तुमचे मन एखाद्या उद्यानासारखे असते ज्याची काळजीपूर्वक, योग्य देखभाल केली तर ते बहरू शकते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यात अवाजवी तणही माजू शकते. परंतु एक गोष्ट निश्चित की या उद्यानाकडे दुर्लक्ष करा वा त्याची काळजी घ्या, त्यात काहीतरी उगवेलच. जर त्यात उपयुक्त बीजे पेरली गेली नाहीत तर त्यात बेसुमार गवताची बीजे पसरतील आणि तसेच निरुपयोगी आणि निरर्थक तण सगळीकडे पसरेल.
वासंती आणि अर्जुन, एक जोडपं सध्या अशाच प्रकारच्या समुपदेशनासाठी संलग्न आहेत. त्यांच्या मनातील विचारांची सांगड अजून काय नीट बसेना. तरीही प्रामाणिक प्रयत्न करणं हा हेतू ठेऊन दोघेही काहीतरी मार्ग काढण्याची मानसिकता बाळगून आहेत.
त्यांना खूप बेसिक गोष्टी लक्षात आणून दिल्या त्या म्हणजे,
१. ज्याप्रमाणे माळी त्याच्या बागेची योग्य काळजी घेतो, निरर्थक गवत-तण उपटून काढतो आणि त्याला हवी ती फळा-फुलांची रोपटी लावतो, त्यांची नीगा ठेवतो, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाची मशागत करायला हवी.
२. सगळ्या चुकीच्या, निरर्थक आणि अशुद्ध विचारांचे तण काढून टाकीत त्याची योग्य देखभाल करायला हवी.
३. योग्य आणि उपयुक्त विचारांची, शुद्ध विचारांची जोपासना करायला हवी.
४. सतत ही प्रक्रिया करीत राहिले म्हणजे आज ना उद्या तुम्हाला आढळून येईल की तुम्ही तुमच्या आत्मरुपी बागेचे मालक आणि माळी आहात, तुमच्या आयुष्याला तुम्हीच दिशा देत आहात.
५. तुमच्या अंतरंगात विचारांचा नियम कार्य करीत असल्याचे तुम्ही पाहू शकाल आणि तुम्हाला अचूकपणे कळेल की तुमचे चारीत्र्य, परिस्थिती आणि नशीब यांना आकार देण्यासाठी तुमचे विचार आणि मन कसे एकत्रितपणे कार्य करतात.
६. विचार आणि चारीत्र्य एकच असतात. म्हणून वैचारिक काळजी महत्वाची.
७. बाकीच्या इतर नित्य काळज्या जशा की समुपदेशन, मानसिक व आरोग्याच्या समस्या निवारण, योग्य झोप व विचार नियमन.
जर वरील गोष्टींची काळजी घेतली किंवा लक्षात ठेवल्या तरी ताणतणाव निर्माण करणाऱ्या गोष्टींना मनात थारा दिला जाणार नाही.
ज्या ज्या लोकांनी आत्म-परीक्षण केले आहे आणि आत्म-नियमनाचा अवलंब केला आहे, त्या सगळ्या लोकांना माहित असते की परिस्थिती विचारांतून जन्म घेते.
मनुष्यप्राणी असल्याने आपण तरीही विचित्र विचार करतोच. फार कमी व्यक्ती या चांगल्या वाचनातून, चर्चेतून, समुपदेशन द्वारे केलेली यशाची तत्त्वे दररोज लागू करतात. पण हेच , त्यांचे विचार सत्यात उतरतील हे जाणून सकारात्मक वृत्ती कायम ठेवतात.
वासंती आणि अर्जुन चे विश्लेषण केल्यानंतर हे ध्यानात येते की,
१. त्यांच्या विचारांमध्ये बरीच तफावत आहे.
२. दोघंही कामाच्या व्यापात गुंतून घेताना दिसतात.
३. एकमेकांना देण्यास वेळ कमी मिळतो.
४. कामाचं स्वरूप वास्तविक जास्त नाही पण विचार फक्त कामाचाच.
५. ज्येष्ठ मंडळी घरात नसणं. त्यामुळे मध्यस्त नसणं.
६. मित्रांबरोबर घालवायला वेळ आहे परंतु जोडीदारासोबत नाही. मजा, मोकळेपणा हेच आयुष्य अशी विचारसरणी.
७. नकारात्मक विचार. शंकेखोर मानसिकता. परंतु तसं काही नाही असा दोघांचा दावा.
८. विचारांवर अंकुश नाही. कितीही काही केलं तरी पाय घराकडेच वळतात म्हणून घरात येणं.
आपल्या मनाने सुप्तावस्थेत ज्याची जोपासना केली आहे ते ते त्याच्याकडे आकर्षित होते, ओढले जाते. त्याचे ज्या ज्या बाबींवर प्रेम आहे त्या जशा त्याच्याकडे ओढल्या जातात त्याचप्रमाणे त्याने ज्या ज्या बाबींची भीती बाळगली आहे त्याही त्याच्याकडे आकृष्ट होतात. माणसाने त्याच्या मनात जपलेल्या महत्त्वाकांक्षांची उंच शिखरेही तो प्राप्त करू शकतो आणि तो वारंवार त्या भीतीच्या खोल दरीत कोसळतो ज्या भीती खऱ्या आहेत की खोट्या हे त्याने पडताळूनच पाहिलेले नसते. त्याच्या परिस्थितीच्या माध्यमातून तो तेच प्राप्त करीत असतो जे त्याने मनात खोलवर जपले आहे.
जेंव्हा या गोष्टी त्यांना समजल्या तेंव्हा कुठे वासंती आणि अर्जुनला त्यांच्या विचारांवर विश्वास बसायला लागला. त्यांनी त्यांच्या मनाची बाग चांगल्या विचारांनी भरवून टाकायचा उद्देश ठेवलाय, हीच एक गोष्ट मनाला सुखावून जाते.
©श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ
Excellent !!