आठवणी आणि जगणं

आपल्या जुन्या आठवणी नेहमी आपल्या मानसिकतेवर परिणाम करत असतात. ज्या वेळी एखादा मोठा बदल आयुष्यात घडत असतो, त्या वेळी आठवणींचे पाश, इतक्या दिवसांच्या अंगवळणी पडलेल्या सवयी पाय मागे ओढतात. या बदलाचा ताण मनावर, शरीरावर येतो व त्रास होतो. अशा वेळी हा बदल लगेच अंगवळणी पडावा, नवीन परिस्थितीला सहजतेनं सामोरं जाता यावं, म्हणून काही व्यक्ती समुपदेशन साठी बोलत होत्या.

समुपदेशन करताना आपला इतिहास जाणून घेणं आवश्यक असतं. त्यानुसार स्वभाव उलगडायला सुरुवात होते. कुठल्या अनावश्यक आठवणी आपल्यावर प्रभाव टाकतात त्या पाहून समुपदेशन करता येतं.

ज्या व्यक्तींवर आठवणींचा व कृत्यांचा प्रभाव जास्त असतो, त्यांची मानसिकता खालीलप्रमाणे असते.

१. काही माणसांना छोट्यामोठ्या बदलांचीही चटकन सवय होत नाही. हे बदल अंगवळणी पडायलाही खूप वेळ लागतो.

२. गतकाळातील दु:खद आठवणी मनावर परिणाम करतात.

३. माणसाची स्मृती हे वरदान असलं, तरी कधी कधी याच आठवणी मन अस्वस्थ करतात.

४. सुखद आठवणींचे पाश देखील कार्यशीलतेत बाधा आणतात.

५. जुन्या आठवणींमुळे अनेकांच्या मानसिक किंवा शारीरिक तक्रारी वाढू लागतात.

६. हवामानातील बदल, स्थानबदल, अन्नातील बदल, सभोवतालच्या समाजातील बदल यामुळे काहींना त्रास होतो, काही तक्रारी उद्भवतात.

७. आंतरजातीय अथवा प्रेम विवाहाच्या बाबतीत सुरुवातीच्या प्रेमाचा बहर ओसरल्यानंतर मतभिन्नता जाणवू लागते. एकमेकांच्या सवयी, श्रद्धास्थानं, विचारांची भिन्नता, इ. तील फरक समजून येतो. दोघांची एकमेकांना खरी ओळख होऊन स्वभाव समजून घेणं, एकमेकांच्या सवयी अंगवळणी पडणं या गोष्टींना वेळ लागतो. कधी कधी भांडणंही उद्भवतात.

८. दारू, सिगारेट, चहा-कॉफी, अतिव्यायाम, मोबाईलचे वेड यांसारखी व्यसनं किंवा नखं कुरतडणं यांसारख्या सवयी बदलणे अवघड जाते.

९. निवृत्तीनंतर येणारं औदासिन्य, घटस्फोटानंतर येणारं नैराश्य हा सुध्दा याचाच भाग आहे.

१०. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणारा अडथळा कित्येकदा त्यांच्या जुन्या आठवणी असतात.

अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातल्या त्यात नवीन घरात प्रवेश करणारी मुलगी, तिचा नवरा, सासू सासरे, शेजारील नातेवाईक इत्यादी लोकांबरोबर राहताना जुन्या सवयी जर तशाच राहिल्या तर संसार बेचव व्हायला लागतो. काहींना आईशिवाय जगणे किंवा तिच्या आठवणीने व्याकुळ होऊन आपल्या समोरील चांगल्या व्यक्तींना दुःख देणे, अशी अनेक उदाहरणे देता येतील. असे होत असेल तर त्यासाठी काही पर्याय आहेत आणि ते करणे शक्य आहे.

१. अशा व्यक्तीनी दृढनिश्चयी बनणे आवश्यक आहे. एकदा त्यांनी आपलं ध्येय ठरविलं की, वेळप्रसंगी समाजप्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेसुद्धा पोहत जाण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी असलं पाहिजे.

२. आपली दृष्टी पूर्वग्रहदूषित ठेवू नये.

३. नवीन तत्त्वांची कास सहजपणे धरण्यासाठी आपल्या अवतीभोवती चांगली माणसे असावीत.

४. योग्य अशी औषधे आजकाल उपलब्ध आहेत. आयुर्वेद, होमिओपॅथी त्यावर उपचार करू शकतात. माणसाच्या मनोधारणेवर, मानसिक लक्षणांवर आधारित अशी औषधयोजनेची नवी पद्धत सध्या विकसित आहे.

५. वेळोवेळी समुपदेशन घेतल्याने फरक पडतो.

६. आपल्या आठवणींवर अंकुश ठेवण्यासाठी वेळोवेळी त्या आज गरजेच्या आहेत का, हा प्रश्न स्वतःला जरूर विचारा.

७. प्रापंचिक जीवनात धार्मिकतेचा खूप सुंदर वापर केला जातो. म्हणून आपल्या देवाची मनोभावे प्रार्थना समजून घेऊन त्या प्रार्थनेला आपल्या वागण्या बोलण्यातून व्यक्त करावं.

८. खेळ, वाचन, संस्कार केंद्र, यामध्ये मन गुंतवायला सुरुवात करा.

९. ज्या आठवणीं मुळे आपले विचार बदलता येत नसतील तर कमीतकमी स्वतःला त्रास करून घेण्यात कुठलेच शहाणपण नसते हे विसरू नये.

१०. शिक्षणाचा योग्य वापर करून पुढील काळाची पावले ओळखला शिकणं गरजेचे.

११. मानसोपचार तज्ज्ञ, वेगवेगळ्या थेरेपीचा वापर करून या सवयी सोडवू शकतात.

भगवंताने आपल्याला विसरभोळा स्वभाव त्याच कारणाने दिलेला आहे हे विसरता कामा नये. जुन्या आठवणीतून प्रेरणा घ्यावी, चुका सुधाराव्या, प्रपंच नेटका करावा, आणि पुढे काळानुरुप चालावे यातच सर्व आलं. उगीचच भूतकाळात अडकून पडलेल्या मनाला जुन्या भिजलेल्या घोंगडीचा वास यायला नको. म्हणून वेळेवर सुधारणा आवश्यक असते. हे ज्याला समजले त्यालाच जगण्याचा अर्थ समजला, अन्यथा सर्व व्यर्थ.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ज्ञ

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *