प्रतिसादाला प्रतिसाद

मी आज स्वयंपाक छान बनवला म्हणून सर्वांचा अभिप्राय अत्यंत प्रेरणादायी आला. अर्थात एका भाजीत मीठ कमी होते म्हणून आजीने प्रेमाने कानात सांगितल्याने तो विचार आपुलकीचा वाटला. प्रफुल्ला म्हणजे एक ग्रॅज्युएशन करणारी मुलगी जी काही आठवड्यांपूर्वी समुपदेशन घेण्यासाठी आली होती आणि तिला मिळणाऱ्या अभिप्रायाबद्दल विस्ताराने सांगितले होते की त्यांचा विचार कसा करायचा. आज ती समाधानी याच कारणासाठी होती, कारण तिच्यात तिने केलेले बदल आता सकारात्मक विचारांमध्ये तबदील झालेले होते.  

म्हणून आपण सर्वांनी आयुष्यात अभिप्राय घेतले पाहिजेत. त्याला काही कारणं आहेत.

१. एकदा आपण कृती करायला सुरुवात केली की ती कृती योग्य आहे किंवा नाही यासंबंधीचे अभिप्राय आपल्याला मिळू लागतील.

२. आपल्याला माहिती, सल्ला, मदत, सूचना, मार्गदर्शन मिळेल इतकेच नव्हे तर काही लोक टीकादेखील करतील.

३. या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला आपले नाव व क्षमता वाढविण्यासाठी तसेच दृष्टिकोन व नातेसंबंध अधिक निकोप करण्यासाठी होईल.

४. आपण अधिक वेगाने पुढे जाऊ शकू.

एकदा अभिप्राय मिळाल्यावर आपण त्याला प्रतिसाद देण्याची तयारी ठेवली पाहिजे. कित्येकदा अनेकांच्या विविध प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या असतात.

१. याला कौतुकच नाही मी काही केले तर…

२. फक्त नावं ठेवता येतात ह्यांना.

३. जास्तच लाडीगोडी लावतोय, नक्कीच काहीतरी हवं असेल.

४. ह्यांना कोणी विचारलं अभिप्राय द्यायला.

५. नसती बला कशाला. आ बैल आणि मला मार. नसता उद्योग.

६. चांगलं म्हटलं असतं तर ह्याच्या काय *** गेलं असतं.

७. आभारी आहोत आपल्या अभिप्रायाबद्दल. नक्कीच आम्ही याचा विचार करू.

८. आपलं मत मला आवडलं. धन्यवाद.

९. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केलाय त्यावर आम्ही तोडगा काढू.

आपणाला मिळणाऱ्या अभिप्रायांना प्रतिसाद देण्याचे अनेक मार्ग असले तरी त्यापैकी काही मार्ग अजिबात उपयोगी नसतात:

१. ओरडणे, खचून जाणे, हार मानणे, टाळणे व सोडून देणे.

२. अभिप्राय देणाऱ्या स्रोतावर चिडणे.

३. अभिप्राय ऐकून न घेणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे.

भरपूर प्रतिक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने येतात. त्यात प्रामुख्याने दोन: सकारात्मक आणि नकारात्मक.

१. सकारात्मक प्रतिसाद आपल्याला अधिक आवडतो. याउलट नकारात्मक प्रतिसाद आपल्याला आवडत नाहीत. सकारात्मक प्रतिसादांमध्ये असते तितकीच उपयुक्त माहिती नकारात्मक प्रतिसादांमध्येही असते. आपण चुकीच्या मार्गाने चाललो आहोत, भलत्याच गोष्टी करीत आहोत हे आपल्याला अशा प्रतिसादांमुळेच कळते. हीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे.

२. नकारात्मक प्रतिसाद म्हणजे आपणाला चुका सुधारण्यासाठी मिळालेली संधी आहे असे मी मानतो. मी कुठे आणि कशाप्रकारे सुधारणा करू शकतो हे जग मला सांगत असते.

मी माझे वर्तन कशाप्रकारे सुधारू शकतो किंवा एखादे काम मी अधिक चांगल्याप्रकारे कसे करू शकतो व मला हव्या असलेल्या गोष्टी – अधिक पैसा, अधिक विक्री, बढती, अधिक चांगले नातेसंबंध, चांगली श्रेणी किंवा क्रीडाक्षेत्रात अधिक यश कशाप्रकारे मिळवू शकतो याविषयीच्या त्या सूचना असतात.

आपली उद्दिष्टे अधिक जलद साध्य करायची असतील तर सर्व प्रकारच्या अभिप्रायांचे आपण स्वागत आणि स्वीकार करून त्यानुसार आपल्या कृतीत योग्य तो बदल केला तर चांगला उपयोग होईल.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देताना आपल्याला हे वर्ष मानसिक सुख शांती चे जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *