विसर जुन्याचा.

संजय आणि त्याची बहीण त्याच्या ११वी च्या एडमिशन घेण्यासाठी आले परंतू त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे संजय अबोल होता. बहीण सर्व उत्तरं द्यायची. मागील आयुष्याबद्दल विचारले असता त्याचे अबोलपणाचे कारणं समजली.  

बालपणात मुलांना निकोप आणि निरोगी मानसिक वातावरण जर घरात लाभलं नसेल तर मुलांच्या वाट्याला आलेले धक्कादायक अनुभव त्यांच्या बालमनावरील कधीही भरून न निघणाऱ्या जखमा करतात. शिवाय त्यांच्या स्वत:विषयीच्या कल्पनेवर त्याचा चुकीचा परिणाम होतो. अशाप्रकारे नकारात्मक आत्मकल्पना तयार झालेल्या व्यक्तींना त्यांच्या लहानपणी येऊन गेलेल्या अनुभवामध्ये खालील प्रमुख घटना असू शकतात.

१. आई-वडिलांची सततची भांडणं आणि तणातणी पाहून बालकाला, या सर्वांसाठी तो स्वत: दोषी असल्यामुळेच आईवडिलांची भांडणं होत आहेत असं वाटतं.

२. अस्ताव्यस्त आणि विघटित कुटुंब ज्यात कुटुंबातील व्यक्तींच्या भूमिका स्पष्ट नाहीत. प्रत्येक जण त्याबाबतीत गोंधळलेला असतो.

३. ‘वड्याचं तेल वांग्यावर’ या न्यायाने पालकांकडून खावा लागलेला मार आणि उपाशी ठेवणे, कोंडून ठेवणे अशा प्रकारचे सहन करावे लागलेले अत्याचार.

४. आई-वडिलांकडून आबाळ, त्यांच्या तिरस्कारयुक्त प्रतिक्रिया, त्यांच्याकडून पाल्याच्या जबाबदारीची होणारी टाळाटाळ.

५. मुलांनी सर्व बाबतीत ‘परफेक्ट’, परिपूर्ण असावं ही आईवडिलांची अट्टाहासी मागणी आणि त्यासाठीचं दडपण.

६. सर्वसाधारणपणे आई-वडिलांकडून मिळावयाच्या जिव्हाळ्याचा आणि प्रेमळ स्पर्शाचा अभाव.

७. खावी लागलेली तिखट, बोचक बोलणी-महामूर्ख, दळभद्री, वैरी इ.

८. वागण्यावर आई-वडिलांचे कडक निर्बंध आणि उत्स्फूर्तपणे वागल्यास भोगावे लागलेले त्याचे दु:खद परिणाम.

९. आई-वडिलांपैकी एकाचा, अथवा दोघांचाही अकाली अकस्मात मृत्यू.

१०. मोठ्यांनी मनात भरवलेली काल्पनिक गोष्टींची निराधार भीती, जसे भूत, राक्षस, हडळ इ.

११. बालवयात झालेला मोठा जीवघेणा आजार किंवा आलेले अपंगत्व.

बालपणी अनुभवलेल्या अशा प्रसंगातून निर्माण झालेली व्यक्तीची नकारात्मक आत्मकल्पना तिच्या पुढील आयुष्यात प्रभावित करू शकते असा समज सर्वत्र आढळतो; परंतु यातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत.

१.आपण असमर्थ आहोत, कुठलेही काम हाती घेतले तर आपल्याला ते जमणार नाही, असे स्वत:चे विचार नकोत.

२. फाजील आत्मविश्वास पेक्षा आहे त्या स्व बळावर आपले काम करू शकतो.

३. बालपणातील नकारात्मक अनुभवातून तयार होऊ शकणारा हा न्यूनगंड घालवायचा असेल, तर व्यक्तीने स्वत:विषयी अधिक वस्तुनिष्ठ रीतीने विचार करायला शिकले पाहिजे.

४. प्रत्येक्षात कृती महत्वाची.

५. योग्य व्यक्ती गुरु असेल तर कार्यसिद्धी होईल.

६. वेळीच समुपदेशन घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत होते.

७. नाविन्याची जोड देऊन मनाला भरकटू ना देणं यातच शहाणपण.

८. योग्य आहार, विचार, योगा, व्यायाम, संगीत, छंद असे अनेक प्रकार आपल्याला मानसिक स्वास्थ्य देऊ शकतात.

संकल्प करू सुखाचा, विसर पडो जुन्याचा…असे म्हणत आुष्यभरासाठी सुखी होणे शक्य आहे. भल्याबुऱ्या पूर्वानुभवांना चिकटून न राहता किंवा त्यामुळे सतत प्रभावित न होता उरलेल्या आयुष्याकरिता त्यापासून धडे शिकणे सहज शक्य आणि लाभकारी आहे.

योग्य समाज घडण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रेमानं वागवने गरजेचे असते. नवीन पिढीला प्रेरणादायी बनवायचे असेल तर प्रथम त्यांच्यासाठी सर्वांना आदराने वागणूक देणे गरजेचे.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *