जोडीदार व मानसिक आजार

 

मानसिक आजाराबाबत आपल्याला जास्त माहिती नसते म्हणून त्याबाबत काय करावं, कसं ओळखावं म्हणून मला काल दिवसभर फोनवर विचारणा होत होती. यापूर्वीसुद्धा वर्तमानपत्राद्वारे भरपूर माहिती दिली गेलेली आहे परंतु या गोष्टींकडे पाहण्यासाठी वेळ नसतो किंवा ती माहिती गरजेची वाटत नसते. जेव्हा मी त्यांना मानसिक आजाराची लक्षणे सांगितली तेव्हा सविताने न राहवून विचारले की हे सर्व लक्षणे माझ्या पती मध्ये आहेत व त्यासाठी मी काय करावे? खूप प्रामाणिक प्रश्न होता. त्याआधी आम्ही पुन्हा हे सर्व लक्षणे डिस्कस केली की खरंच तिच्या पतीमध्ये ते आहेत का. आपण जर बारकाईने पाहिले तर या गोष्टी प्रथम सामान्य वाटतात. आपल्या जवळपास एखादी व्यक्ती काही खालील लक्षणे दाखवत असतील तर समजा की काहीतरी प्रोब्लेम आहे.

१. झोप आणि भुक नेहमीपेक्षा मोठ्याप्रमाणात बदल होणे. वजन वाढ किंवा कमी पटकन दिसून येते.
२. भावनांमध्ये बदल होणे. परिस्थितीकडे दुर्लक्ष होणे, दुःख किंवा आनंद या भावना दाखवण्यात असमर्थ असणे, आत्महत्येचे विचार, निराशेची भावना, अयोग्य वेळी हसणे इत्यादी.
३. दीर्घ वेळ काही काम न करता बसून राहणे.
४. लक्ष केंद्रित होण्यास समस्या येणे. ध्यानात न राहणे किंवा तार्किक विचार करायला वेळ लागणे.
५. अत्याधिक भीती किंवा अस्वस्थता. चिंताग्रस्त होणे किंवा घाबरून जाणे.

अशा काही लक्षणांपैकी एक किंवा दोन आढळली तर तो मानसिक रोगी आहे असं समजू नये. परंतु अशा गोष्टी जर लवकर ध्यानात आल्या तर त्यांना पुढे जाण्या अगोदर चेक करणे गरजेचे आहे. जर कुणा मध्ये अशी लक्षणे एकाच वेळी दिसून येत असतील आणि नेहमी सारखं आयुष्य जगण्यामध्ये अडथळा निर्माण करत असतील तर मात्र पटकन मानसिक आरोग्य तपासणी करून घेणे हिताचे आहे. सविताला हेच सांगून पुढे कसं वागायचं याबाबत कल्पना दिल्या;

१. अशा व्यक्तीला सपोर्टची गरज असते, सहानुभूतीने राहिलं तर पुढील उपचार करायला तयार होतात.
२. मानसिक आजाराबाबत शक्य ती माहिती करून घ्या. योग्य प्रशिक्षित मानसशास्त्रज्ञ शोधून उपचार सुरू ठेवणे.
३. स्वतः थेरपिस्ट न बनता तज्ञाला त्याचे करू देणे. तज्ञ आणि आपण मिळून अशा व्यक्तीला चांगली मदत करू शकतो.
४. स्वतः समुपदेशन घेतल्याने आपले मानसिक आचार व विचार शांत रहाण्यास मदत मिळते.
५. स्वतः च्या मनाबरोबर तब्येतीची काळजी घेणे महत्वाचं आहे. जर तुम्ही सशक्त तर मन आणि विचार सशक्त.
६. मेडिटेशन, पूजा प्रार्थना मनाला भरकटू देत नाही.

यशस्वी जोडप्यांना मानसिक आजारपण त्यांचे वैवाहिक जीवन किंवा नातेसंबंध नष्ट होऊ देत नाहीत, तर त्याऐवजी असलेल्या परिस्थितीचे व्यवस्थापन करून त्यावर मात करतात. कुटुंबातील व्यक्तींनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या तर अशा अनपेक्षित किंवा समस्याग्रस्त परिस्थितीमध्ये यश मिळवण्यासाठी चांगला प्रतिसाद देऊ शकतात. मानसिक आजार पूर्णता बरा जरी नसेल होत तरीसुद्धा त्यावर उपचार व्यवस्थित घेतले आणि सांभाळ केला तर त्यात चांगली सुधारणा होऊ शकते म्हणून एकमेकांची काळजी मनापासून आणि आनंदाने उचलली पाहिजे.
परंतु ही वेळ येऊच नये म्हणून एकमेकांना समजून घ्या, आदर करा, प्रेमाने व समजदारी दाखवुन राहिले तर आयुष्यात अंधार न रहाता आनंदीआनंद असेल.

© श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *