व्याधींनी ग्रस्त आणि त्रस्त झालेल्या लोकांमध्ये कमी अधिक प्रमाणात ‘आपण वेडे तर होणार नाही?’ ‘मनात नको नको ते विचार येतात’ अशी भीती आढळते. अशा आशयाची केस काल समोर आली. त्याला ‘वेडाचे भय’ म्हणा. मनोहरला आपल्या शरीराला नक्की काहीतरी झाले आहे किंवा होणार आहे असे सतत वाटत राहते. ‘काही लोकांना इतकी वेडाची भीती का बरे वाटत असेल?
१. त्यांना मनोविकृती (वेड) विषयी त्रोटक किंवा चुकीची माहिती असते.
२. त्यांची कल्पना अशी की, पुढे कदाचित आपला मनावरचा ताबा पूर्णपणे जाऊन आपले वागणे बेताल आणि अनिर्बंध होईल. कदाचित वेड्यांच्या इस्पितळात भरती व्हावे लागेल.
३. स्वत:च्या शरीरात जरा काही वेगळे दिसले किंवा जाणवले की, झाली त्यांची विचारचक्रं सुरू. ‘पुढे काहीतरी भयानक घडणार असल्याची तर ही नांदी नसेल?
४. सुतावरून स्वर्ग गाठण्याचा असा प्रकार काही जणांकडून होत असतो.
५. शारीरिक वा मानसिक अस्वस्थता मला नकोच, मला ती सहन व्हायची नाही, कधीमधी स्वत:कडून होणाऱ्या अशा विक्षिप्तपणामुळे माझ्या मनुष्यत्वालाच कमीपणा येतो असे तर्कदुष्ट विचार अशा व्यक्तींच्या मनात सतत येतात.
मानसोपचाराला सुरुवात झाल्यानंतर लवकरच लक्षात आलं की, मनोहरच्या विचारसरणीत; स्वत:कडे आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात काही त्रुटी आहेत आणि बऱ्याच अंशी त्या त्याच्या अस्वास्थ्याकरिता कारणीभूत होत्या. जशा की,
१. मी नेहमीच स्वस्थ आणि वेदनामुक्त असलंच पाहिजे.
२. सर्व संबंधितांचे प्रेम आणि मान्यता मला मिळायलाच हवी.
३. माझा विक्षिप्तपणा माझ्या लक्षात येतो, तसा तो असायलाच नको.
४. माझं केव्हाही आणि काहीही वाईट होऊ शकतं हा विचार मनात घोळवत ठेवला पाहिजे, चिंता केली तर कदाचित वाईट व्हायचे टळेल.
५. मी पूर्वी होतो तसा कर्तृत्ववान आज नाही, मग मी स्वत:ला लायक कसं म्हणू?
६. माझी दु:खे, परिस्थिती आणि दडपणांचाच परिणाम होतो. ती कमी करण्याची क्षमता माझ्यात नाही.
अशा व्यक्तींमध्ये कित्येकदा नंतर अपराधीपणाची भावना तयार होते परंतु वेळ निघून गेलेली असते. अशा गोष्टींमुळे त्यांचे नुकसान झालेले असते.
१. जवळील व्यक्ती त्यांच्याकडे नेहमीचेच म्हणून दुर्लक्ष करतात. कंटाळून जातात.
२. समजावूनही ऐकत नाही म्हणून मित्र परिवार दूर होतो.
३. काम करण्याची क्षमता कमी होते.
४. अजून डिप्रेशन मध्ये जाण्यासाठी रस्ता तयार होतो.
५. तारुण्याचा काळ निघून जातो म्हणून वाईट वाटते.
ठराविक थेरपी आणि समुपदेशन यामुळे सकारात्मक बदल होऊ शकतात. मुळातच अर्धवट माहितीवर आधारित असलेले विचार त्यांना अधिक माहिती देऊन मनाला सांत्वन करणे गरजेचे असते.
१. स्वत:ला निसर्गत: संभवणाऱ्या मर्यादा आणि व्याधिसकट स्वीकारू लागणे.
२. कामामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न निश्चित मदत करतो.
३. ध्यान धारणा, समुपदेशन यांची नियमित गरज असते.
४. प्रेम, मान्यता मिळाली नाही म्हणून आपण नालायक ठरत नाही ही भावना रुजवण आणि इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामध्ये बदल सकारात्मक हवा.
५. नित्य व्यायाम, मित्र मंडळी मध्ये हसून मिसळून व्यवहार, सकारात्मक विचार निर्माण करतात.
६. भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला जबाबदार न धरणे.
७. कुटुंबीयांची मदत हे अत्यंत महत्वाचं आहे.
८. ‘बिलकूल जमत नाही’ या समजांवर व सबबीवर कुठल्याही कामाला हात लावण्याचेच आपण बंद करतो, म्हणून असे अनेक गैरसमज समुपदेशना मुळे नाहीसे होऊ शकतात.
९. कित्येकदा असं घडण्या मागे शारीरिक आजार कारणीभूत असतात परंतु आपण त्यांना मानसिक कारण समजतो.
१०. स्वतःची कामे करायला उत्साह वाढवणे आणि पुन्हा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा.
विचारातील चुका लक्षात आणून द्यायला नेहमी मानसोपचारतज्ज्ञाची गरज नाही. स्वत:चंच हसू येतं आणि स्वत:ला ती व्यक्ती मूर्खात काढते; व्यक्तीने आपल्या परिस्थितीकडे निकोप, सकारात्मक आणि विवेकपूर्ण दृष्टीने पाहिले असते तर विक्षिप्त विचार आणि वर्तन यांना त्यामुळे आळा बसला असता आणि स्वत:च्या समस्या स्वतः अधिक समर्थपणे सोडवू शकलो असतो.
इथे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की, ईश्वरसुद्धा जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच मदत करतो. जो स्वत: स्वत:ची मदत करायला इच्छुक आणि प्रयत्नशील नाही त्याच्यासाठी ब्रह्मदेव पृथ्वीवर अवतरला तरी काय उपयोग?
©श्रीकांत कुलांगे
9890420209