वास्तवतेचा स्वीकार

सभोवतालच्या जगावर कायम चिडलेले नाहीतर ‘अभागी जन्मलो’ म्हणून कायम स्वत:ला खिन्न करून घेणारे बरेच लोक आपण आजूबाजूला पाहतो. त्यापैकी समीर एक आहे जो समुपदेशन घेण्यासाठी परवा भेटून गेला. समुपदेशन करताना त्याला खूप काही समजून सांगणे गरजेचे होते. त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रसंगांना आणि इतर व्यक्तींच्या वागण्याला, त्याच्याकडून दिल्या जाणाऱ्या भावनिक प्रतिक्रिया तो देत होता.  

त्यामुळे अशा व्यक्तींच्या वाट्याला खालील गोष्टी येतात.

१. एकतर तीव्र संताप नाहीतर डिप्रेशन.

२. भोवतालच्या घटना आणि व्यक्ती याच त्यांच्या भावनिक अस्वस्थते साठी प्रामुख्याने कारणीभूत आहेत ही त्यांची धारणा असते.

३. त्यांची जबाबदारी स्वत:कडे घ्यायला ते तयार नसतात किंवा त्या शक्यतेचा विचारही त्यांच्या मनात डोकावत नाही.

४. कायम कपाळावर आठ्या आणि संतप्त चेहरा घेऊन फिरणारे.

अशी माणसं प्रसंग आणि इतरांच्या वागण्यासंदर्भात स्वत:शी मनातल्या मनात होणारा संवाद काहीसा असा करतात.

१. त्याने असे वागायलाच नको होते, ते त्याला मुळीच शोभणारे नाही.

२. माझ्याशी तसे वागण्याचा त्याला अधिकार नाही.

३. मी काय करावे आणि काय नको हे सांगणारे ते कोण आहेत?

४. बच्चमजी! एक ना एक दिवस मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.

५. वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना तिथल्या तिथं कडक शिक्षा झालीच पाहिजे.

६. शासन काय करतंय? रस्ते नीट करता येत नाहीत का?

७. चारचौघात त्याने माझा अपमान केला. संधी मिळाली की, मीही त्याला माझा इंगा दाखविनच.

८. विनाकारण मी या भानगडीत गोवला गेलो. त्याकरिता जबाबदार असणाऱ्याला मी पाहून घेईन.

९. मला त्याने आमंत्रण दिले नाही ना, यापुढे त्याचे तोंडही पाहणार नाही.

 

दुसरा प्रकार इतरांच्या वागण्यावरून स्वत:ला खिन्न आणि उदास करून घेणार्‍यांचा. त्यांच्या मनातल्या विचारात खालील वाक्ये सापडतील.

१. मी कोणाचे कधी वाईट चिंतीत नाही किंवा करत नाही तरी लोक माझ्या वाईटावर का असतात तेच मला कळत नाही.

२. मी तिच्यावर जिवापाड प्रेम करतो, तिचा प्रतिसाद मात्र थंड. काय कमी आहे माझ्यात?

३. आयुष्यात तो आज उभा आहे ते केवळ माझ्यामुळे, हे तो पूर्णपणे विसरला याचे वाईट वाटते.

४. व्यवहारात मी नेहमी फसवला जातो. जगातून चांगुलपणा जणू नष्ट झाला आहे.

५. मी इतका निष्पाप, पापभिरू, तरीही नियती माझ्याशीच असा क्रूर खेळ का खेळते?

६. खूप मानसन्मानाची मी अपेक्षा केली नव्हती; पण समारंभात कुणी माझी साधी दखलही घेऊ नये?

७. अन्याय सहन करीतच आयुष्य कंठावे लागणार असे दिसते.

८. लोकांचा कृतघ्नपणा पाहिला की, कधीही कुणाच्या उपयोगी पडू नये असे वाटते.

९. आपले नशीबच फुटके म्हणून गप्प बसावे, हे उत्तम.

इतरांच्या वागण्यावर संतापणाऱ्या व उदास होणाऱ्या अशा दोन्ही लोकांची धारणा असते की, सभोवतालच्या लोकांनी माझ्याबरोबर न्यायाने, सभ्यतेने आणि सौजन्यपूर्ण व्यवहार केलाच पाहिजे.

ही अपेक्षा कितपत योग्य आहे हे जाणून घेण्याकरिता त्यांनी स्वत:ला खालील प्रश्न विचारून त्यांची प्रामाणिक आणि बुद्धीला पटतील अशी उत्तरे शोधावीत (समीरला लिहून दिलीत).

१. विनाअट सर्वांनी माझ्याशी मला वाटते तसे चांगले वागलेच पाहिजे, असा निसर्गाचा नियम आहे काय? किंवा तसे कुठे लिहिले आहे काय?

२. इतरांनी कसे वागावे हा अधिकार त्यांचा की माझा?

३. अपेक्षेप्रमाणे सर्वजण वागतात असे जगात कुणाच्यातरी बाबतीत घडते काय वा आजवर घडले आहे काय?

४. इतरांचे वागणे आपल्याला सुखावणारे नसले, तर असे कोणते महासंकट ओढवते वा आजवर ओढवले आहे?

५. प्रेम, आपुलकी यांच्या देवाणघेवाणीत 100 टक्के प्रेम दुसऱ्याला दिले तर त्याच्याकडूनही 100 टक्के प्रेम मिळालेच पाहिजे असे वैज्ञानिक किंवा सामाजिक समीकरण आहे की काय?

६. लोक आपल्यावर जितके प्रेम करतात तेवढे प्रेम आपण तरी त्यांच्यावर करतो काय?

७. कुणाशी कसे वागायचे, किती जीव लावायचा याचं निसर्गदत्त स्वातंत्र्य आपणही कधी वापरतो की नाही? मग इतरांना ते स्वातंत्र्य का देऊ नये?

८. आपल्याकडूनही कधीतरी कुणावर तरी कळत नकळत अन्याय झाला आहे की नाही?

वरील प्रश्नांची स्वत:शी प्रामाणिक राहून शोधलेली उत्तरं आपल्याला दाखवून देतील की, जगाने आपल्याशी न्यायोचित, सभ्य आणि सौजन्यपूर्ण व्यवहार केलाच पाहिजे, ही हट्टी मागणी विवेकशून्य आणि वास्तवाशी जुळत नाही. केवळ आपली इच्छा आहे म्हणून काही ती मागणी या जगात पुरी होणार नाही.

आपल्याला आवडत नसले, चीड येत असली तरी ते कटू वास्तव स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. उलट, अशा असभ्य आणि सौजन्यहीन लोकांच्या सहवासात राहूनही जीवनात आनंद कसा लुटता येईल याकडे लक्ष देण्यात शहाणपणा आहे. ते थोडे कठीण असले तरी अशक्य मात्र नाही; कारण बरेच लोक अशा परिस्थितीतही आनंदाने आणि सक्षमपणे जीवन जगताना आपण पाहतो.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *