काही माणसे आयुष्यात त्याच त्याच चुका पुन्हा करताना आढळतात. मागील अनुभवावरून केलेल्या चुकांवरून ‘धडा’ घेऊन पुढील कृती करताना पुन्हा पुन्हा तीच कृती करणे टाळावे हे त्यांना जमत नाही. अशीच एक केस मागील आठवड्यात समुपदेशन साठी आली होती. असं का होत असावं ते त्यांना समजत नव्हते.
अर्थात हे त्यांच्या हातून आपोआप होत राहते. कधी उदासीनपणामुळे, कधी दुर्लक्ष केल्यामुळे घाईगडबडीत कृती केल्यामुळे किंवा कधी कधी आपल्या कृतींचा मागोवा घेताना पुरेशी निरीक्षणशक्ती नसल्यामुळे त्याच चुका परत केल्या जातात.
अशा व्यक्तींच्या वर्तनाचे काही वैशिष्ट्ये आणि परिणाम असतात.
१. अशा व्यक्तींची निरीक्षणशक्ती अतिशय कमी असते.
२. आपण ज्या कृती केल्या, त्या करताना आपल्या कोणत्या चुका झाल्या आहेत हे ते अलिप्तपणे पाहू शकत नाहीत.
३. बऱ्याच वेळा त्या इतरांच्या दोषांवर, दुष्कृत्यांवर पांघरून घालताना दिसतात.
४. आयुष्यातील अनुभवांचा फायदा कसा करून घ्यावा हे समजत नाही.
५. या सवयींमुळे ठराविक आजार काही काळानंतर दिसायला लागतात.
६. न आवडणारे काम करावे लागते म्हणून सुध्दा अशा व्याधी मागे लागतात.
७. मागील अप्रिय घटनांचा प्रभाव जास्त असल्यास आत्मविश्वास डळमळीत झालेला असतो.
८. काही ठिकाणी, याच कारणावरून कुटुंबीय विभक्त होतात, जोडीदार सोडून जातो/जाते.
९. कामावरून गच्छंती होते. समाजात नाव खराब होते. हेटाळणी केली जाते.
१०. शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते.
अशा काही प्रकारामुळे घरातील अन्य व्यक्तींना बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा त्यांच्या लक्षात आणून द्याव्या लागतात. त्यामुळे बाकीचे लोक वैतागून जातात. सहजासहजी शिकणाऱ्या, ध्यानात राहणाऱ्या गोष्टी पण लक्षात येत नाहीत.
आपण चुका पुन्हा करतो तेव्हा निराश होणे आणि स्वत: ची टीका करणे साहजिक आहे. पण तुम्ही एकटेच या चुका करणारे नाही आहात. शेजारी पाजारी बघा, खूप जण सापडतील.
१. पुन्हा पुन्हा खाणे.
२. नको असलेली गोष्ट विकत घेणे कारण सेल चालू असतो.
३. नाही म्हणायचे असते पण नाही म्हणू शकत म्हणून नंतर खेद वाटतो.
४. आयुष्यात निर्णय घेताना प्राथमिकता चुकतात.
५. कुटुंबियांवर राग काढला जातो कारण तुम्हाला कामाचा ताण वाढलेला असतो.
६. वेळेवर सांगूनही औषधं न घेणं. विसरणे.
७. गॅसवर दूध उतू जाईपर्यंत इतर विचारत मग्न होणं नेहमीचच.
वरील गोष्टी नाममात्र आहेत आणि अशा असंख्य चुका पुन्हा पुन्हा होत राहतात. काही त्यातून शिकतात आणि सुधारतात तर काही पुन्हा मागचा पाढा वाचतात. जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला हे कुठे थांबवायचे आहे, तर खालील गोष्टींकडे जरूर लक्ष द्या.
१. पुन्हा कधीही विशिष्ट चूक न करण्याचे वचन स्वतःला देणं हा चुकीचा दृष्टीकोन आहे. उदा. मी ही चूक पुन्हा करणार नाही. त्याऐवजी काय चूक झालीय, आणि का झाली याचं विश्लेषण आवश्यक.
२. अशा स्वभावावर काही औषधी जसे की फुलांपासून बनलेल्या ऑईलच्या गोळ्या उपलब्ध आहेत. डॉक्टर कडून तपासणी करा.
३. मानसिक आरोग्य तपासणी करून घ्यावी.
४. समुपदेशन ने नक्कीच फरक पडेल. याठिकाणी कोडे उलगडण्याचा प्रयत्न मानसोपचार तज्ज्ञ करतो.
५. चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक धोरण विकसित करणे गरजेचे.
६. विचार करण्याची पद्धत चुकीची आहे का याबाबत चर्चा जरूर करावी.
७. काही ठिकाणी योग्य शिक्षणाची गरज असेल तर ते जरूर घ्यावं कारण तेच तुमच्या सवयींना रोखू शकते.
८. निर्णय चुकतात म्हणून नाराज न होता आत्मविशवासपूर्वक पुढे चालण्यात अर्थ आहे.
९. मन विचलित करणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करा. त्या कशा टाळता येतील असे पहा. स्वभावाचे वैशिष्ट्य पहा.
१०. व्यक्तिमत्व विकास केल्यास असे बरेच प्रश्न निकाली निघतील.
जर आपण आपल्या आयुष्यातील सर्व चुका पूर्णपणे काढून टाकण्यावर लक्ष केंद्रित केले तर हे आपला वेळ त्यातच व्यर्थ होणार. त्यापेक्षा त्या सुधारण्यासाठी प्रयत्न केला तर सुंदर.
पूर्वायुष्यातील दु:खद आठवणी विसरणे योग्यच; पण त्याचबरोबर आपण पूर्वायुष्यात ‘काय चुकलो’ हे जाणून घेऊन, त्यावर विचार करून या चुका सुधारून पुढील आयुष्य सुखकारक करणेही तितकेच महत्त्वाचे असते, नाही का?
©श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ