निंदा आणि वागणुक

 

माझ्याबद्दल कुणीतरी पाठीमागे नेहमी बोलतात म्हणून मला त्रास होतो असे सांगताना संजयचा चेहरा थोडा चिंताग्रस्त होता. काम करत असताना होणारी त्याची हेटाळणी नवीन नाही. जगातील कोठेही कार्यालयीन वातावरणात काम करणार्‍या जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला निंदानालस्ती चा अनुभव येतो. आणि प्रामाणिकपणें बोलायचे झाले तर, आपल्यात प्रत्येकाने आयुष्यात एकदा का होईना कुणाची तरी निंदा केलेली आहे व आपली कुणीतरी. हा एक गॉसिपचा प्रकार आहे व तो कळत नकळत होत असतो. काही गोष्टींचा समावेश निंदा करायच्या अगोदर विचारात घेणे आवश्यक.

१. माहिती खरी आहे का?
२. त्याचा त्या व्यक्तीवर परिणाम चांगला होईल का?
३. काही फायदा आहे का?
४. जरुरी आहे का?

मानसशास्त्रीय संशोधक सांगतात की अशा निंदा करणाऱ्या व्यक्ती, आपली प्रगती होत नाही या निराशेपोटी करतात. अर्थात यातून त्यांचा हेतू काहीं जरी असला तरी संजयला याबाबत वाईट वाटले होते. त्याला त्याचे फायदे समजाऊन सांगितले तेंव्हा त्याचा चेहरा आनंदी झाला.

१. निंदकाचे घर असावे शेजारी. त्यातून आपल्या चुका फुकट कुणीतरी सांगत असते.
२. त्यातून योग्य ती चूक दुरुस्ती करता येते.
३. आपली आर्थिक व सामाजिक उन्नती व्हायला मदत होते.
४. कठोर मेहनत करायला प्रेरणा मिळते. हीच प्रेरणा आपल्या प्रमोशनला कारण ठरते.
५. कळत नकळत का होईना, आपल्याबद्दल कुणीतरी बोलल्यामुळे आपले नाव शहाण्याच्या यादीत घेत असते.
६. निंदा करणाऱ्या व्यक्तीची योग्यता ध्यानात घेऊन प्रत्युत्तर दिले तर चांगले.
७. निंदा झाली तर योग्य त्या ठिकाणी, वेळेत गरज भासल्यास ठामपणे प्रत्युत्तर देणे गरजेचे.
८. नैराश्य येण्याअगोदर अशा विचारांना मनातून बाहेर काढणे गरजेचे. त्यासाठी विश्लेषण वेळोवेळी होणे आवश्यक.

जेंव्हा आपण कुणाची निंदा करतो तेंव्हा आपल्याकडून काहीं गोष्टी घडतात.

१. नकळत आपली मुलं, ते पाहतात व ऐकतात. आणि त्याचप्रमाणे त्यांचे वर्तन बनते.
२. समाजात आपली किंमत कमी होते. अनेक लोक आपल्याला टाळायला लागतात.
३. नैराश्येच्या दरीत जाणे प्रारंभ होते.
४. घरात, ऑफिसमध्ये नेहमीं शंका घ्यायला लागतो. आपल्याबद्दल कुणीतरी बोलतात असे वाटते
५. मानसिकता नकारात्मक होते.
६. एखाद्या व्यक्तीचा विनाकारण द्वेष करून त्रास व्हायला लागतो, त्यातून रक्तदाब वाढतो.
७. मजा व टाईमपास साठी केलेल्या निंदा कित्येकदा मार खायला लावतात.

कारण काही असो, एक तर निंदा करू नये. नकळत केलीच तर त्याबाबत माफी मागून मनावरील ताण कमी होतो. या जगात आपण कशासाठी आलोय याचे भान प्रत्येकाने ठेवले तर सामाजिक, कौटुंबीक एकोपा राहुन एकमेकांच्या मदतीने आत्मनिर्भरता यायला वेळ लागणार नाही. पूर्वी गावागावात आपापसातील भेदभाव विसरून इर्जिक घालायचे. आता ते दिवस पुन्हा येणे दुरापास्त पण प्रयत्न कुणाचीही निंदा न करण्यापासून करुया. जर निंदा करणे हा आपला स्वभाव असेल तर मात्र मानसशास्त्रीय तज्ञाला जरूर भेटून समुपदेशन घेणे चांगले.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *