कृतज्ञतेची अपेक्षा

 

रागीट माणूस विषारी असतो आणि जेंव्हा त्याच्या मनाविरुद्ध किंवा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेंव्हा त्यांचा संताप व्यक्त होत असतो. प्रचंड मानसिक त्रासातून अशा व्यक्ती आपल्या सभोवताली असलेल्या कुटुंबीयांना, मित्रांना परेशान करतात. अशाच एका व्यक्तीची बायको विचारत होती की ह्यांना कसं सुधारायचे.

कृतज्ञता हे खूप चांगल्या लागवडीचे फळ असते. ते सर्वसाधारण सगळ्या लोकांकडून मिळत नाही हे त्या व्यक्तीला कदाचित कळत नव्हतं.

अशा व्यक्तींना समजत नाही की अशा त्राग्याने त्यांच्या जीवनात किती उलथापालथ होईल. मानसशास्त्रज्ञ मंडळींनी काही गोष्टी नमूद करून ठेवल्या आहेत, जसे की.

१. कडवटपणा व संताप मनात घर करून राहतो.

२. एकटेपणाला सामोरे जावे लागते. ते दुर्लक्षित होतात.

३. मानसिक आजार जडण्याची शक्यता असते.

४. कुणावरही विश्वास ठेवणं अवघड जाते.

५. प्रत्येक गोष्टीकडे व्यावहारिक नजरेने पाहतात व अपेक्षा ठेवतात.

६. स्वतः उपकाराची भाषा बोलणारी माणसं कित्येकदा अहंकारी बनतात. तो स्वभाव बनतो.

७. अतिशय दुःखी आयुष्य जगतात. अकाली वृदधत्व येण्याची शक्यता. अनेक व्याधींनी ग्रस्त होतात.

ज्या भावनेतून आपण इतरांना मदत करतो किंवा काही हेतू न ठेवता काम करतो, त्यात मिळणारा आनंद कित्येकांना समजत नाही. त्याला कारणीभूत इतर घटक सुध्दा असू शकतात.

१. लहापणापासूनच तसं पाहिलेले असते.

२. आई वडिलांची, नाते वाईकांची, मित्रांची भूमिका.

३. समजाऊन न सांगता येणं.

४. मदत करतो म्हणजे तो उपकार आहे आणि त्यासाठी समोरील व्यक्तीने थँक्यू म्हटलेच पाहिजे अशी भूमिका इतरांकडून शिकणे, किंवा अशा लोकांच्या सानिध्यात राहून डोक्यात कायम राहतात.

५. अहंकारी वृत्ती. मीच श्रेष्ठ ही भावना.

मनुष्य-स्वभाव हा मनुष्य-स्वभावच राहतो आणि तो आयुष्यभर बदलत नाही. मग आपण त्याचा स्वीकारच केलेला बरा.

१. कृतज्ञता व्यक्त करण्यास विसरणे, हे लोकांसाठी नैसर्गिक आहे. जर आपण कृतज्ञतेची अपेक्षा करत राहिलो, तर आपला कपाळमोक्ष होर्इल आणि आपल्याला हृदयविकार जडेल.

२. आपल्याला जर आनंद मिळवायचा असेल, तर आपण कृतज्ञतेबद्दल विचार करणे थांबवले पाहिजे आणि फक्त आपल्या आंतरिक आनंदासाठी दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे.

३. कृतज्ञतेची सुद्धा पिकासारखी मशागत करावी लागते. जर आपली मुले कृतज्ञ असावीत असे वाटत असेल, तर आपण आपल्या आचरणातून त्यांना कृतज्ञता शिकवली पाहिजे.

जर आपण इतरांच्या कृतघ्नतेबद्दल कुरकुरत राहिलो, तर कोणाकोणाला दोष द्यायचा? हा मनुष्य-स्वभाव आहे की मनुष्य स्वभाव समजून न घेण्याबद्दलचे आपले अज्ञान आहे? आपण कृतज्ञतेची अपेक्षाच धरायला नको आणि तशात कधी कोणी कृतज्ञता दाखवलीच, तर आपल्यासाठी ते आनंदमयी आश्चर्य असेल आणि जरी नाहीच दाखवली गेली, तरी आपल्याला त्यामुळे वाईट वाटणार नाही.

म्हणून जो कुणी निरपेक्ष भावनेने काम करत असेल तर त्याला अजून प्रोत्साहन द्यावे आणि आपण त्यांच्या कडून शिकून इतरांना तशीच अपेक्षा न ठेवता मदत केली तर स्वतः अधिक परिपूर्ण होऊ शकतो, आनंदी राहू शकतो.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *