अविवेकी विचार

अविवेकी विचार काही लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अशा व्यक्तींसाठी समुपदेशन करताना खुप वेळा मनात येते की खरंच यांना जीवनाचा आनंद कधी भेटलाच की नाही.

सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात साधारणत: कोणकोणते अविवेकी विचार येऊ शकतात याची एक यादीच अल्बर्ट एलिसने सांगितली आहे. त्यातील काही खाली नमूद करत आहे. प्रत्येक अविवेकी विचारानंतर त्याच्याशी संबंधित आपले विचार कंसात दिलेले आहे. आपल्या मनात यातील कोणते विचार येतात हे वाचकांनी स्वत:च तपासून पाहायचे आहे.

१.समाजाच्या प्रत्येक घटकाकडून मला प्रेम, आदर व स्वीकृती मिळाली पाहिजे. (असा अट्टहास नको. गोष्ट स्पृहणीय असली तरी अत्यावश्यक नाही.) २.दुष्कृत्ये करणारांना कठोर शासन झालेच पाहिजे. (अशी कृत्ये करण्यामागची कारणे लक्षात घेऊन त्या व्यक्तींना सुधारण्यास मदत करणे अधिक चांगले.)

३.मला हव्या तशा गोष्टी न घडणे हे अतिशय दु:खदायक आहे. (परिस्थितीत होईल तेवढा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हिताचे. अटळ आहे ते स्वीकारलेले बरे.)

४.मी सर्व क्षेत्रात निष्णात, कार्यक्षम व यशस्वी असलेच पाहिजे. (हे अत्यंत अवघड आहे. स्वत:च्या मर्यादा ओळखून कार्यरत राहणे गरजेचं. परिपूर्ण कोणीच नसतो.)

५.माझ्यावर परिस्थितीकडून व इतरांकडून दु:ख लादले जाते. त्यावर माझे नियंत्रण नाही. (घटना व व्यक्तींकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर दु:ख अवलंबून असते. ते कमी करणे बऱ्याच अंशी आपल्या हाती असते.)

६.समस्या, अडचणी व जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्यापेक्षा त्या टाळणे अधिक सोपे. (असा पलायनवाद अंतिमत: अहितकारक ठरतो. आल्या प्रसंगाला तोंड देणे केव्हाही योग्य.)

७.एखादं संकट त्याबद्दल सतत काळजी केल्यास दूर होईल. (संकटमुक्तीसाठी योग्य प्रयत्न करणे चांगले. काळजी करत बसून काहीही फायदा नाही. उलट तोटाच होईल.)

८.जुन्या घटनांचा व अनुभवांचा माझ्यावर इतका जबरदस्त प्रभाव आहे की तो काढून टाकणे शक्य नाही. (भूतकाळ विसरणे अवघड खरे. पण पूर्वानुभवांना चिकटून न राहताही आयुष्याला सामोरे जाता येते.)

९.स्वत:च्या हातून झालेल्या चुकांबद्दल सतत स्वत:ला दोष द्यावा व अपराधीपणाची भावना बाळगावी. (आपली चूक मान्य करून ती दुरुस्त करणे हितावह. मात्र कायम अपराधीपणाची भावना बाळगल्यामुळे स्वत:ची प्रगती खुंटते.)

१०.जीवनातल्या प्रत्येक समस्येला अचूक उत्तर असते व ते न सापडल्यास अरिष्ट कोसळते. (योगायोग व संभाव्यता यांनी व्यापलेल्या जगात सर्वच बाबतीत निश्चिती व परिपूर्णता असू शकत नाही.)

११.एखाद्या बलशाली व्यक्तीवर आपण अवलंबून राहिले पाहिजे. (शरीर व मन निरोगी असताना स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी स्वत:नेच पार पाडणे केव्हाही योग्य.)

१२.सुख म्हणजे निरुद्योगी आणि निष्क्रिय असणे. (कोणत्याही चांगल्या कार्यात, छंदात गढलेल्या व्यक्तीच सुखी असतात.)

जोपर्यंत व्यक्ती चिंता, वैरभावना घेऊन वावरत असते, तोपर्यंत तिच्या जीवनात आनंद आणि सुख प्रवेश करू शकत नाही. व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, समृद्ध भावजीवनासाठी स्वहिताची जाणीव, आत्मनियंत्रण, सहिष्णुता, बांधिलकी या गोष्टी जशा आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे विचारातील लवचिकता, वैज्ञानिक दृष्टिकोन असणेही आवश्यक आहे. स्वत:चे गुणदोष लक्षात घेऊन थोडी धडाडी दाखवली तर आपलं उद्दिष्ट सहज साध्य करतायेतं.

थोडक्यात, आपलं सुख, समाधान व आनंद आपल्याच हाती असतो. विचारसरणीत योग्य फेरबदल केल्यास तो कुणालाही मिळवता येतो. जोपर्यंत व्यक्ती चुकीचे विचार सोडून तर्कसंगत आणि स्वत:च्या विकासाला पोषक असे विचार आत्मसात करत नाही तोपर्यंत ती समस्यामुक्त होत नाही. आपली विचारसरणी आपणच घडवायची असते. स्वभावात बदल घडवून आणण्याचे हेच मुख्य सूत्र आहे. त्यासाठी परिश्रम मात्र हवेत. यासाठी खालील प्रयोग करून पाहा.

• मनात वारंवार येणाऱ्या त्रासदायक विचारांनी त्रस्त असाल तर एका कागदावर त्या विचारांची आणि् त्या अनुषंगाने होणाऱ्या आपल्या स्वगताची नोंद करा.

• नोंदलेल्या विचारांच्या आणि स्वगताच्या मुळाशी दडलेल्या अवाजवी, अविवेकी धारणांचा निष्पक्षपणे शोध घ्या. यासाठी वरील यादीची मदत होऊ शकेल.

• अशा धारणांचे मनातून उच्चाटन करा व त्याऐवजी शास्त्रीय, वास्तववादी व विवेकपूर्ण विचार आत्मसात करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा.

• समुपदेशन घेत चला. चांगल्या विचारांच्या समूहात रहा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *