समस्या आणि समुपदेशक

समस्या सोडविताना समुपदेशक कसा काम करतो हा प्रश्न एका शालेय विद्यार्थ्याने विचारला. त्याला विस्तृत माहिती देताना काही तथ्य सांगितली. अशा विद्यार्थ्यांसारखेच प्रश्न साधारण व्यक्तींना पडणं स्वाभाविक आहे.
माझ्याकडे येणाऱ्या समस्याग्रस्त व्यक्तींचे मी सर्वसाधारण तीन गटांत वर्गीकरण करतो:
१. पहिल्या गटातील व्यक्तींना आपल्याला काहीतरी समस्या आहे हे जाणवत असते, मात्र ती नेटकेपणाने त्यांना मांडता अथवा व्यक्त करता येत नाही. मित्र, नातेवाईक, शिक्षक, शेजारी अशा कोणाबरोबर तरी त्या माझ्यापर्यंत पोहचतात. त्यांना घेऊन येणाऱ्या व्यक्तीच यांच्या समस्येबद्दल स्वत:चे आकलन मला सांगतात. खऱ्या समस्येचे स्वरूपच अव्यक्त असल्यामुळे तिचे निराकरण लवकर होण्याची शक्यता नसते. समुपदेशकाला अशा व्यक्तींना कौशल्याने बोलते करून त्यांच्या समस्येचा शोध घ्यावा लागतो. मानसशास्त्रीय चाचण्यांची मदत समस्येचे मूळ, स्वरूप आणि तीव्रता समजण्यास होते आणि त्यानंतर तिच्या सोडवणुकीच्या दृष्टीने योग्य कार्यवाही कोणती याबद्दल विचार करता येतो.
२. दुसऱ्या गटातील व्यक्ती पहिल्या गटातील व्यक्तींच्या अगदी उलट. हे लोक सजग व सुजाण असतात. त्यांची स्वत:कडे व इतरांकडे बघण्याची एक चिकित्सक नजरच तयार झालेली असते. त्यामुळे एखाद्याच्या वागण्या-बोलण्यातील बारकावे, त्यात झालेले बदल ते सहज टिपतात. अशा व्यक्ती समस्यांबद्दलचे संक्षिप्त पण अचूक टिपणच घेऊन येतात. (उदा. रागावर नियंत्रण नाही, संवाद कौशल्यांचा अभाव, अतिसंवेदनशीलता, आळशीपणा वगैरे). यात काही शारीरिक समस्यादेखील समाविष्ट असतात. समुपदेशकाला ही माहिती अर्थातच उपयुक्त ठरते.
३. मात्र बहुसंख्य व्यक्ती तिसऱ्या गटात मोडतात. या व्यक्तींना स्वत:ला काहीतरी समस्या असल्याचे जाणवत असते. मात्र ती स्वबळावर सोडवणे त्यांना जमत नाही. वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तके, इंटरनेटसारख्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना स्वत:च्या समस्येची बऱ्यापैकी जाणही आलेली असते. मग अशा माहितीची कात्रणे घेऊन ही मंडळी येतात. मनात विचारचक्र जोरात फिरत असते. सुरुवात कुठे करावी ते कळत नसते. विचारांचा गोंधळ आणि भावनांची गुंतागुंत असते.

वरील तिन्ही गटांतील व्यक्ती वय, स्वभाव आणि समस्या प्रमाणे भिन्न असतात. प्रत्येकाची समस्या वेगळी, भूमिका वेगळी. मग आम्ही नेमकं काय करतो?

१. समस्याग्रस्त व्यक्ती कशीही असली तरी तिच्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहचून तिला तिची समस्या सोडवण्यासाठी मदत करणे, हे समुपदेशकाचे कर्तव्य असते.
२. विशिष्ट परिस्थितीसंदर्भात व्यक्तीने स्वत:ला समजून घ्यावे.
३. स्वत:च्या क्षमतांचा उपयोग करून आत्मनिर्भर बनावे.
४. स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास शिकावे.
५. भविष्यात समस्या उद्भवल्याच तर त्यांचे निराकरण स्वबळावर करता येईल इतपत समर्थ व्हावे, या उद्देशाने समुपदेशक तिला मदत करत असतो.
६. आवश्यक असलेले आत्मभान त्या व्यक्तीत यावे, तिच्या भावनांना योग्य ते वळण लागावे, तिचे चुकीचे विचार दुरुस्त व्हावे, आवश्यक तिथे तिच्या दृष्टिकोनात आणि वर्तनात बदल घडावा यासाठीही समुपदेशक तिला प्रेरित करत असतो.

एखाद्याच्या मनाचे बंद दरवाजे उघडणे हे अवघड असते. समुपदेशकाचे कसब त्यातच असते. उघडल्यानंतर त्या मनात काय काय सापडेल हा पुढचा भाग. मात्र दरवाजा उघडण्यासाठी लागणारी एक महत्त्वाची चावी म्हणजे त्या व्यक्तीचे स्वगत. हे स्वगत म्हणजे नेमके काय? तर स्वगत म्हणजे आपण आपल्याशीच बोलत राहणे, वाद घालणे! अन्य कोणाच्याही प्रतिक्रियेची त्यात अपेक्षा नसते. स्वगत कुठल्याही संदर्भात असू शकते. एखाद्या घटनेच्या किंवा प्रसंगाच्या संदर्भात, एखाद्याच्या स्वभावाविषयी, आपल्याच चुकीबद्दल पश्चात्ताप प्रतिक्रियेच्या स्वरूपात नाही तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, अगदी तत्त्वचिंतकाच्या भूमिकेतूनही!
मानसोपचार तंत्रांमधील एक महत्त्वाचा घटक म्हणून या स्वगताला विशेष महत्त्व आहे. अर्थात असे अनेक प्रकार समुपदेशक त्या त्या व्यक्तींवर उपचारार्थ वापरत असतो. समुपदेशकांच्या ज्ञानाचा वापर हा विविध समस्यांसाठी केला जातो. म्हणून फक्त वेड्यांनीच समुपदेशकाकडे जावे ही भूमिका बदल्याची वेळ आली असून, कुठल्याही सुदृढ व्यक्तीनं जवळच्या समुपदेशन केंद्राला भेट देऊन आपल्या समस्या लवकरात लवकर सांगितल्या की मानसिक आराम वाटून आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *