स्मरणशक्ती – आयुष्याची जोडीदार

स्मरणशक्तीस पोषक तत्त्वे कुठली आहेत असा प्रश्न एका वेबनार मध्ये विचारण्यात आला. अर्थात विद्यार्थी दशेत असे प्रश्न प्रत्येकाला पडतात म्हणून त्यावर चर्चा केली. 

सर्व प्रथम, काय केलं पाहिजे म्हणजे स्मरणात राहील? अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी सांगितल्या.

१. निवांत जागी, प्रसन्न वातावरणात बसून अभ्यास केला तर लक्ष विचलित न झाल्यामुळे व अभ्यासावरच केंद्रित झाल्याने वाचलेले स्मरणात राहण्यास मदत होते.
२. मोठ्याने वाचल्याने वाचण्याच्या क्रियेतून वाचलेल्या मजकुराचे श्रवण झाल्याने व डोळ्यांनी वाचताना पाहिल्याने, तीन ज्ञानेद्रियांमार्फत तो मजकूर मेंदूच्या वेगवगळ्या केंद्रांत नोंदविला जातो.
३. विविध माध्यमे, संगणक यांचा उपयोग केल्यानेही असा दुहेरी फायदा मिळतो.
४. अभ्यासानंतर झोप काढली तर झोपेत अभ्यासाची उजळणी होते. त्यामुळे मिळालेली माहिती मेंदूत घट्ट रूजते.
५. विषय नीट समजला तर व आवडीचा असेल तर स्मरणात चांगला रूजतो. रूजलेल्या मजकुराची उजळणी जेवढी वरचेवर होईल, तितका तो दीर्घ स्मरणात राहतो.

अर्थात जगभरात वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. स्मरणशक्ती चांगली राहावी म्हणून अजून एक पद्धत वापरली जाते. त्याला ‘PQRST’ पद्धत म्हणतात. यात
P – Preview (पूर्व विचार)
Q – Question (संभाव्य प्रश्न)
R – Read ( वाचन )
S – Self Recitation ( मनन )
T – Test (चाचणी)
असा अभ्यास केला तर तो संस्मरणीय ठरतो. परीक्षा असो, अथवा भाषणाची तयारी, मुद्दे काढणे व ते लक्षात राहण्यासाठी नेमॉनिक्स पद्धतीचे एखादे वाक्य तयार करुन लक्षात ठेवणे, तसेच पेग सिस्टम किंवा काव्यपंक्तीच्या स्वरुपातही तेच साध्य करता येते.
मग स्मरणशक्ती कमी होण्यास काय कारणे यावर सुध्दा उहापोह करण्यात आला.

१. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम होतो.
२. जन्मजात गुणवत्ता कमी असणे.
३. अभ्यास करण्याची चुकीची पद्धत.
४. अयोग्य आहार आणि कमी झोप. हिरव्या पालेभाज्या, दूध, दही व फळे यांचा आहारात समावेश नसणे किंबहुना त्यांची अवड नसणे.
५. हिंसक कौटुंबक वातावरण.
६. एखाद्या विषयाबाबत नकारात्मक मानसिकता.
७. अयोग्य संगत.
८. माहितीचा अभाव, अयोग्य गुरु.
९. व्यायामाची कमी.

स्मरणशक्ती बाबत काही तथ्य आहेत. जसे की;

१. कुठल्याही दोन व्यक्तींची स्मरणशक्ती सारखी नसते.
२. स्मरण म्हणजे फक्त मागील नोंदीची आठवण नसून, आजच्या प्रसंगाच्या अनुषंगाने त्या जुन्या माहितीचा सुधारित आढावा व उपयोग आहे.
३. स्मरणशक्ती आणि हुशारी नेहमीच हातात हात घालून चालतात असे नाही. काही लोकांची स्मरणशक्ती उत्तम असते; पण ते व्यवहारात हुशार नसतात, तर काही लोक ‘बुद्धिमान’ किंवा ‘हुशार’ या सदरात मोडत असले तरी त्यांची स्मरणशक्ती त्यांना नेहमी साथ देतेच असे नाही.
४. प्रत्येकाच्या स्मरणशक्तीत नैसर्गिक जनुकीय देणगी व स्मरणशक्ती वाढविण्याचे प्रयत्न या दोहोंचा संगम झालेला असतो.
५. माणसाच्या उजव्या आणि डाव्या मेंदूमध्ये काही साधर्म्य, तर काही भिन्नताही असते. डावा मेंदू बारकावे हेरतो. स्त्रिया डाव्या मेंदूचा हा पैलू जास्त परिणामकारकरीत्या वापरतात. त्यामुळे त्यांचे निरीक्षण जास्त प्रभावी असते.

स्मरणशक्तीला खरे तर ना सीमा ना अंत, अशी परिस्थिती असते. तरीही आपण काही वेळा म्हणतो, ‘बस्स, माझं डोकं आता काम करत नाही.’ अशा वेळी आपल्याला काही ऐकण्याची, पाहण्याची किंवा शिकण्याची इच्छा नसते इतकेच. स्मरणशक्तीत जागा शिल्लक नाही असा त्याचा अर्थ बिलकूल नसतो. आहे की नाही गंमत!!

© श्रीकांत कुलांगे
9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *