मानसिकता अभ्यासाची

 

अजयची आई त्याच्या अभ्यासाबाबत चिंता व्यक्त करत होत्या. कितीही अभ्यास केला तरी हवा तसा रिझल्ट येत नाही म्हणून काही करता येईल का याबाबत विचारणा केली. बुध्यांक असून सुद्धा त्याचा वापर मुलं किती करतात त्यावर अवलंबून असते. बर्‍याच विद्यार्थ्यांना वेळ मर्यादित आहे म्हणून उपलब्ध असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करणे अपेक्षित असतो. हे होतं की नाही यासाठी ठराविक गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये कायम चेक केल्या पाहिजेत.

१. वेळेचा उपयोग. वेळेचा अपव्यय होतो का?
२. अभ्यासाची जागा योग्य आहे की नाही. काही गोष्टी ज्या आपले मन विचलित करू शकतात.
३. वाचनाची आवड. आज कित्येक विद्यार्थी वाचनात कमी आहेत.
४. नोट्स काढणे. अर्थात पालकांनी, शिक्षकांनी मुलांच्या नोट्स नेहमी चेक केल्यास बऱ्याच त्रुटी आढळतील.
५. शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा. आपण का शिकतोय हे आजकलच्या कित्येक पदवीधर विद्यार्थ्यांना सुध्दा समजत नाही.
६. स्मरणशक्ती. अयोग्य अभ्यास पद्धती, आहार, प्रकृती, आजार अशा अनेक कारणांनी स्मरण शक्ती कमी होऊ शकते.
७. परीक्षेची भीती.
८. शारीरिक व मानसिक आरोग्य.

कुठल्याही वर्षातील विद्यार्थी हा आपल्या अभ्यासाच्या पद्धती बदलू शकतो व त्यासाठी मनापासून इच्छा हवी. एक प्रभावी आणि कार्यक्षम विद्यार्थी बनणे ही रात्रीतून घडणारी गोष्ट नाही, परंतु काही गोष्टी रोजच्या सरावात ठेवल्याने तुम्हाला अभ्यासाच्या वेळेचा अधिकाधिक फायदा होईल.

१. नवीन गोष्टी शिकणे आणि सराव करणे सुरू ठेवणे गरजेचे.
२. वेगळ्या पद्धतीने अभ्यास केल्यास फरक पडतो. आज नवनवीन कल्पना आणि उपकरणे आहेत. स्मार्ट होणे काळाची गरज.
३. विचलित करणाऱ्या गोष्टी अभ्यासिकेतुन हद्दपार करूया.
४. एकट्या ऐवजी ग्रुपमध्ये अभ्यास केलेला ध्यानात राहतो. जे शिकलो ते इतरांना शिकवल्यास अजून छान.
५. प्रॅक्टिकल अभ्यास. स्वतः करून पाहिल्यास जास्त अनुभव व ज्ञान मिळते. जे शिकतो त्याचा रोजच्या जीवनात काय उपयोग आहे याची माहिती यातून मिळते.
६. अवांतर वाचन. वाचनाचा वेग वाढवला पाहिजे. नवीन माहिती वाचनातून मिळते जी इतर स्पर्धा परीक्षेत कामास येते.
७. स्वतःची अभ्यास पद्धत शोधून तिचा वापर.
८. योगा, व्यायाम, बुद्धिबळ, शब्दकोडे, छंद, योग्य आहार आणि कुटुंबातील संवाद साधला की मन हलके होऊन वातावरण निर्मिती चांगली होते.

अधिक प्रभावीपणें शिकण्यास वेळ लागू शकतो आणि नवीन सवयी प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच सराव आणि निश्चय करावा लागतो. बुध्दीमत्ता वाढत नाही पण अचूक पद्धती वापरून आहे तिला योग्य प्रमाणात कशी व कुठे वापरण्याचं तंत्र जमल्यास विद्यार्थ्यांना उद्या हा अतिशय सुंदर असेल. चला तर मग, आपल्यातील अवगुण शोधून त्यावर योग्य उपचार करुया.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *