वास्तव अवास्तव

काल एका व्यक्तीशी काहीं कामानिमित्त बोलण्याचा योग आला आणि त्याच्या बोलण्यातून अनेक असे शब्द आले की दोन मिनिटे मी विचारात पडलो. महाभयंकर, दुर्भाग्यपूर्ण, टेरिबल, हॉरिबल, दुर्धर, प्रलयंकारी, असह्य, मरणप्राय इ. शब्दांद्वारे तो त्याच्या नकारात्मक भावनांची तीव्रता अगदी सहजपणे वर्णन करीत होता. या विशेषणांचा नेमका अर्थ त्याला विचारला, तर बुद्धीला पटेल असा अर्थ मात्र तो सांगू शकत नव्हता. एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल म्हणून तिला वाईट म्हणता येईल ही वैचारिक गोष्ट झाली. अर्थात त्या व्यक्तीला याबाबत जाणीव नव्हती. अशा अनेक व्यक्ती आपल्या सभोवताली आहेत. 

इतरांचं वागणं आणि बाह्य घटना यावरून स्वत:ला अस्वस्थ बेचैन, दु:खी आणि निष्क्रिय करून घेणाऱ्या व्यक्ती स्वत:शी कशी मसालेवाईकपणे बोलत असतात ते जरा पाहू या.(निरीक्षण जरूर करा).

“ नोकरी सुटली तर मी उद्ध्वस्त होईन. त्याने मला वैताग आणला. त्याचे तोंड पाहिले की, डोक्यात तिडीक उठते. आज तो माझी संध्याकाळ खराब करणार. हातून अनिष्ट असं काही घडलं की, अपराधी वाटावं ही तर समाजाचीच शिकवण. तूच मला मोहात पाडलंस. तू जर हात धुऊन माझ्या मागे लागणार असशील तर मी मुळीच बदलायचो नाही. तुझ्यामुळेच मी भित्रा झालो. त्या नीच व्यक्तीने मला त्याप्रसंगी खाली पहायला लावले. माझ्या भोळेपणाचा व चांगुलपणाचा लोक असाच गैरफायदा घेत राहणार.’ अशा स्वगतातील प्रत्येक वाक्यातून हेच ध्वनित होते की, आपली सुख-दु:ख, वागण्यातल्या अडचणी या बाह्य घटना आणि दडपणामुळेच घडून येतात. आपण त्यांचे परिणाम मुळीच नियंत्रित करू शकत नाही. असे विचार वास्तवाशी विसंगत आणि निरर्थक आहेत.

आपल्या समस्याविषयक समज आणि विचारसरणीतील बुद्धीला न पटणाऱ्या आणि तीक्र नकारात्मक भावनांना जन्म देणाऱ्या, परिणामी स्वहिताला बाधक ठरणाऱ्या काही गोष्टी शोधून काढणे गरजेचे. म्हणून स्वत:ला काही प्रश्न विचारायला हवेत.

१. गोष्टी आपल्याला हव्या तशाच घडाव्यात अशी अट्टाहासी मागणी करणं.

२. इतरांचे प्रेम आणि मान्यता मिळविण्याची जिवापाड धडपड आणि न मिळाल्यास स्वत:चा अपात्र म्हणून धिक्कार करणं.

३. स्वत:ला न रुचणाऱ्या इतरांच्या वागण्याच्या आधारे इतरांवर शिक्के मारून त्यानुसार त्यांच्याशी व्यवहार करणं.

४. चिंता आणि टेन्शन घेऊन, देवाची करुणा भाकून संभवत: भयावह प्रसंग टळतील अशी खोटी आशा बाळगणं.

५. संभाव्य अवांछित परिणामांचा बाऊ, ‘राईचा पर्वत’ करणं किंवा त्यांचं अतिशयोक्तिपूर्ण वर्णन करणं.

६. स्वत:च्या समस्या सोडविण्याचा एकमेव, रामबाण आणि बिनचूक उपाय असलाच पाहिजे या अट्टाहासी धारणेपायी त्या उपायाचा कधीही न संपणारा शोध घेत राहणं.

७. काहीही आणि कसंही करून शारीरिक आणि मानसिक पीडा/गैरसोय टाळण्याच्या प्रयत्नांना अग्रक्रम देणं.

८. आपण चांगले म्हणून इतरांनीही आपल्याशी चांगलेच वागावं हा बुद्धीला न पटणारा आग्रह धरणं.

९. जिच्यावर पूर्णपणे निर्भर राहता येईल आणि जी आपल्या सुखदु:खाच्या किल्ल्या सांभाळून ठेवील अशा व्यक्तीचा शोध घेणं.

१०. आजच्या समस्यांची कारणं म्हणून अगदी बालपणापासूनच्या अनुभवांना उगाळत आणि कुरवाळत राहणं आणि सुखाची मावळती शक्यता अगतिकपणे बघत राहणं.

११. हाती घेतलेल्या कामात यश मिळालेच पाहिजे या हट्टापायी यशाची जर खात्री नसेल तर काम कुठल्या-ना-कुठल्या सबबी देऊन टाळणंच पत्करणं.

 

याशिवाय आणखी कितीतरी विवेकहीन आणि स्वहिताला बाधक अशा गोष्टी आपल्या विचारसरणीत सापडू शकतील. त्या साऱ्या विचारांचा, कल्पनांचा हळूहळू त्याग करून विवेकपूर्ण आणि स्वहिताला पोषक अशा विचारांना आत्मसात करणं हा नकारात्मक भावना नियंत्रणाखाली आणण्याचा हमखास उपाय आहे.

इतरांचं वागणं किंवा घटना या तुमच्या भावनात्मक अस्वस्थतांची खरी कारणं नाहीत हे लक्षात घेऊन नकारात्मक भावनांपासून आपण बऱ्याच प्रमाणात मुक्त होऊ शकतो आणि हव्या असणाऱ्या सुखदायी भावना अनुभवू शकतो हे ध्यानात आले पाहिजे.

आपण परिस्थितीच्या हातातील बाहुले असून दु:ख, राग, डिप्रेशन इ. नकारात्मक भावनिक परिणामांवर आपले नियंत्रण नाही हा गैरसमज दूर करून, विवेकपूर्ण आणि सकारात्मक धारणेची कास धरण्यातच मनुष्याचे खरेखुरे हित सामावले आहे.

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *