एकलकोंडा स्वभाव

अत्यंत सौम्य, शांत स्वभाव, मी बरा नि माझं काम बरं ही वृत्ती. या व्यक्ती बुद्धिमान असतात. कर्तृत्ववान असतात. ज्ञानी, विचारवंत असतात. अन् यामुळेच असेल कदाचित, त्यांना थोडासा गर्व-थोडा अभिमानही असतो. तो असणं स्वाभाविकही असतं. त्यांच्या एकांतप्रिय स्वभावामुळं काही लोकांना ते गर्विष्ठ, तुसडे, माणूसघाणे वाटण्याचाही संभव असतो;

अशा व्यक्तीचे नातेवाईक त्याच्या विषयी काय करावं म्हणजे तो इतरांबरोबर मिसळून राहील, त्यासाठी सल्ला विचारत होते. असा प्रश्न बहुतांशी कुटुंबामध्ये आढळतो. अशा व्यक्तींचे काही स्वभाव थोडे हटके असतात. जसे की;

१. ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात.
२. स्वत:च्या कामाबाबत दुसऱ्याला तोंड उघडायला देणार नाहीत की दुसऱ्याच्या कोणत्याही बाबतीत नाक खुपसणार नाहीत.
३. त्यांना एकांतवास प्रिय असतो; कारण आपलं काम ते अधिक एकाग्रतेनं करू शकतात. आपल्या कामाबद्दलही फारसं सांगणार नाहीत. बोलणार नाहीत.
४. आपले म्हणणं इतरांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करणार नाहीत. इतरांना सल्ला देण्याचा प्रयत्न करणार नाहीत किंवा आपल्या कामाबद्दल इतरांना सल्ला विचारणार नाहीत.
५. कुणी काही म्हणालंच तर सांगतील, ‘मला करावंसं वाटतं तेच मी करणार’ ‘मला माझ्या मार्गाने जाऊ द्या किंवा मला आता माझं काम करू द्या.’
६. ही माणसं आपले दु:खही इतरांना सांगत नाहीत. ते आजारी असले तरी कुणाला बोलून दाखवणार नाहीत. झोपून राहावंच लागलं तरी त्यांना खोलीत एकटंच राहायला आवडेल.
७. परंतु असं असलं तरी काही व्यक्तींप्रमाणे इतरांवर सत्ता गाजवायला मात्र या व्यक्तींना आवडत नाही.
८. अनेक वेळा इतरांचं दु:सह वाटणारे वागणंही किंवा त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी, कृतीही ते सहजपणे सहन करतात.
९. विचारी स्वभावाबरोबरच इतरांना आपलंसं करून घेण्याचा, त्यांच्या अडीअडचणींबाबत विचार करून त्यांना योग्य उपदेश, सल्ला देण्याचाही गुणधर्म ते बाळगतात.
१०. आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी करतात. राजयोग्याचे आयुष्य वैभवाने जगतात.
११. कित्येकांना स्वतःचे प्रश्न असतात की जे दुसऱ्यांना सांगू शकत नाहीत. अपयशामुळे खचून जाणे.

सुरुवातीला सांगितल्या प्रमाणे अशा व्यक्तींबद्दल काही गैरसमज करून घेतले जाणे साहजिक आहे. परंतु जर कधी या व्यक्ती अजून अंतर्मुख होत चालल्या तर मात्र काही शारीरिक व मानसिक आजार उदभवू शकतात. जसे की,

१. चिडखोर स्वभाव बनणे.
२. नवीन व्यक्तींशी जो पर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत बोलणार नाहीत की भेटणार नाहीत. अंतर्मुख होत जातात. त्यामुळे चिंतारोग वाढतो.
३. एकांतामुळे, इतरांशी संवाद होत नसल्याने न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते.
४. कित्येकदा चांगल्या नोकरीची सुवर्णसंधी चालून आली तरी ती घेता येत नाही.
५. डोकेदुखी वाढत जाते.
६. घरातील वातावरण गढूळ होते.

अर्थात जरी असे घडले तरी, चिडचिडेपणा सोडला तर इतर काही मोठे प्रश्न निर्माण होत नाहीत की आपण त्याची चिंता करावी. आजकाल हा प्रश्न आयटी उद्योगामध्ये काम करणाऱ्या तरुणांमध्ये जास्त आढळतो. त्यातच करोना मुळे अजून जड जातंय. तारुण्यात पदार्पण करणारी मुलं आणि मुली यांचा तर मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे पालक सांगतात. अशी मुलं खोलीत कोंडून घेऊन देव जाणे काय करतात असा प्रश्न पालकांसमोर आहेत. काय पर्याय आहेत मग कुटुंबापुढे?

१. डॉक्टर कडून तपासणी करून काही शारीरिक व्याधी तर नाहीना हे चेक करून घेतल्यास चांगले.
२. एकलकोंडा म्हणणे बंद करा. त्यामुळे त्याला/तिला स्वतःचे काम करण्यात वेळ भेटेल.
३. कामाचा ताण वाढला असेल तर अशा व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील इतर सभासदांना वेळ दिला पाहिजे. म्हणून तणाव व्यवस्थापन महत्वाचं.
४. हुशार आहेत म्हणून इतरांनी त्यांना डोक्यावर घ्यायचे कारण नाही. त्यांचा एकलकोंडेपणा कदाचित तुमच्यामुळे सुध्दा असू शकतो.
५. एकमेकांना वेळ देऊन, छोटे छोटे ब्रेक घेणं आवश्यक.
६. तरुण मुलं तुमच्या पासून अलिप्त राहत असतील तर त्यांचे काहीतरी लफड आहे म्हणून शंका घेणे बंद करा.
७. गरज भासल्यास मानसोपचार घ्या. योगा, मेडिटेशन, योग्य सल्ला घेणे. होमिओपॅथी मध्ये स्वभाव कसा आहे ते जाणून घेऊन औषधी देतात.

एकला चलो रे म्हणणारी माणसं कित्येकदा इतरांचा विचार न करता यशाचं शिखर गाठताना दिसतात तर काही जण सगळं असूनही चिंतेच्या विहिरीत उडी मारून स्वतःचा घात करतात. एक म्हण आहे “ बोलणाऱ्याचे हुलगे विकतात, न बोलणाऱ्याचे सोने विकत नाही”. बोलबच्चन कुठे व कसे द्यावे हे आपण अनुभवाने आणि अवलोकन करून शिकत असतो. म्हणून यश प्राप्तीसाठी दोन्हींचे मिश्रण केल्यास यश हे आहे याची खात्री बाळगा. म्हणून जे तुम्हाला येतेय ते प्रगल्भता दाखवत व्यवस्थित पणे जर इतरांना समजाऊन सांगू शकत असाल तर मग तुम्ही एकलकोंडे राहिलात तरी चालेल.

©श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ

 

4 thoughts on “एकलकोंडा स्वभाव”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *