहान असताना माझ्या समस्या कशा आणि केव्हा सुरू झाल्या हे मला माहीत होणे अत्यावश्यक आहे.
३१. प्रत्येकाने माझ्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे.
३२. मी सदैव सुखी-समाधानी असलंच पाहिजे.
३३. माझ्यात काहीतरी गुप्त; पण भयंकर आहे जे मला सतत नियंत्रित करीत असते.
३४. माझ्या समस्या सोडविण्याचा प्रयास दु:खदायक असूच नये.
३५. जगाने माझ्याशी सभ्यपणे वागायलाच हवे.
३६. माझ्या वर्तनाकरिता मी जबाबदार नाही.
३७. आपण आहोत तसं इतरांना न दाखवणं नेहमीच चांगलं असतं.
३८. मला कोणतीच समस्या नाही.
३९. चिंता सदैव धोकादायकच.
४०. मला माहीत नाही असे काहीही तू मला सांगू शकत नाही.
४१. लोकांनी ते जसे वागतात तसे माझ्याशी वागू नये.
४२. माझ्या मुलांना मी नियंत्रित करू शकलो पाहिजे.
४३. प्रबल इच्छाशक्तीच माझ्या साऱ्या समस्या सोडवू शकते.
आपल्या बहुतांश भावनिक आणि वर्तनात्मक समस्यांची मुळं वरील अविवेकी विचारामध्ये सापडतील. समस्या आली की, वरीलपैकी कोणत्या एका किंवा अधिक आपल्या मनावर आहे ते ओळखुन त्या विचारांना विश्लेषण करणं आणि त्यांना विवेकपूर्ण वळण लावणं हा समस्येवर मात करण्याचा प्रभावी मार्ग होय.
नेहमीच समस्या निर्माण होईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. कोणत्या परिस्थितीला/समस्येला सामोरे जावे लागणार आणि त्यांचे नकोसे परिणाम काय होऊ शकतील याची बरेचदा मनुष्याला आगाऊ कल्पना असते किंवा ती तो करू शकतो.
© श्रीकांत कुलांगे
9890420209