पालकत्व

आजकल अनेक विद्यार्थी एक वेगळ्या मनः स्थितीत आढळतात. कोव्हिड पश्चात पालक बदलत गेले, त्यांचे वागणे बोलणे, संगोपनाची पद्धत बदलली असे अनेक उदाहरणं दाखवून जातात. त्याचबरोबर मुलांची मानसिकता बदलली. त्यांचे अकलनिय वर्तन पालकांच्या डोक्यात येईनासे झाले. मुलं आणि पालक सध्या याच कारणास्तव समुपदेशन घेताना दिसतात. मग नेमका प्रश्न कुठून सुरू होतो?

बालमनावर आई-वडिलांच्या शिकवणी-संस्कारांचा, प्रेमाचा, रागावण्याचा वा शाबासकी देण्याचा परिणाम होत असतो. तसेच त्यांच्या अभिवृत्तीचा, मूल्ये आणि मतांचा किंवा पूर्वग्रह आणि परंपरांचाही मुलांच्या मनावर खोलवर ठसा उमटत असतो. यातूनच त्यांचा पालक अहं (पेरेंट ईगो) विकसित होतो. रूढी, रीतीभाती, परंपरा या पालक अहंच्या माध्यमातून एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाताना दिसतात. यात गडबड झाली की मुलांची उलघाल होऊ शकते.

पालक अहं हा दोन प्रकारचा असतो. एक संगोपन करणारा, संगोपक (नर्चरिंग) तर दुसरा नियंत्रक (कंट्रोलिंग).

संगोपक पालक अहं हा प्रेम करणारा, काळजी घेणारा, धीर व प्रोत्साहन देणारा आणि भावनांशी तादात्म्य पावणारा, तर

नियंत्रक पालक अहं हा टीका करणारा, दोष दाखवून देणारा, आपली मते इतरांवर लादणारा, माझेच खरे अशी आग्रही भूमिका घेत हुकूमशाही गाजवणारा. याच्या बोलण्यात ‘च’चा नेहमी उपयोग केला जातो.

वरील दोन्ही प्रकारच्या पालक अहंचा विकास प्रत्येक व्यक्तीत होत असतो. मात्र हा विकास लहानपणीच्या संस्कार आणि अनुभवांवरच कसा अवलंबून असतो ते पालकांचे एकेक नमुने बघितले की, अधिक स्पष्ट होईल. पालक म्हणून आपण कोणत्या प्रकारात मोडतो तेही तपासून बघता येईल.

• मुलाला सतत कमी लेखणारे, त्याच्यातील दोष काढणारे, त्याच्यावर मूर्ख, बावळट असे शिक्के मारणारे पालक वस्तुत: त्या मुलामध्ये त्याच्याच कुवतीविषयी साशंकता, संभ्रम निर्माण करत असतात, तर ‘‘थांब, तुला ते जमणार नाही, मी मदत करतो’’ असे म्हणणारे पालक त्याला एक प्रकारे दुबळा बनवत असतात. मग मोठा झाल्यावर हा मुलगा इतरांवर अवलंबून राहतो, स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाही.

• मुलाला ‘‘खोली आवरल्याशिवाय तुला जेवायला मिळणार नाही’’ असे आज दटावणारे पालक उद्या म्हणतात, ‘‘पटकन जेवण आटोपून घे, नंतर खोली आवर.’’ आत्ता एक अन् दुसऱ्याक्षणी अगदी उलट सूचना करणारे पालक मुलांच्या मनात गोंधळ निर्माण करतात. हा मुलगा मोठेपणी बाप झाल्यावर त्याच्या मुलांना वाढवताना गोंधळलेला असण्याचीच शक्यता जास्त! कारण स्वत:च्या पालकांच्या विसंगतीपूर्ण आणि सातत्याचा अभाव असलेल्या वर्तनाचेच तो नकळत अनुकरण करत असतो.

• लहानसहान गोष्टींवरून सतत वितंडवाद घालणारे आणि परस्परविरोधी मतप्रदर्शन करणारे पालक असणाऱ्या मुलाच्या– तो मोठा झाल्यावर– पालक अहंमध्ये संघर्षच असतो. त्यामुळे पालक म्हणून वावरताना कधी तो आईच्या तर कधी वडिलांच्या मताप्रमाणे वागताना दिसतो. म्हणजे हेही विसंगतच.

• काही पालक मुलांच्या बाबतीत फारच उदासीन असतात व स्वत:ला त्यांच्यापासून अलिप्त ठेवतात. जणू त्यांना मुलांशी काही देणेघेणेच नसते. ‘‘मी फार बिझी आहे, तेव्हा मला डिस्टर्ब करू नका‘‘, अशी काहीशी त्यांची भाषा असते. अशा पालकांची मुले मोठेपणी थंड, अलिप्त आणि अंतर ठेवून वागणारीच बनतात. • काही पालक अति नियोजनबद्ध असतात व जणू एखाद्या भावना विरहित शासकाच्या भूमिकेत वावरतात. ना दोष काढणे, ना कुठे भावनिक ओलावा. यंत्रवत काम पार पाडणे एवढेच ते करतात. अशा पालकांची मुले मोठेपणी त्यांच्या पालक अहं अवस्थेत एकतर बंडखोरी करतात किंवा कधी अलिप्तपणे तर कधी आज्ञाधारकपणे वागतात. म्हणजे एकूण वागण्यात पुन्हा गोंधळच.

वर वर्णन केल्याप्रमाणे पालक असतील तर त्यांच्या पाल्यांना स्वत:बद्दल खात्री उरत नाही. मोठेपणी पालक बनून स्वत:च्या मुलांना वाढवत असताना ते गोंधळलेले असतात. कारण ते स्वत:च्या पालकांचे विसंगतीपूर्ण आणि सातत्याचा अभाव असलेल्या वर्तनाचेच अनुकरण करत असतात.

आता यात बदल घडवून आणता येतो का? तर हो, बदल घडवून आणता येतो. मग त्यासाठी काय करायला हवे? तर यासाठी व्यक्तीने स्वत:चा पालक अहं कोणते शब्दप्रयोग करतो, अशाप्रकारे मत व्यक्त करतो, याकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्याची सागंड प्रौढ अहंशी घालून दिली पाहिजे. कित्येकदा अप्रचिलत किंवा कालबाह्य झालेले विचार जेव्हा पालक व्यक्त करतात तेव्हा ते त्यांच्या पालक अहंमधून आलेले असतात. ‘आमच्यावेळी असे होतं…’ अशी सुरुवात करणाऱ्यांनी तर हे आवर्जून लक्षात घ्यावे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *