तक्रार आणि हेतू

तक्रारीचा सूर

कोणीतरी त्यांच्या सगळ्या अडचणी आणि तक्रारी तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला कसे वाटेल? उत्साही आणि रसरसून गेल्यासारखे नक्कीच वाटणार नाही ना? सत्य हे आहे की, कोणालाही तक्रार करणाऱ्या व्यक्तीसोबत राहायला आवडणार नाही. नक्कीच आपण कधी ना कधीतरी तक्रार करतो. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की : आपण किती वेळा तक्रारी करत असतो?

आता जेव्हा मी “तक्रार” म्हणतो, तेव्हा मी तुम्ही तुमच्या समस्यांच्या निराकरणासाठी उपायाची चर्चा करत असता त्याविषयी बोलत नाही आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात काय घडत आहे हे सांगण्यासाठी तुमचे अनुभव (आणि निराशा) तुमचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांना सांगत असता याविषयीही मी बोलत नाही आहे. परंतु त्या कुठपर्यंत सांगायच्या त्यालाही एक लक्ष्मणरेषा असावी. अशा नेहमी तक्रारी करणाऱ्या व्यक्तींना खालील गोष्टी लक्षात यायला हव्यात.

१. कोणालाही तुमच्या वेदनेविषयी ऐकायचे नाही आहे आपल्या आजारपणामुळे समोरील व्यक्तीचा दिवस सुध्दा खराब होऊ शकतो.

२. हवामानबदल आणि त्या संबंधी तक्रारी तर अजिबात नकोत. त्या नवीन नाहीत. त्यामुळे नकारात्मक वातावरण तयार होतं.

३. छोट्या गोष्टीने निराश होण्यापेक्षा मोठ्या आणि कठीण समस्या आयुष्य आपल्याला देत असते. तुम्ही जेव्हा अशा छोट्या समस्या इतरांना सांगून आपलं महत्व तर कमी करत नाहीत ना?

४. तक्रार करत राहणे हे आयुष्यातील प्रत्येक आव्हानाचे उत्तर नाही.

५. आपल्या तक्रारी सांगून तुम्ही समोरील व्यक्तीच्या जखमा तुम्ही ताज्या तर करत नाहीत ना?

६. सगळ्या गोष्टी लक्षात घेणे. तक्रार करत राहिल्याने आपला दृष्टिकोन हरवून जातो आणि आपल्या समस्या खूप वाढतात.

७. नेहमीचं तक्रार करत राहिल्याने समोरील व्यक्ती कंटाळून नंतर आपल्याला टाळायला लागतात.

८. समाजात आपली ओळख ही तक्रारखोर अशी होते. तुमच्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते.

९. तक्रार केल्याने तुम्ही स्वतःच्या वेदना आणि अस्वस्थता वाढवत असता.

१०. तक्रार करणे ही गोष्ट काहीच साध्य करत नाही आणि तुम्ही ती परिस्थिती सुधारण्यासाठी ज्या कृती करणे अपेक्षित असते त्यापासून तुम्हाला दूर नेते.

तुम्हाला माहीत असलेल्या लोकांचा विचार करा. टायरमधली हवा गेली म्हणून तक्रार करणारे किंवा लग्नात छोट्याश्या कारणावरून वाद झाला म्हणून जवळच्या नातेवाईकांशी बोलणे टाकणारे किती मित्रमैत्रिणी तुम्हाला माहीत आहेत? या लोकांना गोष्टींचे “महत्त्व” कळत नाही.

याविरुद्ध, उत्तम वृत्ती असलेल्या आशावादी व्यक्तींना आयुष्यात खरेच महत्त्वाचे काय आहे याचा अंदाज आलेला असतो. त्यांचे आशावादी असणे हे त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळेपण आणत असते.

१. सकारात्मक दृष्टिकोन. आनंदी व्यक्तिरेखा.

२. हवाहवासा वाटणारा आदरयुक्त म्हणून तुम्हाला जवळ केलं जातं.

३. नोकरी, जोडीदार, कुटुंब मित्र, नातेवाईक इत्यादी लोकांबरोबर राहताना प्रश्न येत नाहीत.

४. शारीरिक आणि मानसिक रोगांपासून दूर राहता.

५. प्रमोशनसाठी आणि जीवनात नेहमी आघाडीवर असणार.

६. तुमच्यामुळे इतरांचाही दिवस चांगला जातो.

७. सोशल मीडिया आणि हवेतील मैत्रिपेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष समोरील व्यक्ती आवडतात. सामाजिक प्रक्रियेत सहभागी होता.

ही लिस्ट अजून वाढत जाईल. म्हणूनच तक्रारखोर् व्यक्तीनी काही गोष्टी शिकल्या तर छान होईल.

१. तुम्ही नुसते बसून आयुष्यातल्या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करा असे मी सुचवत नाही. मात्र तक्रार करण्यापेक्षा तुमचे लक्ष आणि उर्जा तुमची समस्या सोडवण्याकडे किंवा फारतर कमी करण्याच्या पायऱ्यांकडे केंद्रित करणे जास्त चांगले आहे.

२. काही समस्या सामंजस्याने घ्यायच्या असतात.

३. मानसोपचार तज्ञ समस्येचे मूळ शोधून देण्यास मदत करतो.

४. काही शारीरिक चाचण्या करून घेऊन डॉक्टरच्या सल्ल्याने पुढे जाणे हितावह.

५. तक्रारी करताना समोरील व्यक्तीच्या डोळ्यात जरूर पाहा. वैतागलेले दिसले तर समजून घ्या

६. समोरील व्यक्ती निवांत असेल त्याची खात्री करून घ्या. फोनवर बोलणं करायचे असेल तर लगेच तक्रारीचा सूर नको.

७. मुळातच तक्रार कुठून सुरू होते, काय कारणे आहेत, त्यावर काही पर्याय आहेत का, हे स्वतः चेक केलेलं बरं.

असे म्हटले जाते की, ९० टक्के लोकांना तुमच्या समस्यांविषयी काहीच पडलेले नसते आणि उरलेल्या १० टक्के लोकांना तुम्हाला समस्या आहेत यामुळे आनंद होत असतो! खरेच आपण सगळे कमी तक्रारी करू शकतो. आत्तापासून स्वतःवर आणि इतरांवर एक कृपा करून सुंदर संभाषण करा. ज्या व्यक्ती जास्त तक्रारी करत नाहीत (आणि ज्या सकारात्मक पद्धतीने बोलतात) त्यांच्या आजूबाजूला राहण्याने आनंद मिळतो. त्या गटात सामील व्हायचे ठरवा म्हणजे तुम्हाला येताना बघून लोकांना रस्ता ओलांडावा लागणार नाही!

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *