संतोष आणि अमृता दोघेही एकमेकांना अत्यंत नकारात्मक भावनेतून पहात होती आणि त्यांना एक शेवटचा प्रयत्न आणि पर्याय म्हणून समुपदेशन घ्यायचे ठरविले. बोलताना त्यांना नकारात्मक भावनांचे झाड व त्याबाबत कल्पना दिली.
जर तुम्ही नकारात्मक भावनांच्या झाडाचे चित्र कल्पनेत आणू शकलात, तर आपल्या अनुभवाला येणाऱ्या नकारात्मक भावना ही त्या झाडाची फळे आहेत, असे म्हणता येईल. तुमच्या मनातील नकारात्मक भावना काढून टाकण्यासाठी काहीही करुन हे झाड कापून टाकावे लागेल. इथे आपल्याला मोठे यश मिळते म्हणून समजून घ्या:
१. निंदा करणे, दोष देणे, हे त्या झाडाचे खोड आहे.
२. दुसऱ्या व्यक्तीने केलेल्या अथवा न केलेल्या एखाद्या कृत्याबद्दल (की जे तुम्हाला आवडत नाही) त्याला दोष दिल्याशिवाय नकारात्मक भावना आपल्या मनात येणे अशक्य आहे.
३. निंदा करणे, दोष देणे तुम्ही थांबवलेत की मनात नकारात्मक भावना येणारच नाहीत.
साधी सोपी परंतु अवघड अशी गोष्ट, दुसऱ्याला दोष देणे आपण कसे थांबवू शकतो?
१. प्राप्त परिस्थितीची जबाबदारी स्वीकारली की परिस्थिती, व्यक्ती, प्रश्न, अडचण यांच्याशी जोडलेल्या नकारात्मक भावना नाहीशा होतात.
२. तुम्ही स्वत: आनंदी होण्यासाठी ज्या कोणी तुम्हाला दुखावले असेल, त्याला तुम्ही क्षमा करणे गरजेचे आहे. त्यातल्या त्यात, आपण आपल्या पालकांना क्षमा केली पाहिजे. तुमच्या व्यक्तिगत किंवा व्यावसायिक संबंधातील कोणाही व्यक्तीने जर तुम्हाला कधीही दुखावले असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही क्षमा करणे.
३. सगळे सोडून द्या. ‘तुम्ही सूर्यप्रकाशाकडे तोंड केलेत की तुमची सावली तुमच्या मागे पडते.तुम्ही आजवर ज्या काही चुका केल्या असतील, त्यापैकी प्रत्येक चुकीबद्दल तुम्ही स्वत:ला क्षमा करुन स्वत:ला मोकळे करा.
४. जबाबदारी, नियंत्रण आणि सकारात्मक भावना. आयुष्यात आपण किती जबाबदारी स्वीकारता आणि आयुष्यावर तुमचे किती नियंत्रण असते, याचा थेट संबंध असतो.
५. दुसऱ्या माणसाला दोष दिल्यामुळे आपण नकारात्मक भावनांनी भरलेले, संतप्त, रागिष्ट आणि दुर्बल होतो. म्हणून दुसऱ्या माणसाबद्दल तक्रार करुन, त्याच्यावर टीका करुन, आपण स्वत:ला त्याचा बळी का करता!
जबाबदारीचा स्वीकार करणे हे नेत्याचे, मार्गदर्शकाचे, यशस्वी व्यक्तीचे, स्वयंप्रेरित व्यक्तीचे लक्षण आहे. आजपासून एक जबाबदार आणि पूर्णत: कार्यप्रवण असा माणूस होण्याचा निश्चय कराच. ‘मी जबाबदार आहे’, हे शब्द वारंवार आणि मनापासून म्हणा! सकारात्मक विचारांची ही गुरुकिल्ली आहे. एकूणच, सकारात्मक विचार आणि संपूर्ण चांगुलपणातले जगणे आपल्याला आपल्या कार्यात शिखराप्रत जाण्यास मदत करणार आहे.
©श्रीकांत कुलांगे
9890420209