तिरस्कार व आपण

तिरस्कार आणि बदला घेण्याची भाषा बोलणारी व्यक्ती रागाने तडफडत समुपदेशन घ्यावे की नाही या विचाराने माझ्याबरोबर फोनवरून बोलत होती. प्रथम त्याला सांगितले की बदला घेण्याची मोठी किंमत चुकवावी लागते! जर तो तयार असेल तरच बदला घ्यावा. तो मोजायला तयार आहे असे म्हणून फोन पटकन बंद केला. 

जेव्हा आपण आपल्या शत्रूचा तिरस्कार करतो तेव्हा काही गोष्टी पडद्यामागे होत असतात.

१. शत्रू आपल्यावर मानसिक हुकमत गाजवतात.

२. आपल्या झोपेचा ताबा घेतात.

३. आपल्या भुकेवर अनिष्ट परिणाम करतात.

४. आपले ब्लडप्रेशर, आपले आरोग्य, आपला आनंद सगळ्यांवरच झाकोळ येतो.

५. आपल्या शत्रूंना जर हे समजले की, त्यांच्यामुळे आपले किती नुकसान झाले आहे, तर त्यांना अधिकच आनंद होतो.

६. ते आपल्याला किती दु:ख देत आहेत आणि त्रस्त करत आहेत या कल्पनेने ते सुखी होतात.

७. आपण त्यांचा तिरस्कार करतो हे समजल्याने त्यांना दु:ख होत नाही.

८. आपला तिटकारा आपल्यालाच नरक-यातनांमध्ये ढकलतो.

९. तिरस्कारापोटी आपल्या अन्नाची चवसुद्धा बिघडते.

ज्यांच्या कपाळावर सतत आठ्या असतात. चेहऱ्यावर खूप सुरकुत्या असतात आणि त्यांचे चेहरे तिरस्काराने ताठर झालेले असतात आणि रागामुळे ते विद्रूप दिसतात. जगातील कोणतीच सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया त्यांच्यावर उपाय करून त्यांचे नैसर्गिक सौंदर्य परत आणू शकत नाही.

आता जग बदलले आहे आपणही बदलायला हवं म्हणून जसास तसे वागणे नेहमीच गरजेचे नसते.

१. मृदू भाषेत दिलेल्या उत्तराने परिस्थिती निवळते.

२. जर आपली परवानगी नसेल, तर कोणतीच व्यक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाही.

३. पूर्वी अशी म्हण होती की, जो माणूस रागावू शकत नाही तो मूर्ख असतो, पण आता आपण असे म्हणू, जो माणूस रागावत नाही तो शहाणा असतो.

४. मानसिक आनंद हा सर्वोपरी आहे, ही विचारधारा मनात रुजवणे अवघड नाही.

५. आपण आपल्या काम मध्ये व्यग्र राहिलो तर तिरस्काराची भावना शक्यतो मनात येत नाही.

६. मस्ती जिरवण्यासाठी देव आहे. हे लक्षात आले तरी पुरे.

आपल्या सर्वांना हे माहीत हवं की, फक्त देशभक्ती पुरेशी नाही. कोणाच्याच प्रति तिरस्कार किंवा कडवटपणा असणे उपयोगाचे नाही.

प्रत्येक माणसाला त्याच्या पापाची शिक्षा इथेच भोगावी लागते. जो माणूस कायम हे लक्षात ठेवेल तो कोणावर रागावणार नाही. दुसऱ्याशी नीचपणाने वागणार नाही, दुसऱ्याला शिवीगाळ करणार नाही, तिरस्कार करणार नाही, सतत दुसऱ्याला दोष देत राहणार नाही आणि समोरच्याचा अपमान करणार नाही.

प्रत्यक्षात आपण इतके साधुसंत नसतो की, आपल्या शत्रूवर प्रेम करू, पण निदान आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या आनंदासाठी तरी आपण त्यांना माफ केले पाहिजे व विसरून जायला पाहिजे. तसे करणेच शहाणपणाचे असते.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *