खंबीरपणा – एक कौशल्य.

आपल्या कौशल्यांचा एक घटक असा आहे ज्याकडे आपण पुरेसे लक्ष देऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक प्रभावी क्रिया-प्रतिक्रियांचा तो पाया आहे, हा घटक म्हणजे खंबीरपणा. कित्येक क्लाएंटबरोबर बोलताना त्यांना “मी खंबीर भूमिका नाही घेऊ शकत” हा विषय नेहमी होतो. त्यावर काय केले पाहिजे हे प्रश्न नेहमीचेच.

खंबीरपणा म्हणजे अविचारी आक्रमकता आणि नकारात्मक निष्क्रियता यांचा सुवर्णमध्य आहे. खरी खंबीर व्यक्ती ही या दोघांसारखीही नसते. आक्रमक लोक हे असहिष्णू, आत्मकेंद्री, लोकांचा विचार न करणारे, शत्रुत्व मनात बाळगणारे आणि इतरांकडून अवाजवी अपेक्षा बाळगणारे असतात. इतर लोक त्यांच्यापासून दूरच राहतात. निष्क्रिय लोक हे कमजोर व उदासीन असतात. शिवाय ते स्वत:च्या हिताबाबत आग्रही नसतात. आक्रमक लोकांव्यतिरिक्त इतर लोक त्यांच्यापासून दूर राहातात. या दोन प्रकारांच्या मध्ये काही लोक असे असतात की जे त्यांचे विचार इतरांपर्यंत पोहोचवतात आणि इतरांनाही आपले विचार प्रकट करण्यापासून थांबवत नाहीत. अशा लोकांपैकी एक होणे हे आपल्याला साध्य करायचे आहे. जे पुरुष आणि स्त्रिया हे साध्य करतात ते खंबीर असतात; मग खंबीरपणा म्हणजे नेमके काय?

१. खंबीरपणा म्हणजे भीती, बुजरेपणा, निष्क्रियता यांच्यावर तसेच रागावरदेखील तोडगा होय.

२. खंबीरपणा म्हणजे स्पष्टपणे बोलणे, न्याय्य मागण्या करणे आणि तुमच्या हक्कांचा इतर लोकांएवढाच आदर केला जावा याचा आग्रह धरणे.

३. खंबीरपणा म्हणजे प्रश्न वैयक्तिक पातळीवर न नेता, नकारात्मक विचार व्यक्त करण्याची कुवत.

४. प्रश्न कसे विचारावेत, असहमती कशी दर्शवावी आणि परिपक्वपणे नकार कसा द्यावा हे खंबीर व्यक्तीला माहिती असते.

५. केवळ विरोधासाठी विरोध करणे हा याचा मथितार्थ नसून, घडणाऱ्या बाबी अधिक चांगल्या प्रकारे घडाव्यात याकरता जबाबदारी स्वीकारणे या हेतूने ‘का’ हा प्रश्न अधिकारी व्यक्तीला सकारात्मक दृष्टिकोनातून विचारण्याची ताकद म्हणजे खंबीरपणा.

मग सर्व व्यक्तींना खंबीरपणे सामोरे जाण्याची ताकद का नसते हा प्रश्न पडतो. ती ताकद निर्माण करण्यासाठी काय करावं?

१. आरशासमोर उभे राहणे. समस्येचा सामना स्वतःमध्ये करण्यासाठी असणारे गुण शोधणे. ‘भेडसावणाऱ्या समस्यांची’ यादी करून सुरुवात करायला हरकत नाही.

२. स्वत:चे प्रामाणिक मूल्यमापन. खंबीरपणे न वागल्यामुळे तुमचे काय नुकसान झाले याची जाणीव करून घेणं. व्यक्तिमत्त्वांच्या गुण-दोषांची एक यादी तयार करून त्यावर काम करणे.

३. तुमच्या भोवतालच्या जगाचे मूल्यमापन. वस्तुस्थितीबद्दलच बोला आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. दुसऱ्या लोकांच्या गरजा विचारात घेऊन स्वत:मध्ये बदल करण्याची तयारी ठेवणे हादेखील खंबीरपणाचाच एक भाग आहे.

४. प्रत्यक्षात बदल करणं. जे कौशल्य आत्मसात केले ते वापर करताना, सोप्या आणि कमी ताणतणावाच्या प्रसंगांपासून सुरुवात करा. खंबीरपणा एका रात्रीतून नाही येत. आत्मविश्वास संपादन करा. तुमच्या वर्तणुकीत टप्प्याटप्प्याने बदल करा आणि अधिक अवघड प्रसंगाची तयारी करा.

जेव्हा आपण खंबीरपणे स्वत:ला व्यक्त करतो, तेव्हा तशीच संधी इतरांना मिळण्यासाठी त्यांचे बोलणेही लक्षपूर्वक ऐका. लक्षात घ्या की आपल्याला समोरच्याला हरवायचेही नाही आणि स्वत: जिंकायचेसुद्धा नाही. सर्वांनीच जिंकणे किंवा आपण जिंकलो असे सगळ्यांना वाटणे हे आपल्याला साध्य करायचे आहे. बरेचदा हे साध्य करायला वेळ लागतो. काही वेळा प्रश्नावर तत्काळ उत्तर मिळवण्याची तुमची मागणी रास्त असली तरी काही वेळेस ते त्रासदायक ठरू शकते. प्रत्येक परिस्थितीसाठी खंबीरपणा हाच सोनेरी नियम चपखलपणे लागू होतो. इतरांच्या गरजा आणि मागण्या यांचा विचार करा आणि त्यांनीही तुमच्या मागण्यांचा विचार करावा अशी अपेक्षा ठेवा. यावर तडजोड नको. ऑल दी बेस्ट.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *