काळजी मुक्ती

मागील आठवड्यात एक इंटरेस्टिंग व्यक्ती भेटली. त्याने बोलताबोलता एक महत्वाचं वाक्य ऐकवलं. म्हणाला, “जेव्हा तुमच्याकडे लिंबू असेल तेव्हा त्यापासून सरबत बनवा.’ तो मी पाळण्याचा प्रयत्न करतो.” अर्थात त्याचा हा काळजीमुक्त स्वभाव दिसून येतो. मिळेल त्या गोष्टीला सकारात्मक ठेऊन त्याचा आपल्या जीवनात किती स्थान द्यायचे ते आपण नको का ठरवायला?  

याविरुद्ध, जे मूर्ख असतात ते त्याच्या उलट वागतात. जेव्हा मूर्ख माणसाच्या असे लक्षात येते की, आपल्या हाती फक्त लिंबू लागले आहे तेव्हा तो आक्रोश करतो, नशिबाला दोष देतो, मला संधी मिळाली नाही असे म्हणतो आणि ती लिंबं फेकून देतो. मग तो सगळ्या जगाला दोष देतो आणि आत्मवंचनेत दारू पिऊन बेहोष होतो; पण जर शहाण्या माणसाला लिंबू मिळाले तर तो या दुर्दैवापासून कोणता धडा शिकतो? तर मी परिस्थितीत काय सुधारणा करू शकेन? या आंबट लिंबापासून मी मधुर सरबत कसे बनवू शकेन?

थोडक्यात, आपण कुठल्याही घडणाऱ्या गोष्टीकडे कसे पाहतो ते आपल्या विचारांवर अवलंबून असते. काही मानसशास्त्रज्ञ मंडळींनी मानवी स्वभावाचा अभ्यास केला या विषयी, आणि त्यांनी सांगितले की,

१. माणसाचा सर्वांत आश्चर्यकारक गुण हा की. तो ‘नव्हत्याचे होते करू शकतो.’!

२. सर्वोत्तम गोष्टी या सर्वांत अधिक अवघड असतात.

३. “आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर तुमच्याकडे असलेले धन भांडवल म्हणून वापरू नका. कोणताही मूर्ख माणूससुद्धा ते करू शकतो. महत्त्वाची गोष्ट अशी की, तुमच्या नुकसानीतूनपण तुम्ही फायदा शोधा. त्यासाठी बुद्धिमत्तेची गरज असते आणि तेव्हाच शहाण्या आणि मूर्ख माणसातला फरक प्रकर्षाने जाणवतो.”

४. अनेकदा अशी जाणीव होते की, ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून आपण पूर्वी झुरत होतो, त्या तेवढ्या महत्त्वाच्या नव्हत्या.”

५. ‘आपले शारीरिक दौर्बल्यच आपल्याला अनपेक्षितरीत्या मदत करते.’ इतिहासात अनेक व्यक्तींनी हे करून दाखवले आहे.

६. यशस्वी लोकांच्या जीवनाचा जर कुणी अधिक खोलवर अभ्यास केला तर आपली खात्री पटेल की, आश्चर्यकारकरीत्या त्यातील बहुतांश लोक हे अपंग होते आणि त्यांनी खूप कष्ट केल्यामुळे त्यांना त्याचे फळ मिळाले.

असे समजा की, आपण नाउमेद झालो आहोत आणि आपल्याला असे वाटते आहे की, आता आपल्याजवळ लिंबाचे सरबत बनवण्याची कोणतीच आशा नाही. तेव्हा प्रयत्न करण्यामागे दोन कारणे असतात.

१. कदाचित आपण यशस्वी होऊ.

२. कारण दुसरे म्हणजे जरी आपण यशस्वी झालो नाही, तरी आपण केलेले प्रयत्न आपल्या व्यक्तिमत्त्वात भर घालतील आणि आपण अधोगतीपेक्षा प्रगतीकडे झेपावले जाऊ.

आहे की नाही गंमत! आपल्या अवतीभोवती अशा अनेक व्यक्ती अशा असतात ज्या बोलता बोलता आपले जीवन बदलवून टाकतात. फक्त नकारात्मक भावनेतून न पाहता त्यातून मला काय चांगलं हवं ते निवडण म्हणजेच लिंबाचं सरबत करणं होय. यामुळे आपले नकारात्मक विचार सकारात्मक बनतील, ऊर्जेची निर्मिती होर्इल आणि आपण उद्योगी राहू. त्यामुळे आपल्याला दु:ख करायला वेळ मिळणार नाही आणि भूतकाळात काय घडले त्याचे विचारही कायमचे निघून जातील. बघा, किती पटतय ते…

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *