आत्मविश्वास

गेल्या 12-15 दिवसापासून मी थोडा मनाने आणि विचारानं अलिप्त झालो. संपूर्ण कुटुंब covide च्या आक्रमणाला तोंड देताना, मागील आठवड्यात मात्र परमसीमेवर असतानाच आईने या जगाचा निरोप घेतला आणि वडील मात्र आत्मविश्वासाने घरी सहिसलामत आले. या सर्व पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा आम्हा सर्वांना परिचय आला तो म्हणजे स्वतःवरील विश्वासाचा. तो कधी आईमध्ये असता तर ती कदाचित वडीलांसारखीच तंदुरुस्त होऊन घरी परतली असती. अर्थात या गोष्टी आपल्या हातामध्ये कित्येकदा नसतात. परंतु स्वतःवर विश्वास अत्यंत आवश्यक आहे. कारण याचा परस्पर संबंध सर्व आयुष्यात पाहायला भेटतो.

१. स्वत:च्या सामर्थ्याबद्दल नम्र परंतु रास्त आत्मविश्वास असल्याशिवाय तुम्ही यशस्वी वा आनंदी बनू शकत नाही.

२. दृढ आणि वाजवी आत्मविश्वास असेल तर तुम्ही यशस्वी बनू शकता.

३. कमतरतेची, अपुरेपणाची जाणीव तुमच्या आशापूर्तीच्या आड येऊ शकते.

४. आत्मविश्वास तुम्हाला आत्मभान, स्व ची जाणीव देऊन यशस्वी उद्दिष्ट प्राप्तीकडे नेतो.

५. मनापासून कुठल्याही प्रकारच्या आजाराला सामोरे जाण्याची तयारी ठेवतो.

६. प्रसंगी तत्काळ कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम ठरतो.

७. सर्वात महत्वाचे म्हणजे ते शक्तिशाली विचार करून स्वतःला समर्थ ठेवतात.

हा मानसिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. हाच दृष्टकोन स्वत:वर विश्वास ठेवायला आणि तुमच्यातील आंतरिक सामर्थ्य मुक्त करायला उपयोगी पडतो.

न्यूनगंड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आजाराने पीडित असलेल्या लोकांची संख्या पाहिली तर भीतीने छाती दडपून जाते. हा आजार आपली अडवणूक आणि जीवन दु:खी कष्टी करतो.

इथे मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते की आत्मविश्वासाची भावना वाढवण्यासाठी आपल्या मनात काही संकल्पना रुजवण्याचा सराव अत्यंत परिणामकारक ठरतो. आपले मन अपुरेपणाच्या, कमीपणाच्या भावनेने झपाटले गेले असेल तर अर्थातच त्याचे कारण म्हणजे आपल्या विचारांवर दीर्घकालापासून याच कमतरतेच्या कल्पनांनी आपल्यावर वर्चस्व गाजवलेले आहे. ते विचार नाहीसे करायचे असतील तर :

१. अधिक सकारात्मक विचारपद्धती मनात रुजवायला हवी.

२. त्यासाठी मनात वारंवार सूचना किंवा आत्मविश्वासाचे विचार पाठवायला हवेत.

३. आपल्या धकाधकीच्या दैनंदिन कार्यक्रमात विचारांना शिस्त लावणे आवश्यक आहे.

४. अगदी तुम्ही तुमची दैनंदिन, नैमित्यिक कामे करीत असतानाही तुमच्या जाणिवेत आत्मविश्वासाचे विचार पक्के करणे शक्य असते.

५. दुबळेपणाच्या भावनेला हद्दपार करणं गरजचं. कुठल्या भावना आहेत त्या ओळखणे ज्या आपल्याला मागे ओढतात.

६. दिवसभर भीतीचे आणि अपयशाचे विचार करणे सोडून द्यायला हवे.

७. अभद्र विचारांवर आपण सतत आपले लक्ष टिकवून ठेवले तर आपल्याला सतत असुरक्षित वाटत राहते. म्हणून या विचारांना दूर ठेवणे.

लोकांचा सतत पाठपुरावा करणारी सगळ्यात वाईट समस्या म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव हे स्पष्टच आहे. एका विद्यापीठात मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमात सहाशे विद्यार्थ्यांचे एक सर्वेक्षण घेतले. विद्यार्थ्यांना विचारण्यात आले की त्यांना छळणारी सगळ्यात अवघड व्यक्तिगत समस्या कोणती? पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांनी ‘आत्मविश्वासाचा अभाव’ असे उत्तर दिले. या सर्वेक्षणावरून असा अंदाज सहज लावता येतो की एकंदर जनतेतही या समस्येचे हेच प्रमाण आहे. जिथे पाहावे तिथे असे लोक भेटतात जे आतून घाबरलेले, जीवनाकडे पाठ फिरवलेले, अपुरेपणाच्या, न्यूनत्वाच्या भावनेने पछाडलेले दिसतात त्यांना स्वत:च्या सामर्थ्याबाबत वाटते.

जीवनाने केलेले आघात, एकामागे एक येणाऱ्या अडचणी, समस्यांचा गुणाकार यामुळे माणसाची शक्ती शोषली जाते आणि तो हतबल आणि नाउमेद होतो, त्याचे धैर्य खचते. पण सत्य वेगळेच असते. तुमच्या व्यक्तिमत्वातील मूल्यवान ठेव्याचे वारंवार मूल्यांकन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेव्हा वास्तविकतेच्या रास्त दृष्टिकोनातून तुम्ही असे पूर्ण मूल्यांकन करता तेव्हा तुमची खात्री पटते की तुम्हाला वाटतो तितका अपयशाचा तडाखा वास्तवात तीव्र नाही.

@श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ.

 

 

 

 

 

 

 

2 thoughts on “आत्मविश्वास”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *