नकार आणि फुटबॉल

मी जेव्हा काही करायचं ठरवलं तर घरचे नेहमीच मला नकार देतात आणि या नकाराचा मला कंटाळा आलाय. कोणीच मला कसं समजून घेत नाही? नकार का याचे कारणही देत नाहीत. मग मी आयुष्यात मोठा कधी होणार तेच समजत नाही. अशी केस मागील आठवड्यात समुपदेशन साठी आली होती. त्या तरुणाला घरातून, बाहेरून नकारार्थी घंटा नेहमीच ऐकल्याने त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता.  

त्याला सांगितलं की जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर नकार कसा हाताळायचा हे शिकावेच लागेल. नकार हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार. त्याबाबत काही तथ्ये आहेत.

१. नकार हा पूर्णपणे कपोलकल्पित असतो हे समजून घेणं आवश्यक.

२. नकार हा मुळात अस्तित्वातच नसतो. तो फक्त आपल्या कल्पनेत असतो.

३. आपले म्हणणे नाकारले जाणे यामागे असणाऱ्या कारणांचा आपल्या मागील घटनांशी संबंध असतो.

४. नकाराला महत्त्व जास्त दिलं जातं, त्यामागील भूमिकेला नाही.

५. भूमिका समजाऊन घ्यायची आपली भूमिका कित्येकदा नसते, त्यात अहंकार दुखावला की प्रश्न वाढतात.

६. तीव्र इच्छाशक्तीमुळे अनेक वेळा नकार मिळूनही यश मिळू शकते याला इतिहास साक्षी आहे.

७. यशोमंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक नकारघंटा वाजत राहणार याची सवय करून घेणं.

सत्य हे आहे की, मागितल्यामुळे तुमचा कसलाही तोटा होत नाही, झाला तर फायदाच होतो. आपण घरी कोणतीही गोष्ट मागितली किंवा करायची इच्छा सांगितली आणि आपल्याला नकारात्मक प्रतिसाद असेल तर काही छुपे कारणं असू शकतात.

१. आपल्यावर विश्वास नसणे

२. कदाचित त्यांना आपली सांगण्याची पद्धत समजली नसावी.

३. आपली मागणी विसंगत, अवास्तव असावी

४. आर्थिक टंचाई.

५. नकारात्मक मानसिकता.

६. आयुष्यात त्यांनीही काही केलेलं नसते, तुम्ही काय करणार यातही स्वारस्य नसते.

७. रिस्क घ्यायची आणि हार पचवायची ताकद नसणे.

८. त्यांचा स्वतःवर विश्वास नसणे. समज नसणे, बुद्धिमत्तेची कमी.

काहीतरी चाकोरीबाहेरचा विचार आपण केला पाहिजे असे नेहमी सांगितले जाते परंतु हा नकार नेहमीच असेल तर आपण उन्नती कशी करणार? भारत देश यासाठी मागे राहतोय हे लक्षातच येत नाही. म्हणून नवीन पिढीने एकच ध्यानात ठेवायचे ते म्हणजे, तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचण्यासाठी मागा, मागा, मागा आणि तुम्ही जे मागताय त्याला ‘होय’ उत्तर मिळेपर्यंत ‘पुढचा, पुढचा, पुढचा’ म्हणावे लागेल. विचारणे, मागणे हे शेवटी सगळे आकड्यांचे खेळ आहेत. तो फार मनाला लावून घेऊ नका. कारण तो मनाला लावून घेण्याजोगा नसतोच मुळी. तोवर योग्य जोड सापडलेली नसते, इतकंच.

२०२० आज संपताना यावर्षी झालेल्या चुका दुरुस्त करून नवीन वर्षात नकारला सकारात्मकतेने घेणे गरजेचे आहे तरच आपण आत्मनिर्भर शकतो. मला आमच्या शाळेची शिकवण नेहमीच प्रेरणा देते, “उद्धरावा स्वये आत्मा” स्वतःच्या आत्म्याचा स्वतःच उद्धार करायचा असेल तर नकाराला फुटबॉल सारखं खेळायला शिकायचे. बघा जमतंय का!

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *