अपयशातून यश

आता परीक्षा येत आहेत, आर्थिक वर्ष संपत आलय, आणि हवे ते निकाल मिळत नाही म्हणून त्रासून जायची वेळ जवळ येतेय म्हणून बरेच मित्र परिवार चिंतित दिसतो आहे. म्हणून जेंव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तेंव्हा तेच सांगण्याचा प्रयत्न केला की चिंता तुम्हाला होणं साहजिक परंतु त्यातून फारसे असे प्राप्त काही होणार नाही.  

जर तुम्हाला हवे असलेले निकाल मिळत नसतील किंवा तुम्ही अपयशामुळे थकून गेला आहात तर स्वतःला हे प्रश्न विचारा :

१. माझे वेळापत्रक अवास्तव आहे का?

२. मी खरेच वचनबद्ध आहे? तुम्हाला खरेच तुमचे ध्येय साध्य करायचे आहे? तुम्ही जे हवे ते सगळे करण्यासाठी आणि ध्येय पूर्ण होण्यासाठी हार मानण्याचे विचार बाजूला सारण्यासाठी तयार आहात का?

३. मला निराश करणारे खूप प्रभाव आहेत का? ते ओळखायची तयारी आहे का?

४. मी यशस्वी होण्यासाठी तयारी करतो आहे का?

५. आपल्याला आवश्यक असणारे धडे आपल्याला अपयशातून मिळतात हे तुम्ही मानता का?

आयुष्य हे सगळ्यात यशस्वी माणसांसाठीही हार आणि जीत यांनी बनलेले असते. आयुष्यातल्या जिंकलेल्या व्यक्तींना हे माहीत असते की चालण्यापूर्वी तुम्ही रांगता आणि धावण्यापूर्वी तुम्ही चालता आणि प्रत्येक ध्येयासोबत अपयशाची नवीन मालिका येते. या निराशा काही काळ असल्याचे समजून त्यातून बाहेर पडायचे की त्यांना कायमचे अडथळे समजायचे हे तुमच्यावर असते. तरीही काही ठोक उपाययोजना कुणीही करू शकतं. बघा जमेल का:

१. यश हे नेहमी एकावेळी एक पाऊल टाकल्याने मिळते आणि पुढच्या पातळीवर जायला किती वेळ लागतो हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे संयम राखा आणि इतरांसोबत तुमच्या यशाची तुलना करू नका. चांगली वृत्ती बाळगा, कृती करा, तडजोडी करा आणि निकाल मिळतील.

२. जेव्हा तुम्ही करत असलेल्या गोष्टींवर तुमचे प्रेम असते तेव्हा त्यासोबत चिकटून राहणे सोपे असते. त्यामुळे तुम्ही ज्या ध्येयांविषयी तुमच्या भावना उत्कट आहे आणि तुम्ही हार मानण्याची काहीच शक्यता नाही त्या ध्येयांचा पाठपुरावा करा.

३. अयशस्वी निकाल वैतागवाणे असू शकतात. त्यामुळे आपण आपल्याला सहाय्य करणाऱ्या आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींच्या अवतीभवती राहिले पाहिजे.

४. कोणत्याही यशाला तयारीची आवश्यकता असते. त्या त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांसोबत संपर्क साधणे. यशस्वी व्यक्ती या सतत आपली कौशल्ये धारदार करत असतात.

५. जेव्हा तुम्हाला अपयशाची भीती वाटत नसते तेव्हा तुम्ही यशाच्या मार्गावर असता. तुमचे ध्येय साध्य करण्याच्या प्रवासातला अविभाज्य भाग म्हणून अपयशाचे स्वागत करा.

अपयश हे शिकण्याच्या प्रक्रियेतले अनुभव असतात जे तुम्हाला कराव्या लागणाऱ्या तडजोडींकडे खुणावत असतात. कधीच अपयशापासून लपायचा प्रयत्न करू नका कारण त्या दृष्टिकोनाने तुम्ही कोणतीच जोखीम न घेता खूप कमी गोष्टी मिळवाल याची हमी मिळते. “तुम्ही अपयशी झालात तर निराश व्हाल पण तुम्ही प्रयत्नच केला नाहीत तर ते तुमचे दुर्दैव असेल.”

विद्यार्थी आणि व्यावसायिक मित्रांना याची पूर्ण जाणीव आहे तरीही स्वभाव आपल्याला चिंतेच्या गर्तेत घेऊन जात असतो. त्यासाठी साथ हवी ती प्रेमळ माणसांची; पण ती नजर हवी अशी माणसे ओळखण्याची. प्रेमळ माणसं आपल्याला जगायला शिकवतात म्हणून अशा दुर्मिळ व्यक्तींना आजच फोन करा, भेटा आणि सांगा की तूच आहेस माझ्या यशाचा वाटीदार…

 

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *