नातेसंबंध आयुष्यात आनंद, समाधान आणि तणाव व्यवस्थापनासाठी विस्मयकारक फायदे करतात, परंतु त्याच बरोबर आव्हाने सुध्दा असतात. जेंव्हा आव्हाने जास्त असतात तेंव्हा मात्र जोडपी तणावग्रस्त होतात. संजय व सुषमा याच नाजूक दोरीवर लटकून बसलेले. काय करावं हे सुचेना म्हणून समुपदेशन घेण्यासाठी आले होते. प्रश्न क्षुल्लक पण ते सोडवण्याचा मार्ग खुंटलेला. दोघेही माघार घेण्यासाठी तयार नाहीत. वैवाहिक जीवनात एकामागे असे विविध प्रश्न जोडप्यांना विस्कळीत करतात. त्यात प्रमुख समस्या ज्या जाणवल्या त्या म्हणजे,
१. पैशाच्या समस्या. सगळ्या जोडप्यांना प्रामुख्याने सतावणारा प्रॉब्लेम.
२. मुलांच्या समस्या. जेंव्हा मुलं आयुष्यात येतात तेंव्हा होणारा त्रास दोघांना तणावग्रस्त करतात.
३. रोजचे नवीन प्रश्न. हेच आहे त्या समस्यांमध्ये वाढ करतात.
४. व्यस्त वेळापत्रक. एकमेकांना वेळ न देणे आणि त्यातून होणारा त्रागा.
५. संवादाची कमी. वेळ असून सुध्दा जोडीदाराला वेळ न देणे, मोबाईल किंवा मित्रांबरोबर व्यस्त.
६. वाईट सवयी. ड्रग्स, अल्कोहोल, स्मोकिंग, इत्यादी. रात्री उशिरा येणे. जोडीदाराला शिवीगाळ, मारहाण, मानहानी. उलट उत्तर देणे,
७. संशयी वृत्ती. चारित्र्यावर संशय. निराधार शंका घेणे.
८. विवाहबाह्य संबंध.
९. जोडीदार व्यतिरिक्त इतर कुटुंबीयांना दूर ठेवणे अथवा नातेवाईकांची मध्येच लुडबुड.
संजय व सुषमा यांना दोन पर्याय आहेत. एक तर प्रश्न सोडवून पुढे चालणे किंवा काडीमोड करून नवीन प्रश्नांना तोंड देणे. कित्येकदा वेगळे होणे गरजेचे परंतु तेवढे गंभीर प्रश्न नसतील तर मात्र पुनर्विचार करावा. अन्यथा येणारे धोके लक्षात घेता ते किती त्रासदायक असू शकतात याची कल्पना न केलेली बरी.
१. नातेवाईक, कुटुंबातील सदस्य यांचा रोष.
२. नैराश्य, उदासीनता, तणाव. त्यातून मानसिक आजार.
३. आर्थिक नुकसान.
४. शारीरिक ताण.
५. पुढील भविष्याची चिंता.
६. कुटुंब साथ देणारे नसेल तर प्रश्नांमध्ये वाढ.
७. कोर्ट, कचेरी हजेरी, प्रसंगी मनस्ताप.
८. एकाकीपणाची पोकळी.
९. समाजाची पाहण्याची नजर.
वैवाहिक जीवनात असा प्रसंग आल्यास सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात शहाणपण. जोड्या विजोड असू शकतात परंतु त्या योग्य प्रकारे हाताळता येतात. म्हणून देवाने डोके दिलेय त्याचा उपयोग करून घेणे हिताचे. विवाह वाचावण्याचा प्रयत्न वडीलधारी मंडळी याचसाठी करतात परंतु तरुण जोडप्यांना प्रामुख्याने अहंकार / स्वाभिमान, सांभाळून घेण्याची अक्षमता, स्वप्नपूर्तीचा ध्यास ना इकडचे ठेवतात ना तिकडचे.
©श्रीकांत कुलांगे
9890420209