अनेक मित्रांच्या मागणीनुसार पुन्हा मानसिक आजारावर मी काहीतरी लिहावे म्हणून आग्रह होता, म्हणून आजचा लेख.
सामान्य माणसास इतर माणसांच्या वर्तणुकीने त्यांचा परिचय होतो. एखाद्या माणसाचा स्वभाव चांगला आहे, बरा-वाईट आहे. शीघ्रकोपी किंवा शांत आहे. सज्जन, दुर्जन, दुष्ट, उदार-कंजूष, प्रेमळ, तुसडा असे एक ना अनेक स्वभाव आपल्याला परिचित असतात. आपण सतत जवळच्या, लांबच्या पण परिचित व्यक्तींच्या स्वभावविशेषाचे किंवा वर्तणुकीचे मूल्यमापन करीत असतो. पूर्वी सामान्य माणसास मानसिक आजारांची नावे किंवा लक्षणे माहीत नसत. माणूस शहाणा किंवा वेडा आहे अशा दोनच संभावना माहीत असत. आता जसजसे सर्वसामान्य माणसाचे सामान्यज्ञान वाढत गेले, तसतशी त्याच्या प्रकृती, स्वास्थ्य, आजार व त्याचे उपचार याबद्दलच्या सामान्य ज्ञानातही मोठी भर पडलेली आहे.
१. स्किझोप्रेनिया : या आजारात आनुवंशिकतेचा अंश असतो, पण पूर्ण कारण कळलेले नाही. या आजारात भास, आभास व भ्रम यांचा पगडा रूग्णाच्या मनावर असतो. बोलणे आणि वागणे बरेच असंबद्ध असते.
२. चिंता (Anxiety): चिंता मनाला जाळीत असते. भीती, चिंता या दोन्हीही माफक प्रमाणात जगण्यास आवश्यक आहेत. मात्र अनाठायी चिंता आजाराला आमंत्रण देते व चितेकडे नेते. मृत्यूची चिंता ही सर्वांत मोठी, पराकोटीची चिंता असते. अशा चिंतेमुळे बेचैनी, थकवा, कामावर लक्ष केंद्रित न होणे आणि स्नायूही ताठर बनणे, अशी लक्षणे दिसतात.
३. अवास्तव चिंता: दैनंदिन जीवनातील घडामोडींची अवास्तव चिंता वाटते, त्यामध्ये फोबिया पण सामील आहेत. कोणाला उंचीची, बंद खोली किंवा लिफ्टची, आरशाची, पाण्याची, सुंदर बायकांची भीती वाटते.फोबिया असणाऱ्या रूग्णांना ज्याचा फोबिया आहे अशा परिस्थितीच्या संपर्कात आल्याबरोबर छातीत धडधडणे, स्नायू गलितगात्र झाले असे वाटणे, डोक्यावर ताण येणे, थकवा येणे, मळमळ होणे, उलटी येणे, छातीत दुखणे, दम लागणे, घामाने चिंब होणे, असा त्रास होतो.
४. तीव्र भीती (Fobia): या विकाराने पीडित व्यक्तींपैकी काही लोकांना थोडी जास्त भीती वाटते, पण ते सहन करु शकतात.अनाठायी भितीलाच फोबिया म्हणतो.तर ज्यांना भीती खूप तीव्रतेने जाणवते अशा लोकांना धाप लागणे, छातीत धडधडणे, छातीत दाब जाणवणे किंवा छातीत दुखणे, संपूर्ण शरीर थरथरणे, चक्कर येणे, घामाने चिंब होणे, बधिरपणा किंवा अंगात मुंग्या येणे, पोटात खड्डा पडणे, मळमळणे, उलटी येणे, डोके दुखणे, शरीरापासून विलग झाल्याची भावना होणे, वेड लागल्याची भावना होणे व त्या ठिकाणाहून पळून जाण्याची तीव्र इच्छा होणे, अशा प्रकारचा असह्य त्रास होतो. त्यांना जाणीव असते की त्यांची भीती अनाठायी आहे; पण त्यांचा स्वत:वर ताबा राहत नाही.
५. बरोबर की चूक: आपली कृती एकाच वेळी बरोबर आणि चूक असू शकते का? हो असे असू शकते. झोपण्यापूर्वी घराचे दरवाजे व्यवस्थित बंद असल्याची खात्री करणे बरोबर; पण तीच गोष्ट सात-आठ वेळा करणे आणि तरीही नीट बंद केल्याची खात्री न वाटणे चूक.
६. स्त्रियांच्या समस्या: स्त्रीमध्ये उत्तेजना येत नाही त्याला ‘थंडपणा’ असे म्हणतात. ‘भीती किंवा जोडीदाराबद्दल नावड किंवा घृणा, मानसिक ताण, नैराश्य, वाढते वय, गर्भावस्था, बाळाला अंगावर पाजणे, रजोनिवृत्ती अशा होर्मोन्सच्या पातळीतील बदलांमुळे, इस्ट्रोजेन व टेस्टोस्टेरॉन या होर्मोन्सच्या कमतरतेमुळे व इतरही काही कारणांनी असा थंडपणा असू शकतो.
७. व्यसने: व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना व्यसनांची साधकबाधक सर्व माहिती असूनही ते स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तरीही त्यांना नशिल्या पदार्थांपासून वंचित ठेवले तर त्यांना शारीरिक त्रास सुरु होतो.कुठलेही व्यसन हे कुठल्याही समस्येचे समाधान नसते.
८. नैराश्य (Depression): नैराश्य आलेल्या व्यक्तीचा मूड खालावलेला असतो. कामाचा उत्साह नसतो. नैराश्यामुळे त्या व्यक्तीचे आचार, विचार, भावभावना आणि शारीरिक स्वास्थ्य यांवर विपरीत परिणाम होतो. ती व्यक्ती दु:खी-कष्टी होते. चिंताग्रस्त असते. पोकळी वाटणे, निराशावाद येणे, हतबलता, आपल्याला किंमत नाही असे वाटणे. अपराधीपणाची भावना निर्माण होणे, दोषी असल्याची भावना निर्माण होणे, चिडचिडेपणा वाढणे, बेचैन होणे व मनात आत्महत्येचे विचार येण. नैराश्य हा नेहमीच मानसिक आजार नसतो. प्रियजनांचा मृत्यू, आर्थिक स्थिती कोलमडणे, उदरनिर्वाहाचे साधन गमावणे किंवा अपघातात अवयव जाऊन अपंग होणे, कॅन्सर, एड्ससारख्या आजाराने किंवा तीव्र वेदनेने ग्रासले जाणे, या व अशा कारणांनी नैराश्य येऊ शकते.
अजून अनेक मानसिक आजार आहेत आणि समाजात आज त्यांची ओळख होत आहे. या सर्वांना काही उपाय आहेत आणि ते व्यक्ती, काळानुरुप बदलत आहेत किंवा काही आजार पूर्ण नाहीसे होतात तर काही संयमित ठेऊ शकतो. ठराविक आजारांना अद्याप उपाय सापडलेला नाही.
म्हणून मानसिक स्वास्थ्य जर आपण योग्य ठेवले तर वर दिलेल्या रोगांपासून आपण नक्कीच दूर राहू शकू.
१. रागाचे नियमन.
२. ध्यान धारणा, योगा, व्यायाम, योग्य आहार.,
३. योग्य वेळी समुपदेशन, डॉक्टरांचा सल्ला.
४. आदर आणि कौतुक हे चांगल्या सवयी वापरल्यास त्रास कमी होतो.
५. समस्या आपण निर्माण करतो व त्याला पर्याय असतात.
६. शिक्षण, सेवाधर्म याचा अंगीकार.
७. व्यसन मुक्ती साठी सर्वांची साथ.
८. सोशल मीडिया पासून दूर, मोबाईलचा अतिवापर कमी.
अशा खूप काही गोष्टी आपल्या सुखी संसाराची सूत्रे असू शकतात. मानसिक रोग इतर रोगांसरखीच पण अत्यंत त्रासदायक असतात म्हणून वेळीच काळजी घेऊ. मानसिक स्वास्थ नियमित चेक करून घ्या व त्यावर प्रभावीपणे अंकुश ठेऊया.
© श्रीकांत कुलांगे
9890420209